दीडशे मीटर परिसरात मज्जाव करणारी ‘लक्ष्मणरेषा’

रेल्वे स्थानक परिसरातील गर्दी आणि वाहतूक कोंडीला कारणीभूत असलेल्या फेरीवाल्यांना दीडशे मीटर परिसराच्या बाहेर ठेवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार कारवाई करत ठाणे महापालिकेने स्थानकापासूनच्या दीडशे मीटर अंतरावर ‘लक्ष्मणरेषा’ निश्चित केली आहे. ही ‘लक्ष्मणरेषा’ ओलांडल्यास फेरीवाल्यांवर तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे.

ठाण्याप्रमाणेच महापालिका हद्दीतील कळवा, मुंब्रा आणि दिवा या रेल्वे स्थानक परिसरातही अशाच प्रकारची हद्द फेरीवाल्यांना निश्चित करून दिली जाणार आहे. त्यामुळे फेरीवाल्यांकडून होणारी प्रवाशांची अडवणूक थांबेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर रेल्वे स्थानक परिसरात अनधिकृतपणे व्यवसाय थाटून बसणाऱ्या फेरीवाल्यांना हटवण्याची मागणी जोर धरत होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर ठाणे स्थानक परिसरात मनसेच्या

कार्यकर्त्यांनी हल्लाबोल करत फेरीवाल्यांना पिटाळून लावले होते. त्याचदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटर अंतरापर्यंत फेरीवाल्यांना मज्जाव करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, महापालिकेने आता दीडशे मीटर अंतरावर रेषा आखली असून त्या रेषेच्या अलीकडे व्यवसाय करण्यास फेरीवाल्यांना मज्जाव करण्यात आला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे स्थानक परिसरात १५० मीटपर्यंत फेरीवाल्यांना प्रवेश करण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर पालिकेने सीमारेषा निश्चित केल्या आहेत. ठाणे रेल्वे स्थानक परिसरातही सीमारेषा आखण्यात आली असून येत्या काही दिवसांत कळवा, मुंब्रा स्थानक परिसरातही अशा रेषा आखण्यात येतील.

– संदीप माळवी, उपायुक्त, ठाणे महापालिका

Story img Loader