ठाणे महापालिकेच्या हद्दीतील इमारतींना धोकादायक दर्जा देण्याचा अधिकार संरचनात्मक परीक्षकांना असताना प्रभाग समितीमधील साहाय्यक आयुक्त आणि बांधकाम अभियंते सध्या हे काम करत असल्याचा आरोप पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आला. विशेष म्हणजे, इमारत धोकादायक ठरविण्यामागे ठाण्यातील काही ठरावीक बिल्डर सक्रिय असून एखाद्या बिल्डरकडून प्रस्ताव येताच इमारत लगेच धोकादायक ठरविण्याचे उद्योग सुरू असल्याचा आरोपही विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांनी केला.
शहरातील जीर्ण इमारतींची पाहणी करून पावसाळय़ापूर्वी धोकादायक इमारतींची यादी महापालिकेतर्फे तयार करण्यात येते. पालिकेच्या प्रभाग समिती स्तरावर इमारतींची तपासणी करण्यात येते. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आणि त्याचे सहकारी इमारतींची घटनास्थळी जाऊन पाहाणी करतात आणि त्याआधारे सहायक आयुक्त धोकादायक इमारती ठरवितात, असा मुद्दा स्थायी समितीच्या बैठकीत मांडण्यात आला. एखादी इमारत धोकादायक ठरविण्याचे अधिकार संरचनात्मक परीक्षकांना असून अशा व्यक्तींचे पॅनल तयार करण्यात आले आहे. असे असतानाही प्रभाग समित्या संरचनात्मक परीक्षकांचे अहवाल ग्राहय़ धरत नाहीत, असा आरोप सदस्यांनी केला. एखादी धडधाकट इमारत धोकादायक ठरवून पुनर्विकासाच्या नावाखाली ती बांधकाम व्यावसायिकांच्या घशात घालण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप जगदाळे यांनी केला. वर्तकनगर भागातील म्हाडा वसाहतीमधील काही इमारती अशाच पद्धतीने धोकादायक ठरविण्याचे उद्योग सुरू असल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला. या मुद्दय़ावर समितीच्या बैठकीत जोरदार वाद झाला. मात्र, त्यावर प्रशासनाने काहीही उत्तर दिले नाही.
ठाणे शहरातील इमारत धोकादायक ठरविण्यामागे बिल्डर लॉबी कार्यरत असून एखादा प्रस्ताव बिल्डरांकडून आला, तर लगेच ती इमारत धोकादायक ठरविली जाते. कार्यकारी अभियंता इमारतीजवळ जातात आणि इमारतीचे प्लास्टर निघाले असेल तरी इमारत धोकादायक असल्याचे जाहीर करतात.
– हणमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते, ठाणे महापालिका