विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक संकल्पनांना वाव देण्यासाठी उपक्रम
ठाण्यातील विद्यार्थ्यांना विज्ञानासंबंधीचे विविध प्रयोग करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी महापालिकेने कचराळी तलाव परिसरात माजी राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम यांच्या नावाने सुरू केलेल्या कल्पकता केंद्राचा गुरुवारी शुभारंभ करण्यात येणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून विविध प्रयोगांसोबतच रोबोटेकचे धडे विद्यार्थ्यांना विनामूल्य दिले जाणार असून ठाण्यात महापालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या या अभिनव प्रयोगाविषयी उत्सुकतेचे वातावरण आहे.
या कल्पकता केंद्रात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. ठाणे येथील पाचपखाडी भागातील कचराळी तलाव परिसरातील एका खोलीत हे लहानगे केंद्र उभारण्यात आले असले तरी या प्रकल्पाची यशस्विता पाहून शहरातील अन्य भागांतही असे प्रयोग सुरू करण्याचा महापालिकेचा मानस आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली. त्यामुळे कचराळीचा हा प्रयोग अनेक अर्थानी महत्त्वाचा ठरणार आहे.
सद्य:स्थितीत कचराळी तलावाच्या काठापासून जवळच महापालिकेने किमान १५ जण बसू शकतील, अशी एक खोली तयार केली आहे. त्या ठिकाणी विज्ञानाधिष्ठित प्रयोगांसाठी विशिष्ट आसनव्यवस्था करण्यात आली आहे. विज्ञानाची आवड असलेल्या विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे प्रयोग करण्यासाठी उत्तेजन मिळावे म्हणून कल्पकता केंद्रांची उभारणी केली जात आहे. पाचपाखाडी भागातील नगरसेविका रुचिता मोरे यांनी कल्पकता केंद्र उभारण्याची मागणी महापालिकेकडे केली होती. त्यानुसार महापालिका प्रशासनाने यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव तयार करून प्रभाग सुधारणा निधींतर्गत कल्पकता केंद्र उभारणीचे काम सुरू केले आहे. या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रशिक्षण दिले जाणार असून त्या ठिकाणी त्यांना विविध प्रकारचे प्रयोग करणे शक्य होणार आहे. या केंद्रामध्ये प्रवेश घेण्यासाठी आतापर्यंत शंभर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
१५ विद्यार्थ्यांची एक तुकडी
शालेय विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीमधून विज्ञान आणि तंत्रज्ञान अनुभवता यावा आणि विविध प्रयोग व प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळावी, यासाठी डॉ. अब्दुल कलाम कल्पकता केंद्र उभारण्यात येत आहे. या केंद्रामध्ये पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. पंधरा विद्यार्थी एकाच वेळी प्रशिक्षण घेऊ शकतील अशी आसन व्यवस्था केंद्रामध्ये करण्यात आली असून त्यांना विज्ञानाच्या प्रयोगासाठी महापालिकेकडून साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. या केंद्रामध्ये विज्ञान क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञांचे छायाचित्र लावण्यात आल्या आहेत. या केंद्रामध्ये विद्यार्थ्यांना आठवडय़ातून दोन तास विज्ञान, तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, रोबोटिक्स अशा विविध विषयांवरील तीन हजारहून अधिक प्रयोग स्वत:च्या हाताने करण्याची संधी उपलब्ध होणार आहे, अशी माहीती सुत्रांनी दिली.
विज्ञानाची आवड असलेल्या विद्यार्थ्यांना उत्तेजन मिळावे म्हणून कल्पकता केंद्रची उभारणी केली जात आहे. या केंद्रामध्ये विद्यार्थ्यांना विनामुल्य प्रयोग करता येऊ शकतील. ठाण्यातील ‘चिल्ड्रन टेक’ संस्थेचे पुरुषोत्तम पाचपांडे यांच्या संस्थेला दोन वर्षांसाठी हे केंद्र चालविण्यास देण्यात येणार असून त्यांच्या संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना विज्ञान तसेच तंत्रज्ञानाचे धडे दिले जाणार आहेत.
–सुहास राणे, कनिष्ठ अभियंता, ठाणे पालिका