लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली: येथील सर्वाधिक वर्दळीच्या कोपर आणि ठाकुर्ली उड्डाण पुलांवरील काही भागातील पथदिवे अनेक दिवसांपासून बंद आहेत. या पुलांवरुन येजा करताना वाहन चालकांना वाहनांच्या दिव्यांच्या उजेडातून येजा करावी लागते. अनेक वेळा प्रखर झोताचे वाहन या पुलावरुन जात असेल तर, पुलावरील मध्य मार्गिका वाहन चालकाला दिसत नाही. त्यामुळे अपघात होण्याची भीती वाहन चालकांकडून व्यक्त केली जात आहे.
डोंबिवली पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा महत्वाचा दुवा म्हणून कोपर आणि ठाकुर्ली (स. वा. जोशी शाळेजवळील) उड्डाण पूल ओळखले जातात. दोन्ही पुलांवरुन पहाटे ते रात्री उशिरापर्यंत वाहनांची वर्दळ असते. रात्रीच्या वेळेत मालवाहू वाहने शहरातून धावत असतात. या दोन्ही पुलांवरील पथदिवे मागील काही दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे वाहन चालकांना रात्रीच्या वेळे या पुलांवरुन वाहने चालविताना कसरत करावी लागते.
आणखी वाचा- कल्याणमध्ये उद्वाहनाच्या खड्ड्यात पडून मुलाचा मृत्यू
कोपर पुलावर साऊथ इंडियन शाळा दिशेकडील पथदिवे बंद आहेत. ठाकुर्ली पुलावर रेल्वे मार्गिका ते पश्चिम भागातील एकूण १० पथदिवे बंद आहेत. ठाकुर्ली पश्चिमेतून पुलावर जाताना आणि उतरताना वाहनाच्या दिव्यांच्या माध्यमातून वाहन चालक वाहने चालवितात. अनेक वेळा काही वाहनांना विशेषकरुन रिक्षांना दिवे नसतात. अशा दिवे नसलेल्या वाहनांमुळे पुलांवर अपघात होण्याची भीती वाहन चालक व्यक्त करतात.
ठाकुर्ली, गणेशनगर रेल्वे मैदान, गणेशनगर खाडी किनारा भागात डोंबिवली पूर्व भागातील अनेक ज्येष्ठ नागरिक महिला, पुरूष संध्याकाळच्या वेळेत फिरण्यासाठी येतात. ही मंडळी संध्याकाळी पुलावरुन काळोखातून येजा करतात. ठाकुर्ली पुलावर पदपथ नसल्याने पादचाऱ्यांना पुलावरील रस्त्यावरुन चालावे लागते. नागरिक, वाहन चालकांची अडचण विचारात घेऊन दोन्ही पुलांवरील पथदिवे तातडीने सुरू करावेत, अशी नागरिकांची मागणी आहे.
“दोन्ही पुलांवर पथदिव्यांची पाहणी करुन तातडीने बंद असलेले पथदिवे सुरू केले जातील.” -जितेंद्र शिंदे, उप अभियंता, विद्युत विभाग.