डोंबिवली – येथील एमआयडीसी भागातील सिस्टर निवेदिता शाळा परिसरातील रस्त्यावरील दिवे मागील १५ दिवसांपासून बंद आहेत. रहिवाशांनी हे पथदिवे सुरू करावेत म्हणून पालिका, एमआयडीसीत तक्रारी केल्या आहेत. त्याची दखल घेण्यात येत नाही, असे रहिवाशांनी सांगितले.
एमआयडीसीतील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता म्हणून सिस्टर निवेदिता शाळेचा रस्ता ओळखला जातो. रात्रीच्या वेळेत या रस्त्यावरून अनेक रहिवासी पायी, दुचाकी, चारचाकीवरून इच्छित स्थळी जातात. तसेच, या भागात काँक्रीटची कामे सुरू आहेत. त्यामुळे काळोखातून अडथळ्याची शर्यत पार करत पादचारी येजा करतात. ज्येष्ठ नागरिक, वृद्ध यांना या बंद वीज पुरवठ्याचा सर्वाधिक त्रास होतो. अनेक नोकरदार, व्यावसायिक, डाॅक्टर या भागात राहतात. काँक्रीटची कामे करताना रस्त्यावरील पथदिवे बंद ठेवले पाहिजेत, असा नियम नाही, असे या भागातील रहिवाशांनी सांगितले. मिलापनगर ते आजदे टिळकनगर शाळेसमोरील रस्त्याचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. त्यामुळे रहिवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे.
रस्ते ठेकेदाराला पथदिवे का बंद आहेत. रस्ते कामे कधी पूर्ण होतील, अशी विचारणा केली तर तो काही उत्तर देत नाही, असे रहिवासी सांगतात. पावसाळ्यात पथदिवे बंद राहिले तर या भागातून अडथळ्याची शर्यत पार करत कसे जायाचे, असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे. लहान मुले, महिलांची या रस्त्यावरून येजा करताना कुचंबणा होत आहे. सिस्टर निवेदिता शाळेसमोरील पथदिवे तात्काळ सुरू करावेत, अशी रहिवाशांची मागणी आहे.