ठाणे महानगराचे एक मुख्य उपनगर असलेल्या दिव्यात शिक्षण व्यवस्थाही अत्यंत अपुरी नित्कृष्ट दर्जाची आहे. महापालिकेच्या शाळांची अवस्था दारुण असताना खासगी शाळांतील परिस्थितीही सुखावह नाही. दिव्यात महापालिकेच्या एकूण चार शाळा आहेत. त्यातील पूर्व विभागात असलेली शाळा कौलारू आहे. पावसाळ्यात कौलातून पाणी गळत असल्याने विद्यार्थ्यांना त्याचा खूप त्रास होतो. पुन्हा ही शाळा फक्त चौथीपर्यंतच असल्याने येथील मुलांना पुढील शिक्षणासाठी डोंबिवली अथवा ठाण्याला जावे लागते. शाळा सीआरझेडमध्ये असल्याने नव्या इमारतीचे काम रखडले असल्याचे सांगितले जाते.
दातिवली आणि आगासन येथील शाळा बालवाडीपर्यंतच्याच आहेत. दिवा पश्चिम येथील ७९ क्रमांकाच्या शाळेची तीन मजली इमारत आहे. मात्र ही शाळाही सातवीपर्यंतच आहे. महापालिकेतर्फे चालविण्यात येणाऱ्या या सर्व शाळा मराठी माध्यमांच्या आहेत. याचा फायदा घेऊन येथे कुणीही स्वत:च्या नावावर इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करतात. या सर्व शाळा तसेच त्या ज्या इमारतीत भरतात, त्या अनधिकृत आहेत. सेंट मेरी, डॉन बॉस्को, ऑक्सफर्ड, सिम्बॉयसीस, बेडेकर हायस्कूल अशा प्रसिद्ध शाळांच्या नावाने या शाळा उभारल्या आहेत. त्यामुळे पालकही आपल्या पाल्याला चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा, त्याचे शिक्षण उत्तम व्हावे या हेतूने या शाळांमध्ये मुलांना घालतात. त्यामुळे येथे शिक्षणाचेही तीनतेरा वाजल्याचे चित्र दिसून येत आहे. दहावीच्या परीक्षेचे अर्ज भरावयाचे असल्यास या विद्यार्थ्यांना डोंबिवली, कल्याण आणि ठाणे येथे जावे लागते.
साऱ्या शहराचा कचरा जिथे आणून टाकला जातो, त्या क्षेपणभूमीलगतही नॅशनल, आदर्श या नावाने शाळा भरते. साहजिकच येथे येणाऱ्या मुलांचे आरोग्य कायम धोक्यात असते. सतत लागणाऱ्या आगींमुळे क्षेपणभूमीतून कायम धुर येत असतो. त्या दरुगधीयुक्त धुराने येथील मुलांना श्वसनाचे आजार भेडसावू लागले आहेत.
दिव्यातील ही शिक्षण व्यवस्था नको असलेले पालक त्यांच्या मुलांना डोंबिवली दिव्यातील शाळांमध्ये घालतात. त्यामुळे शालेय वयात येथील मुलांना लोकल प्रवास करावा लागतो. लाखो लोकसंख्या असणाऱ्या दिव्यात एकही महाविद्यालय नाही, हे विशेष!