अबिद सुरती यांच्याकडून मीरा-भाईंदरमधील शेकडो रहिवाशांची मोफत नळ दुरुस्ती; पाणी वाचवण्यासाठी ‘ड्रॉप डेड’ संस्थेची स्थापना
राज्यात भीषण दुष्काळ पडला असल्याने पाण्याचा प्रत्येक थेंब आणि थेंब महत्त्वाचा आहे. पण शहरी भागात अनेकांच्या घरात नळ गळत असतात आणि त्यातून किती तरी लिटर पाणी वाया जात असते. या गळक्या नळांकडे नेहमीच दुर्लक्ष होते, पण ते दुरुस्त करण्याची तसदी कधीही घेतली जात नाही.. ही तसदी घेतली आहे आबिद सुरती नावाच्या ८० वर्षीय ‘जलमित्रा’ने. वय झाले तरी आराम न करता सुरती हे दर रविवारी एक प्लंबर सोबत घेतात आणि मीरा-भाईंदरमधील प्रत्येक रहिवाशाच्या घरी जाऊन गळणारा नळ शोधून त्याची दुरुस्ती करतात, तीही मोफत. पाण्याचा प्रत्येक थेंब सत्कारणी लागावा या जाणिवेतूनच हे सत्कृत्य करीत असल्याचे सुरती सांगतात.
मीरा रोडला राहणारे आबिद सुरती व्यवसायाने लेखक, चित्रकार. लहानपणी त्यांच्या आईने केवळ पाण्याच्या एका बादलीसाठी कित्येक तास रांगेत उभे राहाण्याचे घेतलेले कष्ट त्यांनी जवळून अनुभवले आहेत. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व त्यामुळेच त्यांच्या संवेदनशील मनावर कोरले गेले. जेव्हा गळणारा एखादा नळ आणि त्यातून वाया जाणारा पाण्याचा थेंब त्यांच्या समोर येतो, तेव्हा पाण्याचा तो थेंब मस्तकावर हातोडय़ाचा प्रहार करीत असल्याची अनुभूती त्यांना होत असते. हे पाणी वाचवावे, वाया जाणारा प्रत्येक थेंब सत्कारणी लागावा ही तळमळ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. या तळमळीतूनच जन्माला आली सुरती यांची ‘ड्रॉप डेड’ ही स्वयंसेवी संस्था. पाण्याचा थेंब वाया घालवाल, तर एक दिवस मरणाला सामोरे जाल हे जळजळीत सत्य एकमेव सदस्य असलेल्या या संस्थेच्या माध्यमातून लोकांसमोर न्यायचे त्यांनी ठरवले. नळ दुरुस्त करणारा एक प्लम्बर सोबत घ्यायचा, घराघरांत जाऊन लोकांचे नळ दुरुस्त करायचे आणि त्यांना पाणी बचतीचा संदेश द्यायचा, अशी ही मोहीम त्यांनी २००७ मध्ये सुरू केली.
सुरुवातीला लोकांकडून प्रतिसादच मिळत नसे. मात्र अबिद हिम्मत हरले नाहीत. गेल्या नऊ वर्षांत गळणाऱ्या नळातून वाया जाणारे किती तरी लिटर पाणी वाचविण्यात सुरती यांना यश मिळाले आहे. आजही सुरती यांनी दर रविवारचे तीन तास नळ दुरुस्तीच्या कामासाठी राखीव ठेवले आहेत.
धार्मिक वचनांचा वापर
लोकांवर धर्माचा फार मोठा पगडा असतो. त्यातील वचने, श्लोक यांचा खोलवर परिणाम भक्तांवर होत असतो. पाणी बचतीसाठी याचाच खुबीने उपयोग करण्याचे सुरती यांनी ठरवले आहे. मोहम्मद पैगंबर यांचा ‘अगर आप नहर के किनारे बैठे हो तब भी तुम्हें पानी जाया करने का हक नही है,’ हा संदेश लिहिलेली भित्तिपत्रके तयार करून सर्व मशिदींमधून ठळकपणे दिसेल, अशा पद्धतीने लावण्यात येणार आहेत. हिंदू भक्तांमध्येही गणपतीला मानणार फार मोठा वर्ग आहे. विशेष करून महाराष्ट्रात गणेशोत्सवाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे गणेशाची मूर्ती असलेली भित्तिपत्रके छापून त्याखाली, ‘पाणी नाही तर माझे विसर्जन नाही,’ अशी ओळ देऊन ही भित्तिपत्रके सर्व मंदिरात लावण्यात येणार आहेत.