लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील रेल्वे स्थानक भागात ग प्रभागात आणि फ प्रभागात फेरीवाल्यांना हटविण्याची जोरदार मोहीम सुरू आहे. या सततच्या कारवाईमुळे फेरीवाले संतप्त आहेत. ग प्रभागाची कारवाई सुरू असताना दोन दिवसापूर्वी अज्ञातांनी फेरीवाला हटाव वाहनाच्या दर्शनी भागावरील काचेवर दगड मारून काचेची तोडफोड केली. तर, अन्य एका प्रकरणात एका महिला फेरीवाल्याने फेरीवाला हटाव पथकातील कामगारावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्याची तयारी केली होती. पोलिसांनी याप्रकरणात वेळीच हस्तक्षेप केल्याने संबंधितांचा डाव उधळला गेला.
डोंबिवली पूर्वेतील ग प्रभागात मुंब्रा, भायखळा, मस्जिद भागातील फेरीवाल्यांचा सर्वाधिक राबता आहे. हे फेरीवाले आक्रमकपणे या भागात व्यवसाय करण्यासाठी आग्रही आहेत. ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजयकुमार कुमावत आणि त्यांचे पथक एकही फेरीवाला रेल्वे स्थानक भागात बसणार नाही याची काळजी घेत आहेत.
आणखी वाचा-पुढील स्थानक ‘चुकीचे’! धावत्या लोकल गाड्यांमधील चुकीच्या उद्घोषणांमुळे संभ्रमावस्था
हे उट्टे काढण्यासाठी रेल्वे स्थानक भागात अनुकुल हॉटेल भागात ग प्रभागाचे फेरीवाले हटाव वाहन उभे असताना काही अज्ञातांनी वाहनाच्या दर्शनी भागावर दगडफेक करून वाहनाची मोडतोड केली. फेरीवाल्यांनीच हा प्रकार केला असण्याचा दाट संशय ग प्रभागाच्या फेरीवाला हटाव पथकातील कामगारांना आहे. याप्रकरणी ग प्रभागातील फेरीवाला हटाव पथकातील कर्मचारी सुनील वेदपाठक यांनी साहाय्यक आयुक्त कुमावत यांच्या आदेशावरून अज्ञात इसमा विरुध्द रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
या प्रकरणानंतर एका फेरीवाला महिलेने ग प्रभागातील एका कामगारावर कारवाई करत असताना विनयभंगाचा आरोप केला. या महिलेने आक्रमक पवित्रा घेत कामगारावर खोटा विनयभंगाचा गु्न्हा दाखल करण्याची तयारी केली. साहाय्यक आयुक्त कुमावत यांनी ही माहिती तातडीने रामनगर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. पोलिसांनी संबंधित महिलेचा डाव उधळला. फेरीवाल्यांचा एका गटाने ग प्रभाग साहाय्यक आयुक्त कुमावत यांची भेट घेतली. आम्हाला पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी केली. वरिष्ठांशी बोलून याविषयी निर्णय घेण्याचे आश्वासन कुमावत यांनी दिले.
आणखी वाचा-कल्याण-डोंबिवलीत मालमत्ता कर, पाणीपट्टी सवलतीची अभय योजना
फ प्रभागात साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर आणि ग प्रभागात साहाय्यक आयुक्त कुमावत यांच्याकडून दररोज आक्रमक कारवाई सुरू आहे. त्यामुळे रेल्वे स्थानक भागात फेरीवाल्यांची गाळण उडाली आहे. हे फेरीवाले कामगारांना विविध माध्यमातून त्रास देत आहेत.
ग प्रभागात फेरीवाल्यांना हटविण्याची जोरदार कारवाई दररोज सुरू आहे. या आक्रमक कारवाईमुळे फेरीवाले विविध कृत्य करून पालिका कारवाईत अडथळा आणण्याचे प्रयत्न करत आहेत. पोलीस ठाण्यात याविषयी तक्रारी केल्या आहेत. फेरीवाल्यांनी कितीही अडथळे आणले तरी हटाव मोहीम सुरूच राहणार आहे. -संजयकुमार कुमावत, साहाय्यक आयुक्त, ग प्रभाग.
© The Indian Express (P) Ltd