कल्याण, नवी मुंबई परिसरात मोठय़ा प्रमाणात बांधकामांसाठी लागणाऱ्या दगडांच्या खाणी आहेत. डोंगर फोडून दगड काढल्यानंतर ठेकेदार जमिनीलगत खोदकाम करून दगड शोधण्याचा प्रयत्न करतो. हा दगड काढताना जमीन खोदण्यात येते. त्यामुळे खाणीत कपारी (पोकळ भाग) तयार होतात. पावसाळ्यात खाण पाण्याने भरली की या कपारी पाण्याने भरतात. त्यामध्ये ‘बेभान’ होऊन तरुण पोहण्यास उतरतात. या खाणी पावसाळ्यात तरुणांसाठी धोकादायक ठरू लागल्याचे चित्र सध्या दिसू लागले आहे.
गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण, टिटवाळा, नवी मुंबई परिसरांतील दगडाच्या खाणी पाण्याने भरल्या आहेत. या खाणीत पोहण्यासाठी गेलेले काही तरुण बुडून मरण पावल्याच्या घटना घडल्या आहेत. खदानीला खूप खोली नसताना तरुण या खाणीत का बुडून मरण पावतात याची माहिती घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी सुरू केला आहे.
डोंगर पायथ्यापासून ते टोकापर्यंत फोडून झाल्यानंतर खाणीतील सगळा दगड संपतो. ठेकेदार मग या खाणीच्या पायथ्याशी जमिनीलगत असलेली जमीन उकरून काढतो. ही जमीन उकरताना अनेक ठिकाणी दगडाच्या खापा लागतात. ठेकेदार जमीन कोरून हा दगड काढून घेतो. हा दगड काढून झाल्यानंतर त्या खाणीमध्ये जमिनीखाली कपारी (जमिनी खालील पोकळी) तयार होतात. पाऊस सुरू झाल्यानंतर या खाणी पावसाच्या पाण्याने भरतात. या खाणींच्या पायथ्याशी दगडाशिवाय मातीचा फार संबंध नसतो. त्यामुळे या खाणींमध्ये धरण, तळ्यांपेक्षा स्वच्छ नितळ पाणी असते. अनेक तरुण ‘बेभान’ होऊन तर काही साधेपणाने पोहण्याची हौस म्हणून खाणीत उतरतात. खाणीची खोली एक सारखी नसल्याने पोहताना अनेक तरुण खाणीतील कपारीत जाऊन अडकतात.

Story img Loader