कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील गोळवली, सोनारपाडा भागातील पथदिवे मागील दोन महिन्यांपासून बंद आहेत. वर्दळीच्या रस्त्यावरील पथदिवे असल्याने या भागातील नागरिकांना अंधारातून प्रवास करावा लागतो. रस्त्यावर अंधार असल्याने वाहन चालकांना काळजीपूर्वक वाहन चालवावे लागते. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अंतर्गत शिळफाटा रस्त्याच्या दुतर्फा पथदिवे लावण्याची कामे करण्यात आली आहेत. या दिव्यांची देखभाल, दुरुस्ती एमएसआरडीसीच्या ठेकेदाराकडून करणे अपेक्षित आहे. या रस्त्यावरील सोनारपाडा, गोळवली भागातील पथदिवे मागील दोन महिन्यांपासून बंद आहेत. स्थानिक नागरिकांनी पालिकेकडे तक्रारी केल्या. त्यांनी हा विषय एमएसआरडीसीच्या अखत्यारित आहे. तेथे संपर्क करण्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा >>> कल्याणमध्ये गुंतवणूकदारांची वाढीव व्याजाच्या आमिषाने नऊ कोटीची फसवणूक
एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांना स्थानिक रहिवाशांनी संपर्क केला. ते संपर्काला प्रतिसाद देत नाहीत, अशा तक्रारी आहेत. या परिसरातून नियमित प्रवास करणाऱ्या डॉक्टर शुभदा साळुंके यांनी या वृत्ताला दुसरा दिला. एमएसआरडीसीच्या मुंबईतील कार्यालयात जाऊन तक्रार करणे स्थानिक रहिवाशांना शक्य होत नाही. त्यामुळे अंधारातून गोळवली, सोनारपाडा परिसरातील नागरिकांना प्रवास करावा लागतो. शहरी भागात व्यवसाय करुन रात्रीच्या वेळेत अनेक विक्रेते सायकलवरुन या अंधाऱ्या रस्त्यावरुन येजा करतात. एखाद्या अवजड वाहन चालकाला सायकल स्वार दिसला नाही तर अपघात होण्याची भीती स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा >>> ठाणे रेल्वे स्थानकात एल्फिन्स्टन दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती , अरुंद जिन्यामुळे दररोज होत आहे चेंगराचेंगरी
मिळालेली माहिती अशी की, एका लोकप्रतिनिधीच्या नातेवाईकाला निविदा प्रक्रिया न करता शिळफाटा रस्त्यावरील पथदिवे बसविण्याचे कंत्राट देण्यात आले. हा कंत्राटदार उप कंत्राटदाराकडून कामे करून घेतो. केलेल्या कामाचे पैसे वेळेत देत नाही. त्यामुळे काम केलेला ठेकेदार काम अर्धवट सोडून निघून जातो. अशाप्रकारे या रस्त्याचे काम करणारे चार ते पाच उप ठेकेदार काम सोडून निघून गेले आहेत. त्यामुळे शिळफाटा रस्त्यावरील काही भागातील पथदिवे सुरू, काही बंद असे चित्र या रस्त्यावर आहे, अशी माहिती या क्षेत्रातील एका जाणकाराने दिली. काही स्थानिक नेत्यांना ठेकेदार, उप कंत्राटदार माहिती आहेत. पण लोकप्रतिनिधीचा ठेकेदार असल्याने बोलणार कोण, असे प्रश्न स्थानिक पदाधिकाऱ्यांना पडले आहेत. कंत्राटदाराला पथदिवे का बंद म्हणून जाब विचारला तर संबंधित लोकप्रतिनिधीकडून कानउघडणी होण्याची भीती पदाधिकाऱ्यांना वाटते.