कल्याण – कल्याण-डोंबिवली शहरात धुळ प्रदूषण रोखण्यासाठी पालिका प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून धूळ प्रतिबंधक उपाययोजना करित नसलेल्या नवीन गृह प्रकल्प, पुनर्विकास गृहप्रकल्पांना कामे थांबविण्याच्या नोटिसा साहाय्यक आयुक्तांनी देण्यास सुरूवात केली. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या नवनियुक्त आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी दिलेल्या आदेशानंतर पालिका प्रशासनाने ही कारवाई सुरू केली आहे.
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत धूळ प्रतिबंधक उपाययोजनांचे काटेकोर पालन झाले पाहिजे. धूळ प्रतिबंधक उपाययोजना करण्यास टाळाटाळ करणाऱ्या गृहप्रकल्पाच्या विकासकांवर दंड आणि कठोर कारवाई करा, असे आदेश आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी सोमवारच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिले. या आदेशानंतर पालिका हद्दीतील धूळ प्रतिबंधक उपाययोजना करित नसलेल्या नवीन गृह प्रकल्प, पुनर्विकास गृहप्रकल्पांना कामे थांबविण्याच्या नोटिसा साहाय्यक आयुक्तांनी देण्यास सुरूवात केली. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत धुळीचे प्रदूषण होणार नाही याची काळजी प्रत्येक बांधकाम ठेकेदार, विकासकाने घ्यावयाची आहे. धुळीच्या प्रदूषणावर थेट उच्च न्यायालयाचे लक्ष आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत हवेची गुणवत्ता वाढेल यादृष्टीने प्रत्येकाने प्रयत्न करावेत, अशा सूचना आयुक्त डाॅ. जाखड यांनी केल्या. जे गृहप्रकल्पधारक याविषयी टाळाटाळ करत असतील त्यांच्यावर कठोर कारवाई सुरू करा, असे आदेश आयुक्तांनी दिले.
येत्या दोन दिवसांत धूळ प्रतिबंधक नियमांची कठोर अंमलबजावणी करा. बांधकाम साहित्य वाहून नेणारी वाहने धूळ प्रतिबंधक नियमांचे पालन करत नसतील तर प्रादेशिक परिवहन विभागाच्या माध्यमातून त्यांच्यावर कारवाई होईल, यादृष्टीने कार्यवाही करा, अशा सूचना डाॅ. जाखड यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. प्रदूषणकारी वाहनांची माहिती आरटीओ विभागाला दिली आहे, असे पर्यावरण आणि प्रदूषण नियंत्रण विभागाच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांनी बैठकीत सांगितले.
गृह प्रकल्पांवर बंदी
कल्याण पश्चिमेत शिवाजी चौकात वर्दळीच्या रस्त्यावर साई कृष्णा गृहप्रकल्पाच्या ठिकाणी धूळ नियंत्रणासाठी उपाययोजना केल्या नाहीत आणि बांधकाम सुरू ठेवल्याने क प्रभागाचे साहाय्यक आयुक्त तुषार सोनवणे यांनी या प्रकल्पाचे बांधकाम बंद करण्याची नोटीस संबंधित विकासकाला दिली. डोंंबिवली पूर्वेत टंडन रस्त्यावर साखरी गणेश सोसायटी ही इमारत पुनर्विकासासाठी तोडली जात असताना धूळ नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना केल्या नाहीत, यामुळे ग प्रभाग साहाय्यक आयुक्त सोनम देशमुख यांनी या इमारतीचे तोडकाम थांबविण्याची नोटीस बजावली आहे.
२६ विकासकांना नोटिसा
गृहप्रकल्पाच्या ठिकाणी तातडीने धूळ प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात म्हणून आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी दोन, ई प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी चार, ब प्रभागाचे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी १० विकासक, फ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप यांंनी पाच, जे प्रभागाच्या सविता हिले यांनी चार गृहप्रकल्प मालकांना नोटिसा बजावल्या आहेत. डोंबिवलीत ह प्रभागात रेल्वे मैदानाजवळील गणेश नगर पोलीस चौकी येथे काँक्रिट रस्त्याचे काम सुरू आहे. या भागात दररोज सायंकाळी वाहतूक कोंडी होऊन धूळ प्रदूषण होते. नवापाडा भागातील सुभाष रस्ता भागात धूळ प्रदूषणाचे प्रमाण अधिक आहे. याठिकाणी पाणी फवारण्याची मागणी नागरिक करत आहेत.
“धूळ प्रतिबंधक उपाययोजना तत्काळ अंमलात आणा. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा. ” – डाॅ. इंदुराणी जाखड, आयुक्त.