कल्याण- कल्याण पूर्वेतील म्हसोबा चौक भागातील एका बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी २७ लाख रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. एटीएममधील सीसीटीव्हीमध्ये चोरीची घटना कैद झाली आहे. सीसीटीव्हीमधील चित्रीकरणाच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.म्हासोबा चौक भागात बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे. एटीएमच्या बाहेर आणि आतील भागात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. रविवारी मध्यरात्री तीन ते चारच्या सुमारास दोन चोरटे धारदार वस्तू, छिनी, हातोडी घेऊन एटीएममध्ये शिरून त्यांनी एटीएम फोडले आणि त्यातून २७ लाख रुपयांची रोख रक्कम चोरून नेली.
सकाळी एक ग्राहक पैसे काढण्यासाठी आला, तेव्हा त्याला चोरीचा प्रकार निदर्शनास आला. त्याने बँकेला ही माहिती दिली. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी दोन अनोळखी व्यक्तिं विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या महिन्यात कल्याण पूर्वेत एटीएममध्ये रात्रीच्या वेळेत शिरून चोरी करताना एका नेपाळी व्यक्तिला पोलिसांनी अटक केली होती. बँकेच्या नियंत्रण कक्षाला कल्याण पूर्वेतील एटीएममध्ये संशयास्पद हालचाली एक व्यक्ति करत आहे अशी माहिती मिळाली. नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्याने तात्काळ कोळसेवाडी पोलिसांना ही माहिती दिली. पोलिसांनी एटीएमटमध्ये घुसून एका व्यक्तिला अटक केली. नेपाळहून एक व्यक्ति कामासाठी कल्याणमध्ये आला होता. रोजगार नसल्याने तो चोऱ्या करत होता, असे पोलीस तपासात स्पष्ट झाले होते.