लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोंबिवली: डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी आणि रेल्वे स्थानकात येजा करणाऱ्या प्रवाशांना होणाऱ्या त्रासाचा विचार करुन वाहतूक विभागाने रिक्षा चालकांना रेल्वे स्थानकाच्या प्रवेशव्दारापासून ५० मीटर अंतरापर्यंत रिक्षा चालकांना मज्जाव केला आहे.

वाहतूक विभागाच्या या निर्णयामुळे डोंबिवली पश्चिम पंडित दिनदयाळ चौक, विष्णुनगर जुन्या पोलीस ठाण्यासमोर होणाऱ्या रिक्षा चालकांच्या गर्दीला पूर्णविराम मिळणार आहे. गेल्या आठवड्यात वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी रेल्वे स्थानकासमोरचे प्रवेशव्दार अडवून रिक्षा उभ्या करणाऱ्या, तेथून प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून कारवाई करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर पोलीस निरीक्षक गित्ते यांनी रेल्वे स्थानकापासून किमान ५० मीटर अंतरावर रिक्षा चालकांना प्रवासी घेणे आणि सोडण्याचे बंधन घातले आहे. या निर्णयाचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षी चालकांवर कारवाई करण्यात येणार आहे.

आणखी वाचा-मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातही राज-उद्धव एकत्र येण्यासाठी फलकबाजी

डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानका जवळील विष्णुनगर प्रवेशव्दार, दिनदयाळ रस्ता भागातील प्रवेशव्दारावर अनेक रिक्षा चालक वाहतूक पोलिसांची नजर चुकवून नियमबाह्य प्रवासी वाहतूक करतात. या रिक्षा रस्त्यावर उभ्या राहत असल्याने येजा करणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होतो. शहरातील मुख्य वर्दळीचा भाग अनेक वेळा वाहन कोंडीत अडकतो. पश्चिम रेल्वे स्थानक भागातील हा वाहन कोंडीचा विषय कायमचा संपविण्यासाठी वाहतूक विभागाने रिक्षा चालकांना रेल्वे स्थानकाच्या प्रवेशव्दारापर्यंत येण्यास मज्जाव केला आहे.

रिक्षा संघटनांनी वाहतूक विभागाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात प्रवासी सोडणे आणि घेण्याचे फलक वाहतूक विभागातर्फे महात्मा फुले रस्ता, घनश्याम गुप्ते रस्ता, पंडित दिनदयाळ रस्ता भागात लावले आहेत. एखादा रिक्षा चालक हा नियम मोडून रेल्वे स्थानकाजवळ आला तर तेथील गस्तीवरील वाहतूक पोलीस संबंधित चालकाला दंड ठोठावत आहे.

आणखी वाचा- ठाण्यातील शिंदे गटाला आनंद परांजपे नकोसे

डोंबिवली पूर्व भागात बहुतांशी रिक्षा वाहनतळ रेल्वे प्रवेशव्दारापासून २५ फूट ते ६० मीटर अंतरावर आहेत. त्यामुळे पूर्व भागापेक्षा पश्चिम भागात रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर रिक्षा उभ्या कराव्यात अशी अनेक वर्षापासून प्रवाशांची मागणी होती. वाहतूक विभागाच्या निर्णयामुळे ती पूर्ण झाली आहे. पोलीस निरीक्षक गित्ते यांनी शहरातील वाहन कोंडी टाळणे, वाहतुकीत सुसुत्रता येण्यासाठी शहरातील काही रस्ते एक दिशा मार्ग, सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून रिक्षांवर नजर असे काही महत्वाचे निर्णय घेतल्याने प्रवासी समाधान व्यक्त करत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stop rickshaws 50 meters from railway station in dombivli west mrj
Show comments