एकदिशा मार्गामुळे होणाऱ्या कोंडीला विरोध
अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील वाहतूकीचा विषय दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून येथे करण्यात आलेल्या एकदिशा मार्गाबाबत दिवसेंदिवस तक्रारी वाढत असतानाच येथील न्यू डेक्कन या इंग्रजी शाळेच्या दीडशे विद्यार्थ्यांनी गुरुवारी या परिसरात दीड तास रास्ता रोको केला. एकदिशा मार्गामुळे होणारी कोंडी आणि त्यातच रिक्षाचालकांच्या विनाकारण हॉर्न वाजवण्यामुळे होणारा त्रास याला विरोध करीत हे विद्यार्थी रस्त्यावर उतरले.
अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या पूर्व व पश्चिम भागातील अरुंद रस्त्यांमुळे होत असलेल्या वाहतुकीच्या समस्येवरून गेले अनेक दिवस आंदोलनांचे, दुकानदार व रिक्षावाले यांच्यात बाचाबाचीचे प्रकार घडताना दिसत आहेत. अंबरनाथ पश्चिमेकडील रेल्वे स्थानक ते नगरपालिका कार्यालय हा रस्ता महिन्याभरापूर्वीच हा रस्ता एकदिशा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी पालिका प्रशासन, पोलीस विभाग, रिक्षा व फेरीवाले संघटनांचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक झाली होती. त्याच बैठकीत हा निर्णय झाला होता. मात्र, हा मार्ग एकदिशा झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी येथील मुजोर रिक्षावाल्यांनी हा मार्ग एकदिशा करण्यासाठीचे खांब काढण्यास सुरुवात केली. त्यावर पोलिसांकडून कारवाई झाली नाही.
एकदिशा मार्गामुळे होणारी वाहतूक कोंडी आणि त्यादरम्यान कर्णकर्कश हॉर्नचा गोंगाट यांचा त्रास न्यू डेक्कन शाळेच्या विद्यार्थ्यांना होऊ लागला आहे. या रिक्षाचालकांच्या विरोधात शाळा प्रशासनाने अंबरनाथ पालिका आणि वाहतूक विभागाला तक्रारी केल्या. मात्र त्यांनी कोणतीच दखल न घेतल्याने अखेर शाळेतील दीडशे विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.
माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या वाढदिवसानिमित्त हे आंदोलन आम्ही केले आहे. कारण, येथील रिक्षावाल्यांचा व त्यांच्या हॉर्नचा खूप त्रास होत असून या ठिकाणी प्रवेश निषिद्ध असताना या मार्गावर रिक्षावाले जबरदस्तीने घुसतात, मात्र आमच्या शाळांच्या बस आत येऊ दिल्या जात नाहीत. या सगळ्याची कोणीच दखल घेत नसल्याने अखेर गुरुवारी सकाळी आमच्या शाळेच्या सुमारे दीडशे विद्यार्थ्यांंनी रस्ता रोको केला.
– पी. के. वसंतन, शाळेचे मुख्याध्यापक
(((((((((())))))))

Story img Loader