ठाण्यातील जोशी बेडेकर महाविद्यालयात एनसीसीच्या विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याची घटना काल (३ ऑगस्ट) उघडकीस आली. एनसीसी प्रशिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांना होत असलेल्या अमानुष मारहाणीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांमध्ये एकच खळबळ उडाली. व्हायरल व्हिडीओमध्ये विद्यार्थ्यांना पावसाच्या साचलेल्या पाण्यात काही मिनिटं डोकं ठेवायला भाग पाडून मारहाण केली जात असल्याचं पाहायला मिळालं. या मुलांपैकी जर कोणी जागचा हलला तर त्यांना अमानुषपणे मारहाण केली जात होती.
दरम्यान, याप्रकरणी आता एनसीसीने निवदेन जारी केलं आहे. एनसीसीने याबाबत म्हटलं आहे की, नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एनसीसी ट्रेनिंगदरम्यान विद्यार्थ्यांवर अमानुष कारवाई करण्यात आली आहे. ही कृती अत्यंत निंदनीय आहे. हा कोणत्याही एनसीसी प्रशिक्षणाचा भाग नाही. संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी दिलेल्या माहितीनुसार या विद्यार्थ्याला महाविद्यालयाने निलंबित केलं आहे. गुन्हेगार कॅडेट किंवा माजी कॅडेटच्या या कृतीमुळे एनसीसी व्यथित झाली आहे. एनसीसीमध्ये आम्ही आमच्या कॅडेट्समध्ये सामाजिक मूल्ये आणि लष्करी नैतिकता बिंबवतो, परंतु, या कृतीला त्यात काहीही स्थान नाही.
पाहा व्हिडीओ
हे ही वाचा >> “औरंगजेबाचे पोस्टर, मिरवणुकी, स्टेटस हा योगायोग नाही, तर…”, देवेंद्र फडणवीसांचं विधान…
घटना काय?
जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात बांदोडकर, बेडेकर आणि पॉलिटेक्निक या तिन्ही विभागांच्या विद्यार्थ्यांना संयुक्तपणे एनसीसीचं प्रशिक्षण दिलं जातं. या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना भारतीय लष्कर आणि नौदलाच्या प्रशिक्षणपूर्वीचे धडे दिले जातात. यावेळी विद्यार्थ्यांकडून एखादी चूक झाल्यास त्यांना शिक्षाही करण्यात येते. परंतु, विद्यार्थ्यांना अमानुष शिक्षा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये एनसीसीबाबत दहशत पसरली असून अनेकजण एनसीसीमध्ये जाण्यास घाबरत आहेत.