सुहृदच्या मीटिंगमध्ये अनेक महत्त्वाच्या आणि जिव्हाळ्याच्या विषयांची चर्चा होत असते. कधी शुभार्थीनी औषध घ्यायला नकार दिला तर काय करायचे यावर, लग्नाचे वय झाले आहे पण प्रत्यक्ष लग्न करण्याची परिस्थिती नाही तर कसे समजावयाचे यावर, तर स्वत:वर येणाऱ्या वेगवेगळ्या ताणांबद्दल चर्चा, तर कधी कुटुंबातील इतर सदस्यांच्या असहकारामुळे होणाऱ्या त्रासाबद्दल मन मोकळे करणे. आम्ही सगळे या प्रवासात एकमेकांपासून खूप काही शिकत आहोत. सुहृद स्वमदत गटाला येणाऱ्या शुभंकरांमध्ये काही जण गेली दहा वर्षे सातत्याने येत आहेत. काही सदस्य अधूनमधून येतात. कोणालाही नियमित येण्याचे बंधन नाही. जेव्हा पहिल्यांदा शुभंकर येतात तेव्हा त्यांना आपल्याबद्दल आणि आपल्या शुभार्थीबद्दल बोलायची संधी दिली जाते. आम्ही सर्व जण समजावून घेतो की, त्यांची नक्की समस्या काय आहे. जुने शुभंकर आपले अनुभव सांगतात. त्यातूनही खूप शिकायला मिळते. प्रत्येकाने दुसऱ्याचा केलेला विनाअट स्वीकार हीच या स्वमदत गटाची ताकद आहे.
या स्वमदत गटात यशाचे महत्त्वाचे कारण त्याच्या बांधणीमध्ये आहे. असा गट असावा याची गरज शुभंकरांना वाटली आणि त्यांनी एकत्र येऊन हा गट स्थापन केला. या गटाचे दुसरे वैशिष्टय़ म्हणजे या गटात स्वयंसेवी शुभंकर अर्थात स्वयंसेवक ज्याच्या घरी कोणालाही कुठल्याही प्रकारचा मानसिक आजार नाही, पण त्यांना अशा रुग्णांबद्दल आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल मनापासून आस्था आहे. हे स्वयंसेवी शुभंकर प्रामुख्याने आमच्या त्रिदल या शुभार्थीच्या त्रिदल नावाच्या कार्यशाळेत सेवा देण्यासाठी येतात आणि मग सुहृदचे सभासद बनतात. रुग्णाचे शुभंकर आणि स्वयंसेवी शुभंकर या दोघांच्या मैत्रीमुळेच हा स्वमदत गट दिवसेंदिवस सुदृढ होत आहे.
(सुहृद गटाची सभा महिन्याच्या पहिल्या शनिवारी संध्याकाळी ६.०० वाजता आयोजित करण्यात येते. सहभागासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. स्थळ- आयपीएच, ९ वा मजला, गणेश दर्शन टॉवर्स, हरी निवास सर्कल, नौपाडा, ठाणे.) माहितीसाठी संपर्क –
अस्मिता- ९७६९८०३१४०, मीरा- ९७६६०३१९५०
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा