सुट्ट्यांच्या हंगामामुळे प्रवाशांना तिकीट उपलब्ध होत नसल्याची संधी साधून कल्याण रेल्वे स्थानकात अव्वाच्या सव्वा पैसे घेऊन तिकीटं उपलब्ध करून देणाऱ्या दलालांचा सुळसुळाट झाला आहे. मुंबई, ठाणेनंतर कल्याण हे जंक्शन स्टेशन असल्यामुळे याठिकाणी लोकांची गर्दी होते. एका प्रवाशाने दलालाचं चक्क स्टिंग ऑपरेशन करुन हा प्रकार उघडकीस आणला आहे. कल्याणच्या एस. एन. दुबे या प्रवाशाने अक्षय नावाचा दलाल रेल्वे तिकीट अव्वाच्या सव्वा रुपयांना विकत असल्याचे उघड करण्याचा प्रयत्न केला.

या प्रवाशाने अक्षय नावाच्या एका दलालाचे स्टिंग ऑपरेशन केल आहे. त्यात या दलालाने चक्क २ हजार आणि ४ हजार असे भाव सांगितल्याचे तो म्हणाला. एका माणसाचे ४ हजार म्हंटले की ४ जणांचे सरळसरळ १६ हजार होतात. हे तिकीट दर सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत, असे ज्यावेळी दुबे त्या दलालाला म्हणाले. त्यावेळी अक्षय या दलालाने आपल्याला सगळ्यांना सांभाळून घ्यावं लागत असे उत्तर दिले. या प्रकारामुळे रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, हा दलालीचा गोरखधंदा रेल्वे अधिकाऱ्याचे कृपेने तर चालत नाही ना? असा संशय प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

बहुतेक प्रवासी तीन ते चार महिने आधीच रेल्वेची तिकीटं काढून ठेवतात. मात्र शाळेचे निकाल, ऑफिसच्या सुट्ट्या यांच्या तारखा नक्की नसल्यानं अनेकांचा तात्काळ बुकिंग करण्याकडेही कल असतो. ऐनवेळी तिकीट उपलब्ध न झाल्यानं अनेक जण दलालांच्या माध्यमातून तिकीटं खरेदी करतात. या दलालांचे सुट्ट्यांच्या हंगामातले भाव थक्क करणारे असे आहेत. स्लीपर क्लासच्या एका तिकिटासाठी ७०० रुपये लागत असतील, तर हे दलाल त्याचे २ हजार रुपये घेतात, शिवाय एसीच्या एका तिकिटाची किंमत जर १७०० ते १८०० रुपये असेल, तर त्याचे थेट ४ हजार रुपये मागितले जातात. असे दुबे यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून समोर आले आहे.

प्रवाशांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत त्यांना लुबाडणारी ही दलालांची टोळी मुंबई, ठाणे, कल्याण जंक्शन रेल्वे स्थानकाच्या परिसरात खुलेआमपणे वावरताना पाहायला मिळते. गावी जाणाऱ्या प्रवाशांकडे दुसरा पर्याय नसल्यानं तेही या दलालांच्या गळाला लागतात. मात्र, या दलालांवर नेमका कुणाचा आशीर्वाद आहे?  हे शोधून गोरखधंदे बंद करण्याची आवश्यकता प्रवाशी व्यक्त करत आहेत.