मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकोद्गार ; महापालिका निवडणुकीच्या तोंडावर विद्यार्थ्यांशी संवाद
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने ‘स्मार्ट सिटी’चा मुद्दा पुन्हा उचलून धरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी कल्याण-डोंबिवलीतील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि ‘‘विद्यार्थी हे स्मार्ट सिटीचे दूत आहेत. त्यांनी मांडलेल्या कल्पना पाहता त्यांची विचारसरणी व मानसिकता हे शहर ‘स्मार्ट सिटी’ बनविण्यासाठी उपयोगी पडेल,’’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शिवसेनेसोबत काडीमोड घेतल्यानंतर मुख्यमंत्री स्वत: कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरले आहेत. कल्याण-डोंबिवलीला ‘स्मार्ट सिटी’ बनविण्यासाठी याआधी त्यांनी साडे सहा हजार कोटी रुपयांची घोषणा केली. गुरुवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांची मते जाणून घेतली. भाजपा प्रणित नमो देव संस्थेच्या वतीने प्रगती महाविद्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कल्याण-डोंबिवलीतील विविध शाळांतील ५ वी ते १० वीचे शेकडो विद्यार्थी येथे उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना स्मार्ट सिटीची संकल्पना समजावून सांगत केवळ आधुनिक तंत्रज्ञानाने नाही तर सोयीसुविधा पुरविल्यानंतर हे शहर स्मार्ट होऊ शकते. भ्रष्टाचार ही समस्या आज सर्वात मोठी समस्या असून ती नष्ट करायची आहे. केवळ पायाभूत सुविधा देऊन शहराचा विकास होणार नाही तर आर्थिक प्रकल्प उभारायचे आहेत. आयसीटीच्या माध्यमातून या योजना थेट राबविल्या जाणार आहेत. सर्वाची साथ असेल तर सर्वाचाच विकास होईल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शब्द असून त्यांच्या पावलावर पाऊल टाकत आपण एकत्र येऊन शहराला ‘स्मार्ट’ करायचे आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
’कल्याणच्या ओक हायस्कूलच्या पल्लवी गोखले हिने स्मार्ट सिटीचा आराखडा नक्की काय आहे, असा प्रश्न विचारला. ‘‘मुंबईनंतर कल्याण-डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर येथे मानव संस्थापन मोठय़ा प्रमाणात झाले. त्यामुळे या शहरांत परिवर्तन हे झाले पाहिजे. येथे उचित नागरी सुविधांची आवश्यकता असून त्या आम्ही राबविणार आहोत,’’ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
’प्रियंका मोरे हिने शहरात उद्यान तसेच मैदाने नाहीत यावर काय करणार आहात, असे विचारले. त्याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, ‘‘कल्याण-डोंबिवली शहरात ३०० एकर जागा उद्यान मैदानांसाठी आरक्षित आहेत. दुर्दैवाने केवळ ३७ एकर जागा विकसित झाली आहे. हा सर्व भाग विकसित करण्याकडे कल असेल.’’
’एका विद्यार्थीने ‘स्मार्ट सिटी’ तसे ‘स्मार्ट व्हिलेज’ का नाही, असा प्रश्न विचारताच फडणवीस यांनी ‘स्मार्ट व्हिलेज’ही महत्त्वाचे असून भाजपाने मेळघाट या गावाचा विकास करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत, असे सांगितले.
’स्मार्ट सिटी झाल्यावर नोकरीच्या संधी उपलब्ध होतील, परंतु अनूसुचित जाती-जमातींना येथे तरी संधी मिळणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर स्मार्ट सिटीच्या योजनेत जात-पात पाहिली जाणार नाही. समाजातील वंचित घटकांना विशेष प्राधान्य दिले जाते. त्यांना संधी वाढवून दिल्या पाहिजे, असे सांगितले.