कल्याण शहरातील मुख्य वर्दळीच्या बैलबाजार ते शिवाजी चौक, लालचौकी दरम्यान महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे रस्तारूंदीकरण आणि काँक्रिटीकरणाची कामे सुरू आहेत. पावसाळ्यात ही कामे सुरू राहिली तर अभूतपूर्व वाहतूक कोंडी आणि प्रवाशांना मनस्ताप होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पावसाळ्याच्या चार महिन्यात ही कामे थांबवा, असे पत्र ठाणे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता शशिकांत सोनटक्के यांना पाठविले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण-शीळफाटा २१ किमी रस्त्याच्या रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणाची कामे एमएसआरडीसीतर्फे टप्प्याने सुरू आहेत. ही कामे काटई नाका, सूचक नाका, लाल चौकी, बैलबाजार भागात सुरू आहेत. ज्या भागात भूसंपादन आणि रुंदीकरणाला अडथळा नाही, तेथे महामंडळातर्फे तातडीने काम सुरू केले जाते. कल्याण शहरात बैल बाजार, लालचौकी भागात गेल्या वर्षापासून काँक्रिटीकरणाची कामे सुरू आहेत. कल्याण मधील बैलबाजार, शिवाजी चौक, सहजानंद चौक, अहिल्याबाई चौक, लाल चौकी हा सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे.या रस्त्यावरील बैल बाजार, लालचौकी भागात रस्ते काम सुरू आहेत. पुढील टप्प्यातील शिवाजी चौक, सहजानंद चौक, अहिल्याबाई चौकातील कामे पावसाळ्यात सुरू राहिली तर या रस्त्यांवर वाहन कोंडी होईल. शहरांतर्गत वाहतूकही विस्कळीत होईल. पुढील आठवड्यात शाळा सुरू होणार आहे. मुलांना वेळेत शाळेत पोहचणे, घरी येणे तितकेच गरजेचे आहे. त्यामुळे कल्याण शहरांतर्गत रस्ते कामे पावसाळ्यानंतर करण्यात यावी, अशी सूचना उपायुक्त पाटील यांनी महामंडळाला केली आहे.

वाहतुकीला काँक्रिटीकरण कामाचा अडथळा –

शिवाजी चौक परिसरात घाऊक बाजारपेठ आहे. बाजार समिती परिसर याच रस्त्यावर आहे. दररोज बाजार समितीत सुमारे ८०० भाजीपाला, मालवाहू ट्रक या भागात येतात. धान्य बाजारात मालवाहू ट्रकची येजा सुरू असते. या वाहतुकीवर रस्ते कामाचा परिणाम होण्याची शक्यता अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे. कल्याण शहराचे मुरबाड रस्ता, पारनाका परिसर कल्याण-शीळफाटा रस्त्याला छेदून एकमेकांना जोडले आहेत, या पोहच रस्त्यावरील वाहतुकीला रस्ते काँक्रिटीकरण कामाचा अडथळा येण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली.

कामे संथगतीने सुरू –

शहरांतर्गत कामे सुरूच राहिली तर वाहतूक विभागाचा निम्मा कर्मचारी वर्ग या भागात तैनात करावा लागेल. कल्याण रेल्वे स्थानक भागात स्मार्ट सिटीतर्फे परिसर विकासाचे काम गेल्या वर्षापासून सुरू आहे. ही कामे संथगतीने सुरू असल्याने दररोज वाहतूक कोंडीला प्रवाशांना सामोरे जावे लागते. तशी परिस्थिती शिवाजी चौक भागात होऊ नये म्हणून वाहतूक विभागाने विशेष काळजी घेतली आहे.

पाऊस सुरू झाला तरी आहे ती कामे पूर्ण करून पुढच्या कामापर्यंत थांबतो –

“कल्याणमध्ये बैलबाजार भागात जी कामे सुरू आहेत. ती कामे पूर्ण करून द्यावीत. अर्धवट कामे ठेवली तर पुन्हा रस्ते काम आणि वाहतुकीवर परिणाम होईल. ही कामे रेंगाळली तर पुन्हा पुढील कामाच्या टप्प्यावर त्याचा परिणाम होईल. जून अखेरपर्यंत बैलबाजार, लालचौकी भागात सुरू असलेली कामे पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. पाऊस सुरू झाला तरी आहे ती कामे पूर्ण करून पुढच्या कामापर्यंत थांबतो,’ असे वाहतूक विभागाला कळविले आहे.” असे मुख्य अभियंता सोनटक्के यांनी सांगितले.

पावसाळ्यात या कामांमुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता – बाळासाहबे पाटील

“कल्याण शहरांतर्गत एमएसआरडीसीची सुरू असलेली कामे थांबवा असे सुचविले आहे. पावसाळ्यात या कामांमुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. तीन महिन्यानंतर उर्वरित कामे सुरू करा असे सचुविले आहे.” असे वाहतूक विभागाचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सांगितले आहे.

तीन महिन्यानंतर उर्वरित कामे हाती घेऊ – शशिकांत सोनटक्के

“कल्याणमधील सुरू असलेली कामे जून अखेरपर्यंत पूर्ण करणार आहोत. ही कामे अर्धवट ठेऊन दिली तर पुन्हा ही कामे हाती घेताना अडचणी येण्याची शक्यता आहे. सुरू असलेली कामे पूर्ण करून तीन महिन्यानंतर उर्वरित कामे हाती घेऊ.” असे एमएसआरडीसीचे मुख्य अभियंता शशिकांत सोनटक्के म्हणाले आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stop road widening and concreting work through shivaji chowk in kalyan letter from thane transport department to msrdc msr
Show comments