अंबरनाथः सातत्याने होणाऱ्या वायू गळतीमुळे अंबरनाथ शहरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असताना कंपन्यांवर मात्र कारवाई होत नसल्याचे चित्र होते. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या कारभारावर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. अखेर वाढत्या तक्रारीनंतर प्रदुषण नियंत्रण मंडळाने या प्रदुषणकारी कंपन्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. यात कंपन्यांना मोठ्या शिक्षेता सामना करावा लागू शकतो.

हेही वाचा >>> ठाणे: दिवाळी शिधा वाटप : जिल्ह्यात ‘आनंदाचा शिधा’ किटचे वाटप सुरू

जिल्ह्याच्या रोजगार आणि अर्थकारणात मोलाचा वाटा देणाऱ्या अंबरनाथ शहरातील औद्योगिक वसाहती अनेक दृष्टीने फायद्याच्या आहेत. मात्र या उद्योगांबाबतच्या प्रदुषणाच्या तक्रारी गेल्या काही वर्षात वाढल्या आहेत. कंपन्यांकडून सातत्याने जलस्त्रोतांमध्ये सोडले जाणारे सांडपाणी, सोडला जाणारा वायू यामुळे प्रदुषण वाढले आहेत. त्याचा थेट परिणाम वालधुनी नदीवरही झाला आहे. गेल्या काही वर्षात याच अंबरनाथ शहराच्या चारही बाजूंना रहिवासी संकुलांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यातील अनेक संकुले प्रदुषणकारी कंपन्यांच्या शेजारी उभारण्यात आल्या आहेत. या रहिवासी संकुलांना आता वायू प्रदुषणाचा सामना करावा लागतो आहे. याबाबत नागरिकांकडून वेळोवेळी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळांना तक्रार दिली जाते. मात्र कल्याण येथून अंबरनाथसारख्या शहरात येईपर्यंत या तक्रारीची तीव्रता कमी झालेली असते. अनेकदा वायू वा प्रदुषीत सांडपाणी वाहून गेलेले असते. अशावेळी कोणत्या कंपनीतून प्रदुषीत पाणी वा वायू सोडला गेला याची खातरजमा होत नाही. त्यामुळे या कंपन्या कारवाईपासून वाचतात. दोन आठवड्यापूर्वी अशाच प्रकारे रात्रीच्या सुमारास अंबरनाथच्या बी केबिन परिसरात रासायनिक वायू सोडला गेला होता. त्याची तक्रार खुद्द स्थानिक आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनीही केली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांनी हालचाली केल्या. मात्र त्यावरही ठोस काही होऊ शकलेले नाही.

हेही वाचा >>> ठाणे महापालिकेतील अधिकाऱ्यांची आयुक्तांच्या आवाहनाकडे पाठ; अनेक अधिकाऱ्यांचे सानुग्रह अनुदानासाठी मागणीचे पत्र

या तक्रारींवरून महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळावर नागरिकांचा दबाव वाढत असताना आता मंडळानेही कंपन्यांवर कारवाईसाठी हालचाल सुरू केल्याचे कळते आहे. काही दिवसात प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी कंपन्यांमध्ये धाडी घालत तपासणी केल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. अनेक कंपन्या कंपन्यांतील वायूबाबतची विशिष्ट यंत्रणा बंद ठेवत असल्याचे मंडळाच्या तपासणीत समोर आले आहे. अशा कंपन्यांची यादी तयार करून त्यांच्यावर कठोर कारवाईसाठी मंडळाने हालचाली सुरू केल्या आहेत. यापूर्वी अशा कंपन्यांना नोटीसा देऊन त्यांच्यावर तात्पुरती कारवाई केली जात होती. मात्र यामुळे मंडळावरही नागरिकांचा रोष वाढतो. त्यामुळे अशा कंपन्यांवर ठोस कारवाई करण्यासाठी तयारी सुरू असल्याची माहिती प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे नागरिकांनाही प्रदुषणकारी कंपन्यांवर कारवाईची प्रतिक्षाच आहे.

Story img Loader