कल्याण – आपल्या रुग्णालयात दुर्बल घटकातील रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. अशाप्रकारचा देखावा आणि बनावट कागदपत्रे तयार करून कल्याण जवळील आंबिवली येथील गणपती मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या तीन डाॅक्टरांनी मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता मदत निधीतून दोन वर्षापूर्वी ४ लाख ७५ हजार रूपये १३ बनावट रुग्णांच्या नावे उकळले. अशाप्रकारे मुख्यमंत्री वैद्यकीय मदत निधी कक्षाची फसवणूक करणाऱ्यांवर शासनाकडून कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता मदत निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांना दिली आहे.

महाराष्ट्रातील गरजू रुग्णांना शासनाकडून तात्काळ वैद्यकीय मदत मिळावी म्हणून मुख्यमंत्री वैद्यकीय मदत निधी कक्ष महत्वाची भूमिका बजावत आहे. अशा परिस्थितीत आंबिवली मोहने येथील गणपती मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे चालक डाॅ. अुनुदुर्ग ढोणे (रा. शिव निर्मल हाईट, मोहने, आंबिवली पूर्व), डाॅ. ईश्वर पवार (धुळे), डाॅ. प्रदीप पाटील (रा. ओम गिरीधर, गौरीपाडा, कल्याण) यांनी संगनमत करून १३ बनावट रुग्णांचे प्रस्ताव तयार केले. ते रुग्ण गणपती मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात उपचार घेत आहेत, असे दाखवून मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधीतून ४ लाख ७५ हजार रूपये उकळले होते. मे २०२३ ते जुलै २०२३ या कालावधीत हा प्रकार घडला आहे. खडकपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

धक्कादायक प्रकार

गणपती मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाकडून दाखल प्रस्तावांची छाननी करताना अरविंद सोळखी आणि भगवान भदाने या दोन रुग्णांच्या अर्जाची छाननी करताना साहाय्यता निधी कक्षाला संशय आला. कक्षातील अधिकाऱ्यांनी सोळखी यांना संपर्क केला तर नालासोपारा येथे सरस्वती रुग्णालयात ते उपचार घेत असल्याचे, भदाने आंबिवलीत गणपती रुग्णालयात उपचार घेत असल्याचे आढळले. कक्षाचे तत्कालीन अधिकारी शिरीष पालव यांनी जुलै २०२३ मध्ये गणपती मल्टीस्पेशालिटीची पाहणी केली. तेव्हा डाॅ. ढोणे यांनी रुग्णांची कोणतीही नोंदवही किंवा कागदपत्रे सादर केली नाहीत. रुग्णालयात ३५ ऐवजी २५ रुग्ण खाटा होत्या. शस्त्रक्रिया गृह, आयसीयु बंद होते. त्यामधून दुर्गंधी येत होती, असे पथकाला आढळले.

जुलै २०२३ मध्ये डाॅ. अनुदुर्ग ढोणे यांना मुख्यमंत्री सचिवालयाने चौकशीसाठी बोलविले होते. ते हजर झाले नाहीत. डाॅ. ढोणे यांनी जबाबात डाॅ. ईश्वर पाटील, डाॅ. प्रदीप पाटील यांनी पॅनलवर घेण्यासाठी मदत केल्याचे म्हटले आहे. रुग्णांच्या नातेवाईकांच्या नावासमोर डाॅ. पाटील, डाॅ. पवार यांनी आपले, नातेवाईकांचे मोबाईल क्रमांक लिहून ठेवले होते. पाहणी पथक रुग्णालयात असताना डाॅ. ढोणे यांनी आपणास मुलाला शाळेतून आणण्यास जायचे आहे असे सांगून रुग्णालयातून निघून गेले ते आलेच नाहीत, असे पथकाने तक्रारीत म्हटले आहे.

मुख्यमंत्री मदत निधी कक्षातील गरीब रुग्णांच्या हक्काच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या रुग्णालय, डाॅक्टरांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा कक्ष प्रमुख नाईक यांनी दिला आहे. डाॅ. ढोणे यांच्या रुग्णसेवेविषयी अनेक तक्रारी असल्याच्या आणि ते स्थानिक वैद्यकीय संघटनेशी संबंधित नसल्याचे कल्याणमधील डाॅक्टरांनी सांगितले.