धुंदलवाडी, चिंचणी आश्रमशाळांमध्ये आगीवरून उडी मारण्याचे प्रशिक्षण

डहाणू : भूकंप जनजागृती अभियानाअंतर्गत डहाणू तालुक्यातील चिंचले आणि धुंदलवाडी येथील आश्रमशाळांत भूकंप झाल्यास करण्यात येणाऱ्या सुरक्षा उपाययोजना आणि बचावकार्य याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आले. मात्र हे प्रशिक्षण घेताना विद्यार्थ्यांना ‘अग्निपरीक्षे’ला सामोरे जावे लागले. अनेक विद्यार्थ्यांना आगीवरून उडय़ा माराव्या लागल्याचे समोर आले आहे. या धोकादायक प्रशिक्षणामुळे दुर्घटना होण्याचीही भीती व्यक्त करण्यात आली आहे.

पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी या तालुक्यांमध्ये गेल्या वर्षभरापासून सातत्याने भूकंपाचे धक्के बसत आहेत. भूकंप झाल्यानंतर काय सुरक्षा उपाय करावेत किंवा बचावकार्य कसे करावे याचे प्रशिक्षण आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात येत आहे. भूकंप जनजागृती अभियानाअंतर्गत हे प्रशिक्षण देण्यात असून डहाणू तालुक्यातील चिंचले, धुंदलवाडी, तलासरी, दापचरी या गावांतील नागरिक आणि विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.

भूकंप म्हणजे काय, तो का होतो आणि कसा होतो, भूकंपाची व्याप्ती आणि परिणाम, भूकंपापूर्वी आणि नंतर घ्यावयाची काळजी , शाळेत असताना घ्यायची काळजी, सुरक्षाउपाय यांची अद्ययावत माहिती देण्यात आली. संपूर्ण  शाळा रिकामी करून विद्यार्थ्यांना सुरक्षित जागी नेणे यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले. चिंचले आश्रमशाळेतील ३५० विद्यार्थिनी आणि ३४० विद्यार्थिनी यामध्ये सहभाग घेतला होता. सुटका आणि मदतकार्य यांमध्ये जखमींना बांधावयाची पाच बँडेज, उचलून नेण्याच्या सहा पद्धती, उपलब्ध साधनांद्वारे २० सेकंदामध्ये तयार करायचे स्ट्रकचर्स, दोरीची शिडी तयार करण्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना देण्यात आले. तर धुंदलवाडी आश्रमशाळेत पहिली ते दहावीच्या ६०० विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले.

मात्र या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देताना आगीवरून उडय़ा मारणे, दोरीवरून चढणे, २० फुटावरून उडी मारणे, ३० फूट उंचीच्या जाळीवर चढणे यांचे प्रशिक्षण देण्यात आले. लहान मुलांना आगीवरून उडय़ा माराव्या लागल्या.

आपल्या भागात माती आणि विटांची घरे आहेत. भूकंप होऊन शॉर्टसर्किट  झाल्यास आगीतून बचावासाठी प्रशिक्षण देण्यासाठी ट्रेनरकडून हे प्रशिक्षण दिले गेले. विद्यार्थ्यांनी स्वत: पुढाकार घेऊन सहभाग घेतला होतामात्र काही आक्षेपामुळे धुंदलवाडी येथे झालेल्या पुढच्या प्रशिक्षणात आग सोडून इतर प्रात्यक्षिक घेण्यात आले. – विवेकानंद कदम, अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, पालघर

 

भूकंप झाल्यानंतर आगीची किंवा पुराची परिस्थिती निर्माण झाल्यास काय करावे याचे प्रशिक्षण प्रात्याक्षिकांसह चिंचले येथे विद्यार्थ्यांना देण्यात आले. आपत्तीजनक परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी सर्व दक्षता घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांना त्यासाठी प्रात्यक्षिक पूर्व प्रशिक्षण दिल्यानंतरच प्रात्यक्षिक घेतले गेले. प्रात्यक्षिकातून विद्यार्थ्यांची भीती घालवण्यात यश आले. – राहुल सारंग, तहसीलदार, डहाणू

 

Story img Loader