उल्हासनगर: उल्हासनगरच्या कॅम्प एक भागात पिसाळलेल्या एका भटक्या श्वानाने काही तासातच सहा जणांवर हल्ला करून त्यांचे लचके तोडण्याची घटना समोर आली आहे. या घटनेत दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. या प्रकारानंतर उल्हासनगरातील भटक्या श्वानांचा प्रश्न गंभीर बनला आहे. आठवड्यात तब्बल २२ जणांना चावा घेतल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. भटक्या श्वानांवर निर्बीजीकरण प्रक्रिया करुन त्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्याची मागणी जोर धरते आहे.
गेल्या काही वर्षात भटक्या श्वानांची संख्या वाढली आहे. अस्वच्छता, जागोजागी उघड्यावर फेकले जाणारे उरलेले अन्न, खाद्यपदार्थ यावर या भटक्या श्वानांची गुजराण होते. आज जवळपास सर्व शहरांमध्ये भटक्या श्वानांचा प्रश्न गंभीर बनला आहे. रस्ते, चौक, रहिवाशी संकुले यांच्या बाहेर या श्वानांची संख्या वाढल्याचे दिसून येते. टोळीने बसणारे हे श्वान अनेकदा एकट्या व्यक्तीवर हल्ला चढवतात. रात्री उशिराने घरी परतणारे नोकरदार, पहाटे लवकर जाणारे विद्यार्थी, प्रवासी पादचारी आणि फेरफटका मारणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांवर अनेकदा या टोळ्या हल्ला करतात. त्यामुळे जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. उल्हासनगर शहरातही अशाच भटक्या श्वानांनी सहा जणांवर हल्ला केल्याची खळबळ जनक घटना समोर आली आहे.
उल्हासनगरच्या कॅम्प एक भागात वीर तानाजी नगरमध्ये सोमवारी सकाळी एका पिसाळलेल्या श्वानाने सहा जणांवर हल्ला चढवला. यात रंजना सोनवणे आणि कोकिळा जोगदंड या महिला गंभीररीत्या जखमी झाल्या आहेत. त्यांच्या पायाचे लचके तोडण्यात आले असून त्यांना गंभीर जखमा झाल्या आहेत. या हल्ल्यात कोकिळा जोगदंड यांच्या पायाचे हाड मोडले असून त्यांना कॅम्प तीन भागातील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर भटक्या श्वानाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या रंजना सोनवणे यांना कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार दिले जात आहेत. गेल्या काही वर्षात श्वानांच्या निर्बीजीकरण करण्याकडे स्थानिक पालकांनी दुर्लक्ष केले. अनेक पालिकांना यासाठी सक्षम संस्था मिळत नाहीत. ज्या संस्था कार्यरत आहेत त्या नीटपणे काम करत नाहीत. त्यामुळे भटक्या श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. अंबरनाथ आणि बदलापूर शहरात भटक्या श्वानांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांची संख्या मोठी आहे. उल्हासनगर शहरातही जागा तीच परिस्थिती उद्भवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.