डोंबिवली – पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा कल्याण, डोंबिवलीत बुधवारी सकाळपासून विविध स्तरातून निषेध करण्यात आला. शिंदे शिवसेना, मनसे, विविध सामाजिक, हिंदू धर्म संघटना, नागरी संस्थानी डोंबिवली, कल्याण शहरांमधील मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर येऊन काळ्या फिती लावून दहशतवादी प्रवृत्तीचा तीव्र शब्दात निषेध केला.

शिक्षण संस्था, बँका, वित्तीय संस्थांनी आपल्या संस्थांच्या प्रवेशद्वारावर फलक लावून पहलगाममधील घडल्या घटनेचा निषेध केला. डोंबिवलीत टिळकनगर शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनी शाळेच्या पटांगणात एकत्र जमवून संस्थेचे पदाधिकारी आशीर्वाद बोंद्रे आणि शिक्षक, इतर पदाधिकारी, विद्यार्थी, पालक यांच्या उपस्थितीत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला.

डोंबिवलीतील पर्यटकांचा या हल्ल्यात मृत्यू झाल्याने त्यांना आदरांजली वाहण्यात आली. डोंबिवली नागरी सहकारी बँकेने बँकांच्या मुख्य प्रवेशव्दारावर दहशतवादी हल्ल्याचा निषेध करणारे फलक लावले आहेत. यापूर्वीही भारताने दहशतवाद्यांना चोख उत्तर दिले आहे. या हल्ल्यालाही तशाच पध्दतीने भारताकडून प्रत्युत्तर दिले जाईल. हा हल्ला भारत विसरणार नाही, असे डीएनएस बँकेने म्हटले आहे.

शिंदे, ठाकरे शिवसेना, मनसे, भाजप, हिंदू धर्म संघटना पदाधिकाऱ्यांनी कल्याण, डोंबिवलीतील मुख्य रस्त्यांवर जमवून दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला. दहशतवादी संघटना, त्यांचे पोशिंदे यांच्या विरुध्द घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. दहशतवाद्यांचा नायनाट केल्याशिवाय भारत स्वस्थ बसणार नाही, अशाप्रकारच्या घोषणा यावेळी देण्यात येत होत्या.

डोंबिवलीत ठाकरे गटाचे अभिजीत सावंत यांच्या पुढाकाराने हल्ल्याचा निषेध करण्यात आला. मनसेचे अध्यक्ष राहुल कामत, जिल्हाप्रमुख प्रकाश भोईर, सुदेश चुडनाईक यांच्या उपस्थितीत डोंबिवली रेल्वे स्थानक भागात दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावल्या होत्या. कल्याणमधील शिवाजी चौकात शहरप्रमुख रवी पाटील यांच्या पुढाकाराने हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. उपस्थित आंदोलनकर्त्यांनी डोंबिवलीतील मृत पर्यटकांना आदरांजली वाहिली.

पहलगाम येथील भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध. डोंबिवलीकर पर्यटकांचा या हल्ल्यात मृत्यू झाला हे अतिशय दुखद आहे. भारताने यापूर्वी अशा दहशतवादी हल्ल्यांना योग्यवेळी चोख प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे या हल्ल्याला तेवढ्याच चोखपणे केंद्र सरकार उत्तर देईल असा विश्वास आहे. रवींद्र चव्हाण, कार्याध्यक्ष, भाजप.

काश्मीरमधील पर्यटकांना घाबरविण्यासाठी दहशतवादी हल्ला पर्यटकांवर करण्यात आला. आतापर्यंत पर्यटकांना कधी लक्ष्य केले जात नव्हते. घडल्या प्रकाराची केंद्र सरकारमधील वरिष्ठ नक्कीच गंभीर दखल घेऊन दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करतील. – रवी पाटील, शहरप्रमुख, शिंदे शिवसेना कल्याण.

घडलेला दहशतवादी हल्ला हा पाकपुरस्कृत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आता याविषयी फार वेळ न दवडता या क्रूरकर्म्यांविषयी कठोर पावले उचलावीत. – राहुल कामत, शहरप्रमुख, मनसे, डोंबिवली.

डोंबिवलीतील तीन मराठी पर्यटकांची दहशतवाद्यांनी केलेली हत्या हे घृणास्पद कृत्य आहे. त्याचा धिक्कार. पर्यटकांमध्ये दहशत निर्माण करून कश्मीरला पुन्हा एकदा एकटे पाडण्याचा हा डाव आहे. भारत सरकारकडून याविषयी कठोर पावले उचलली जातीलच. माधव जोशी सामाजिक कार्यकर्ते.