ठाणे : महावितरणच्या भांडुप कार्यक्षेत्रात अदानी कंपनीस वीज वितरण परवाना देऊ नये तसेच कंपनीचे खासगीकरण करू नये यासाठी महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीचे कर्मचारी ७२ तासांसाठी संपावर गेले आहेत. ठाण्यातील लघु उद्योजकांच्या संघटनेने संपकरी कर्मचाऱ्यांना ग्राहकांचे हीत जपावे असे आवाहन करत ग्राहकांना वेठीस धरू नका अशी विनंती केली आहे. तसेच स्पर्धेच्या व जागतिकीकरणाच्या या युगात दोन काय अधिकाधिक कंपन्या आल्या तरी कमी पडतील एवढी स्पर्धा निर्माण व्हायला हवी हे एक ग्राहक म्हणून आम्हाला वाटते असे म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 ठाणे जिल्ह्यातील लघु उद्योजकांची संघटना म्हणून ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन (टिसा) काम करते. या संघटनेत जिल्ह्यातील हजारो उद्योजक सहभागी आहेत. त्यामुळे महावितरणचे घरगुती वीज ग्राहकांसोबत औद्योगिक क्षेत्रातील ग्राहकही मोठ्याप्रमाणात आहे. संपकरी कर्मचाऱ्यांमुळे वीज पुरवठा खंडीत होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्याचा औद्योगिक क्षेत्रात मोठा परिणाम होऊ शकतो.  त्यामुळे टिसा या संघटनेने कर्मचाऱ्यांना आवाहन केले आहे.

हेही वाचा >>> अखेर अंधार दाटलाच!, उमरेड, भिवापूरच्या बऱ्याच भागात वीज पुरवठा खंडित

स्पर्धेच्या व जागतिकीकरणाच्या या युगात दोन काय अधिकाधिक कंपन्या आल्या तरी कमी पडतील एवढी स्पर्धा निर्माण व्हायला हवी हे एक ग्राहक म्हणून आम्हाला वाटते. जर स्पर्धेच्या युगात ग्राहकास  स्वायत्तता हवी असेल तर ती विना निर्बंध मिळायला हवी परंतु   दबावतंत्र वापरून अशा प्रकारे ग्राहकांना वेठीस धरण्यात येऊ नये तेही महावितरण सारख्या अत्यावश्यक सेवा पुरवठा देणाऱ्या कंपनी  व्यवस्थापनानेच कर्मचाऱ्यांनी याची काळजी घ्यावी, असेही टिसा संघटनेने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा >>> नागपूर: महानिर्मितीकडून ६,१०० मेगावॅट उत्पादन, राज्यातील सकाळी ९ वाजताची स्थिती

वीज आयोगाकडे वारंवार धाव घेऊन आजवर वाटेल तशी  दरवाढ ग्राहकांवर लादली गेली आहे.  वीज वितरणामधील अनियमितता,व्यवस्थापनाकडून साहित्य पुरवठ्याची वानवा, पठाणी वसूली याला ग्राहक खरंच कंटाळला आहे. राज्यात काही ठिकाणी  मुंबई व उपनगरे ,भिवंडी इत्यादी ठिकाणी वीजपुरवठा जवळजवळ त्याच दरात खाजगी कंपन्यांमार्फत होतो  आणि तेथील ग्राहक असंतुष्ट आहेत का? तर याचे उत्तर नाही. मुंबईमध्ये जसे दोन-तीन वीज पुरवठादार आहेत त्यामुळे कधीच वीज कमी पडत नाही व अडचणी निर्माण होत नाही हा अनुभव आहे. त्याच धर्तीवर राज्यभर हे राबवायलाच हवे अशी एक ग्राहक म्हणून आमची सरकारला, आयोगाला व महावितरण कर्मचारी संघटनांना  विनंती असल्याचे टिसाने म्हटले आहे.

हेही वाचा >>> ठाण्यातील भाजप कार्यकर्ते अस्वस्थ; पदाधिकाऱ्याला मारहाण प्रकरणात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवर आरोप

कारण स्पर्धात्मक बाजारात आपोआपच ग्राहकांचे हित व योग्य बाजारभाव या दोन्हीचाही मेळ पुरवठादाराला घालावा लागेल आणि त्यातून महाराष्ट्राचा उद्योग व्यवसाय भरभराटीला येईल हे नक्की. यामुळे आमची उद्योग क्षेत्राकडून वीज कंपन्यांच्या कामगार बंधूंना, अधिकाऱ्यांना नम्र विनंती आहे की लोकशाही मार्गाने आपले म्हणने नक्की मांडा परंतु ग्राहकाला म्हणजेच उद्योगाला, विद्यार्थ्यांना, रुग्णांना, वेठीस धरून त्यांचे नुकसान होईल असा पवित्र घेऊ नका, कारण आपला विकास म्हणजेच महाराष्ट्राचा विकास हे सूत्र घेऊन ग्राहक हित जपावे असे आवाहन संघटनेने केले आहे.

आपणास माहीत आहे की जकात रद्द झाल्यावर कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आली नाही त्यामुळे स्पर्धेच्या या युगात  उत्तमोत्तम उत्तम सेवा देऊन  ग्राहकांचे हित कसे जपले जाईल याचा विचार करा.. कारण आपणही एक ग्राहक आहातच की, असे टिसाने म्हटले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Striking employees of electricity companies should not use pressure tactics to harass consumers ysh