जागतिकीकरण आणि मुक्त व्यापार धोरणाचे वारे वाहू लागल्यानंतर इतर क्षेत्रांप्रमाणे देशातील उद्योगजगतातही त्याचे पडसाद उमटले. देशी उद्योजकांपुढे त्यातही लघुउद्योजकांपुढे बडय़ा बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या उत्पादनाशी स्पर्धा करण्याचे मोठे आव्हान होते. कारण अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आणि त्यांची उत्पादने भारतीय बाजारपेठांमध्ये सहजपणे उपलब्ध होऊ लागली. दर्जा आणि किंमत या दोन्ही आघाडय़ांवर सरस असणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी बाजारात कमालीची स्पर्धा निर्माण केली. ‘भारतीय उद्योगजगतावर संकट, देश पुन्हा पारतंत्रात जाणार’ अशा प्रकारची भाकिते वर्तवली जाऊ लागली. काही लघुउद्योजकांनी मात्र या संकटाकडे संधी म्हणून पाहिले. आत्मपरीक्षणातून स्वत:च्या उणिवा शोधत आपले उत्पादन अधिकाधिक चांगले करण्याचा प्रयत्न केला. डोंबिवलीतील लघुउद्योजक विजय सहेता त्यापैकीच एक.
तीन दशकांपूर्वी १९८३मध्ये डोंबिवली औद्योगिक वसाहतीत दोन हजार चौरस फूट जागेच्या गाळ्यात त्यांनी विविध उपकरणांसाठी लागणाऱ्या वीजपुरवठय़ाचे व्यवस्थापन करणारे कनेक्टर्स बनविण्यास सुरुवात केली. उच्च दाबाच्या विजेवर चालणारी विविध उपकरणे, यंत्रे आणि प्रकल्पांच्या किमतीच्या तुलनेत कनेक्टर्स ही तशी अतिशय मामुली बाब. अगदी सात-आठ रुपयांत मिळणारी. मात्र ती तकलादू असेल तर त्यामुळे कोटय़वधी रुपयांचे नुकसान आणि अमूल्य वेळ वाया जाऊ शकतो. त्यामुळे सहसा कनेक्टर्स विकत घेताना कुणीही तडजोड अथवा जोखीम पत्करीत नाही. नव्याने या व्यवसायात आलेल्या विजय सहेता यांना ही गोष्ट लगेच लक्षात आली. आपल्याला कनेक्टर्स विकायचे असतील, तर त्याचे रीतसर ब्रँडिंग करण्यावाचून अन्य पर्याय नाही, हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्या वेळी बाजारात उपलब्ध असलेल्या मोठय़ा ब्रँडमध्ये नेमके काय विशेष आहे, याचा अभ्यास करून त्या दर्जाचे कनेक्टर्स ‘कनेक्टवेल’ या नावाने बाजारात आणले. सध्या कनेक्टवेल कनेक्टर्स भारतीय बाजारपेठेतील एक प्रमुख उत्पादक आहेच, शिवाय जगभरातील ४० देशांमध्येही ते निर्यात होते.
अभियांत्रिकी विषयाचे पदवीधर असलेल्या विजय सहेता यांनी काही काळ नोकरी करून मग चार मित्रांसमवेत कनेक्टर्स निर्मितीचा उद्योग सुरू केला. मुंबईतील चेंबूर येथे एक गाळा भाडय़ाने घेऊन १९७८ मध्ये त्यांनी त्यांचे काम सुरू केले. पुढे पाच वर्षांनंतर डोंबिवलीत कनेक्टवेल नावाने रीतसर कंपनी सुरू झाली. दरम्यान दोन मित्रांनी उद्योगातून काढता पाय घेतला. विजय सहेता आणि मोहन गुरनानी यांनी मात्र ‘कनेक्टवेल’ कनेक्टर्सचे उत्पादन सुरू ठेवले.
कनेक्टर्स हे उद्योगविश्वातील इतर यंत्र, साधनांच्या तुलनेने छोटे आणि स्वस्त असले तरी विजेरी पॅनल बोर्डसाठी अत्यंत आवश्यक असते. ‘कनेक्टवेल’ सुरू झाले, तो काळ कनेक्टर्स उत्पादनातील संक्रमणकाळ होता. कारण ऐंशी-नव्वदच्या दशकात पर्यावरणस्नेही चळवळीने जोर धरला. त्यामुळे पुनर्वापर होऊ शकेल (रिसायकल) अशा प्लास्टिकपासून जगभरात कनेक्टर्स बनविले जाऊ लागले. त्यामुळे ‘कनेक्टवेल’नेही तेच धोरण अवलंबले. कंपनीच्या स्थापनेनंतर अवघ्या पाच वर्षांनंतर १९८८ मध्ये ‘कनेक्टवेल’ला पहिली निर्यातीची ऑर्डर मिळाली. डोंबिवलीतील एका छोटय़ा उद्योगासाठी ती मोठी घटना होती. प्रश्न फक्त त्यांच्या ‘कनेक्टवेल’ कंपनीचा नव्हता, तर एका भारतीय उत्पादनाचा होता. विजय सहेता यांनी त्यांचे तंत्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांना त्याची जाणीव करून दिली. पहिली ऑर्डर यशस्वी झाली. पुढे त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.
१९९२ मध्ये त्यांना अमेरिकेची ऑर्डर मिळाली. अमेरिकेतच कोणतेही उत्पादन विकताना सुरक्षितता आणि गुणवत्तेसाठी ‘यूएल’ प्रणामपत्र अनिर्वाय असते. ‘कनेक्टवेल’ला ते मिळाले. अशाच प्रकारचे गुणवत्ता मानांकन या कंपनीने जर्मनीकडूनही मिळविले. कंपनीला ‘आयएसओ-९००१’ प्रमाणपत्रही मिळाले आहे. त्यामुळे कनेक्टर्स विश्वात ‘कनेक्टवेल’ हा आंतरराष्ट्रीय ब्रँड म्हणून नावारूपाला आला. जगभरातील अद्ययावत यंत्रणेद्वारे स्वयंचलित पद्धतीने डोंबिवलीतील कंपनीत कनेक्टर्स बनविले जातात. कंपनीचा स्वत:चा गुणवत्ता नियंत्रण आणि संरचना विभाग आहे. त्यात उत्पादनाचे वेळोवेळी परीक्षण केले जाते. त्यात काही त्रुटी असतील, तर त्यात सुधारणा केल्या जातात. काही सुधारणा असतील, तर त्यांचा अवलंब केला जातो.
१९७८ मध्ये सुरुवातीला एका गाळ्यात जेव्हा ‘कनेक्टवेल’ सुरू झाले, तेव्हा दर दिवशी ४०० कनेक्टर्स बनविले जात होते. आता २०१६ मध्ये प्रतिदिन अडीच लाख कनेक्टर्स डोंबिवलीतील कंपनीत बनविले जातात. सर्व मिळून २५० जण कंपनीत नोकरी करतात. कंपनीची गेल्या आर्थिक वर्षांतील उलाढाल ९२ कोटी रुपये होती. गुणवत्तेचा आग्रह, विश्वासार्हता आणि ब्रँडिंग यामुळे इतका मोठा पल्ला आम्ही गाठू शकलो. सातत्याने उत्तम काम केल्यानेच एवढे यश मिळाले, असे वाटते.
– विजय सहेता, व्यवस्थापकीय संचालक, कनेक्टवेल इंडस्ट्रीज प्रा. लि.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

प्रशांत मोरे

 

प्रशांत मोरे