ठाणे– रेल्वे स्थानक परिसरासह आता, शहरातील विविध भागातील पदपथांवर फेरीवाल्यांचा विळखा वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. खाद्यपदार्थांच्या गाड्या, विविध साहित्यासह ठाण मांडून बसलेल्या या फेरीवाल्यांमुळे पदपथ अडविला जात आहे. या फेरीवाल्यांमुळे नागरिकांना पदपथावरून चालणे शक्य होत नसून नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. पदपथ हे पादचाऱ्यांसाठी बनविले जातात. परंतू, या फेरीवाल्यांमुळे रस्त्याच्या कडेने चालावे लागते. यात, अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भिती काही नागरिकांनी व्यक्त केली. महापालिका या फेरिवाल्यांवर कारवाई करण्यास का दिरंगाई करते असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.

ठाणे स्थानक परिसराला फेरिवाल्यांचा विळखा असतानाच, आता शहरातील विविध अंतर्गत रस्त्यावर तसेच महामार्गावर असलेल्या पदपथांवर दिवसेंदिवस फेरिवाले वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. गावदेवी परिसर, नितीन कंपनी, ज्ञानेश्वरनगर, कामगार नाका, अंबिका नगर, रोड क्रमांक १६ शहरातील या अंतर्गत मार्गांसह घोडबंदर भागातील माजिवडा नाका, आनंद नगर तसेच विविध भागातील पदपथांवर फेरिवाले मोठ्याप्रमाणात दिसून येतात. यामध्ये जास्तकरुन थंड पेय विक्रेते आणि खाद्यपदार्थ विक्रेते असतात. एकप्रकारे या विक्रेत्यांनी पदपथावर आपले दुकानच मांडले आहे. फेरिवाल्यांमुळे पदपथ वापरता येत नसल्याची खंत नागरिकांकडून व्यक्त होऊ लागली आहे. घोडबंदर भागातील रस्त्यावरुन मोठ्या संख्येने वाहनांची वाहतूक सुरु असते. अशा वेळी पादचाऱ्यांना रस्त्यावरुन चालणे कठीण होते.

पर्याय म्हणून त्यांना पदपथ उपलब्ध आहेत. परंतू, पदपथांवर फेरीवाले आणि त्यात त्यांच्याकडे येणारे ग्राहक यांची गर्दी असते. या गर्दीतून रस्ता काढणे कठी होते. तर, वागळे इस्टेट भागात मोठ्याप्रमाणात औद्योगिक कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे याभागात सहजरित्या व्यवसाय सुरु करु शकतो. या मानसिकतेने कामगार नाका परिसरापासून ते अगदी आशार आयटी पार्क पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील पदपथांवर मोठ्यासंख्येने विविध खाद्यपदार्थांची विक्री करणारे फेरिवाले दिसून येतात. पदपथांवर फेरिवाल्यांच्या गाड्या आणि रस्त्यावर ग्राहक त्यांची वाहने घेऊन उभे असतात. हा रस्ता वाहतूकीसाठी महत्त्वाचा असून या मार्गावरुन टीएमटीच्या बस गाड्या जातात. तसेच इतर वाहनांची वाहतूक सुरु असते. फेरिवाल्यांमुळे याठिकाणी अनेकदा वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसून येते. तर, स्थानक परिसराजवळी गावदेवी भागात वारंवार फेरिवाल्यांवर कारवाई सुरु आहे असे महापालिकेकडून सांगण्यात येत असले तरी, फेरिवाले या कारवाईकडे दुर्लक्ष करुन दररोज सायंकाळी पदपथ अडवून बसलेले असतात. या फेरीवाल्यांकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे शहरातील रस्ते आणि पदपथ फेरीवाल्यांना आंदण दिले आहेत का, असा सवाल नागरिकांकडून आता विचारला जाऊ लागला आहे.

पदपथांवर बेकायदेशिररित्या खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या गाड्या उभ्या असतात. या गाड्यांवर कारवाई करण्याचे आदेश सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. त्यानुसार, वेळोवेळी कारवाई केली जात आहे. –शंकर पाटोळे, उपायुक्त. अतिक्रमण नियंत्रण विभाग, ठाणे महापालिका.

पदपथ हे पादचाऱ्यांसाठी तयार केले जातात. परंतू, ठाणे शहरातील पदपथ फेरीवाल्यांसाठी तयार केल्याचे दिसत आहे. शहरातील विविध भागातील पदपथ सकाळ-संध्याकाळ फेरिवाल्यांनी अडविलेले असल्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यांच्या एकाबाजूने चालावे लागते. यामुळे अनेकदा अपघात होण्याची शक्यता असते. महापालिकेने याकडे विशेष लक्ष द्यावे अशी विनंती ठाण्यातील सुजाण नागरिक म्हणून मी करत आहे.- करण पोतदार, नागरिक

Story img Loader