डोंबिवली– डोंबिवली जवळील खंबाळपाडा गाव हद्दीत १० लाख रुपये किमतीचा घातक रसायनांचा साठा पोलिसांनी शनिवारी जप्त केला आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात घातक रसायनांचा साठा करणारे, हे रसायन खरेदी करणाऱ्या व्यावसायिकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
खंबाळपाडा येथील सार्वजनिक रस्त्यावर सकाळी सहा वाजता एका टँकरमध्ये मानवी जीवितास, जलप्रदूषण करणारे उग्र वासाचे घातक रसायन पिंपांमध्ये ओतून घेतले जात आहे, अशी माहिती अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभागाला मिळाली होती. पोलिसांनी तातडीने हालचाली करुन संबंधित विभागाचे अधिकारी यांना पाचारण करुन छापा टाकला. त्यावेळी तेथे गणेश संपत सोनावणे (३२, रा. भोईर चाळ, भोईरवाडी, खंबाळपाडा), पंडीत सोनावणे (रा. टाटा पाॅवर झोपडपट्टी, कल्याण पूर्व), एकनाथ अण्णा मार्के उर्फ नाथ यांनी आपल्या ताब्यातील रिकाम्या पिंपांमध्ये मुशरत अहमद खान (४६, रा. अमीनबाई चाळ, एलबीएस मार्ग, घाटकोपर) याच्या टँकरमधील ज्वालाग्रही, प्रतिबंधित घातक रसायन ओतून घेण्याचे काम सुरू केले होते. अतिशय गुप्तपणे हे काम सुरू असल्याचे छापा पथकाच्या निदर्शनास आले. छापा पथकाने धाड टाकताच पथकाला रसायनाविषयी आरोपी योग्य उत्तरे देऊ शकले नाहीत. त्यांची पळापळ झाली. हे चोरीचे घातक रसायन भिवंडी येथील जतीन शहा, मंजितसिंग, गुड्डु उर्फ अफताब यांना विकण्यात येणार होते. असे तपास पथकाच्या निदर्शनास आले.
हेही वाचा >>> डोंबिवलीत लोढा पलावा येथे १५ लाखाचे सोन्याचे दागिने चोरणारी अटक
गणेश सोनावणे या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. मानवी जीवितास हानी होईल असे घातक रसायन साठा करुन त्याची खरेदी विक्री केल्याच्या कारणावरुन पोलिस शिपाई संतोष राऊत यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे.
मागील अनेक वर्षापासून राज्याच्या विविध भागातील घातक रसायन डोंबिवली जवळील एमआयडीसी नाला, खंबाळपाडा, उल्हासनगर जवळील म्हारळ, वरप येथील नाल्यात सोडून मानवी वस्तीला धोका निर्माण करण्याचे काम मागील अनेक वर्षापासून सुरू आहे. इतर प्रांतात उत्पादित मालाच्या रसायनांवर प्रक्रिया करण्याचा खर्च अधिक आहे. त्यामुळे हे रसायन कमी खर्चात टँकर चालकांना विकून ते उद्योग व्यवसाय असलेल्या भागात रात्रीच्या वेळेत आणून नाल्यात, ओढ्यात ओतले जाते.