ठाणे : मुंब्रा येथील तनवरनगर भागात मनसेच्या वाहतूक सेनेच्या कार्यालयावर शुक्रवारी मध्यरात्री तीन जणांनी दगडफेक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी शाहजाद शेख (२२), शेहजान आगा (२६) आणि मोहम्मद शफीक (२६) या तिघांना ताब्यात घेतले आहे. गर्दुल्ल्यांनी हा प्रकार केल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली.
तनवरनगर येथे मनसेच्या वाहतूक सेनेचे कार्यालय आहे. काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवाजी पार्क येथे सभा झाली होती. या सभेमध्ये राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याबाबत वक्तव्य केले होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेच्या नेत्यांवरही टीका केली होती. सभेच्या दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी तनवरनगर येथील मनसेच्या वाहतूक सेनेच्या कार्यालयावरील फलक मनसेच्या पदाधिकाऱ्यास काढण्यास सांगितले होते. त्यामुळे परिसरात वातावरण चिघळले होते.
राज ठाकरे यांची सभा आता ठाणे शहरात आयोजित करण्यात आली आहे. या सभेवरूनही राष्ट्रवादी आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये समाजमाध्यमांवर वाद सुरू आहेत. त्यातच शुक्रवारी रात्री १२.३० च्या सुमारास तीन जणांनी मनसेच्या वाहतूक सेनेच्या कार्यालयावर दगडफेक केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. हे कृत्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा दावा त्यांच्याकडून केला जात होता. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासून कौसा परिसरात राहणाऱ्या शाहजाद, शेहजान आणि मोहम्मद या तिघांना ताब्यात घेतले. त्यांनी नशेत हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसशी कोणताही संबंध नसल्याचे पोलिसांनी सांगितले. परंतु या प्रकारामुळे दोन्ही पक्षांत आरोपांच्या फैरी सुरू झाल्या होत्या.
राष्ट्रवादीचा या दगडफेकीशी काहीही संबंध नाही. मनसेच्या कार्यालयाबाहेर सहा सीसीटीव्ही हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बसविले होते. कारण आम्हाला अपेक्षित होते की, कोणीतरी समाजकंटक आक्षेपार्ह कृत्य करेल आणि त्याचे आरोप राष्ट्रवादी काँग्रेसवर करण्यात येतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर निष्ठा ठेवणारा पक्ष आहे. परंतु मनसे अंगावर आलीतर त्यांना शिंगावर घ्यायला राष्ट्रवादी सक्षम आहे. त्यामुळे कोणीही वल्गना करू नये. – आनंद परांजपे, ठाणे शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छुप्या पद्धतीने हल्ले करणे थांबवावे. हिंमत असेल तर समोरून येऊन वार करावे. आम्हीही तुम्हाला तोंड देण्यास तयार आहोत. – रवी मोरे, ठाणे शहराध्यक्ष, मनसे