ठाणे- प्रवासी वाहतुकीला बळकटी देण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील विकास प्रकल्पांना बळ देण्याचा निर्णय राज्याच्या अर्थसंकल्पात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी घेतला असून त्यानुसार नव्या प्रकल्पांची घोषणा आणि सुरू असलेल्या प्रकल्पांना पूर्ण करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उन्नत मार्ग प्रस्तावित करत ठाणे बोरिवली भुयारी मार्ग, बाळकुम गायमुख किनारा मार्ग प्रकल्प पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे. रस्ते वाहतूक, जलवाहतूक, किनारा मार्गांच्या पूर्णत्वानंतर ठाणे शहर आणि आसपासच्या परिसरातील वाहतूक गतीमान होण्यास मदत होईल.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराचे प्रवेशद्वार म्हणून ठाणे जिल्हा आणि शहराला ओळखले जाते. देशातील सर्वाधिक नागरिकरण झालेला आणि होत असलेला जिल्हा म्हणूनही ठाणे जिल्ह्याची ओळख आहे. शहरांच्या वेशीपर्यंत शहरांचा विस्तार झालेला आहे. अशा परिस्थितीत गेल्या काही वर्षांपासून ठाणे शहर आणि आसपासच्या भागातील वाहतूक सुरळीत आणि गतीमान व्हावी यासाठी अनेक प्रकल्पांची पायाभरणी केली गेली आहे. वडाळा – घाटकोपर – कासारवडवली ही मेट्रो ४, ठाणे – भिवंडी – कल्याण ही मेट्रो ५ आणि कल्याण – तळोजा ही मेट्रो १२ मार्गिका रेल्वे वाहतुकीला मोठा पर्याय ठरणार आहेत. त्याचवेळी भुयारी मार्ग, किनारी मार्ग, उन्नत मार्ग, खाडी पूल, महामार्गाचे विस्तारीकरण, उड्डाणपुलांची निर्मिती केली जाते आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी मांडलेल्या अर्थसंकल्पातही ठाणे जिल्ह्यासाठी वाहतूक आणि दळणवळणाला गती देण्यासाठी काही प्रकल्पांची घोषणा केली. त्याचवेळी सुरू असलेल्या प्रकल्पांच्या पूर्णत्वाचा निर्णय घेण्यात आला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दृष्टीक्षेपात आले आहे. या विमानतळाला ठाणे शहराशी जोडण्यासाठी उन्नत मार्ग उभारण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्याद्वारे ठाणे, डोंबिवली, कल्याण व अन्य महत्वाची शहरे विमानतळाशी सुलभरित्या जोडली जातील. या उन्नत मार्गामुळे ठाणे नवी मुंबई ही वाहतूक अधिक गतिमान होण्यास मदत होणार आहे. नवी मुंबई आणि ठाणेपल्याडची शहरे एकमेकांना जोडण्यासाठी काटई – ऐरोली उन्नत मार्गाची उभारणी प्रगतीपथावर आहे. त्याचवेळी नवी मुंबई ते थेट बदलापूर अशा नव्या उन्नत मार्गाच्या उभारणीसाठी एमएमआरडीए काम करते आहे. त्यामुळे या तीन उन्नत मार्गांमुळे ठाणे – नवी मुंबई आणि ठाणेपल्याडची शहरे असा प्रवास अधिक सोपा होणार आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचे ९९ टक्के काम पूर्ण झाले आहे. यापूर्वी इगतपुरी ते नागपूर हा टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. येत्या काही दिवसात आमणे ते इगतपुरी असा ७६ किलोमीटरचा शेवटचा टप्पा वाहतुकीसाठी खुला होणार असून त्यामुळे संपूर्ण महामार्ग वाहतुकीसाठी उपलब्ध होईल. यासाठी ६४ हजार ७५५ कोटी रूपये खर्च झाले आहेत. तर ठाणे ते बोरिवली या भुयारी मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. ठाणे शहरातील बाळकुम ते गायमुख असा १३.४५ किलोमीटर लांबीच्या किनारी मार्गासाठी ३ हजार ३६४ रूपये खर्चाची तरतूद असून हे काम २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पांच्या पूर्णत्वानंतर ठाणे शहर आणि परिसरातील वाहतूक गतीमान होऊन प्रवास सुखकर होण्याची आशा आहे.

ठाण्यात संदर्भ सेवा रूग्णालय

सोमवारी मांडलेल्या अर्थसंकल्पात ठाणे शहरात २०० खाटांचे संदर्भ सेवा रूग्णालय उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे.