उपक्रम, कार्यशाळा, स्पर्धा (कला, क्रीडा, सांस्कृतिक) प्रदर्शने, शिबिरे, आनंद बझार इ. स्वरूपाच्या अनेकविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या क्षमतांच्या विकासाबरोबर त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास देखील केला जातो. स्नेहसंमेलन आणि प्रदर्शने याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील कलागुण आणि सर्जनशीलतेला वाव मिळतो आणि त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ते हक्काचे व्यासपीठ असते.

शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासाला प्राधान्य देत वर्षभर वैविध्यपूर्ण उपक्रम शाळांमधून राबवले जात असतात. पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक विभागांत कल्पकतेने आयोजित केलेली प्रदर्शने हा एक अतिशय सुंदर अनुभव असतो. सर्वसाधारणपणे पूर्वप्राथमिक विभागात विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने आणि विशेषत: शैक्षणिक साधनांच्या साहाय्याने, हसतखेळत व आनंददायी शिक्षणपद्धतीचा अवलंब करीत कसे शिकवले जाते त्यावर भर दिला जातो. प्राथमिक विभागात चित्रकला, हस्तकला, चिकणमाती काम, टाकाऊतून टिकाऊ इ. साहाय्याने अभ्यासक्रमाचा वेध घेतला जातो. या प्रदर्शनांमधून मग विविध सण, समाजाचे सेवक, वाहने (आकाश, रस्ता, पाणीमार्गे), आपली इंद्रिये, विविध खेळ (बैठे, मैदानी, पारंपरिक इ.), महाराष्ट्राची संस्कृती, शेती आणि पिके इ. स्वरूपाचे विषय मोठय़ा प्रमाणावर दिसून येतात. काही शाळा मग गणित, भूगोल, विज्ञान या विषयांमधील काही विषय निवडून त्यावरील प्रतिकृती, माहितीपूर्ण तक्ते, शैक्षणिक खेळ इ. माध्यमांच्या साहाय्याने प्रदर्शन आयोजित करतात. माध्यमिक विभागात चित्रकला, हस्तकला, गणित, विज्ञान इ. विषय अधिक विस्ताराने हाताळून भव्य प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. या प्रदर्शनांमधून चित्रकलेचे (पेंटिंग, पेन्सिल शेडिंग, ठसे काम, नखशिल्पे इ. प्रकार), हस्तकलेचे (पुठ्ठा/ कागद/ करवंटय़ा/ पेन्सिलची साले/ वाळलेली फुले पाने इ.)च्या अनेक आकर्षक कलाकृती, कापडावरील पेंटिंग, टाकाऊतून टिकाऊच्या माध्यमातून केलेल्या वैविध्यपूर्ण कलात्मक वस्तू पेपर क्विलिंगच्या वस्तू, आर्टिफिशिअल/ इमिटेशन दागिने इ. गोष्टी अनुभवता येतात. विज्ञान आणि गणितामधल्या मूलभूत संकल्पना, मूलभूत तत्त्वे यावर आधारित अनेक प्रतिकृती, खेळ विद्यार्थी तयार करतात (आणि उपस्थितांना/ येणाऱ्यांना समजावून सांगतात). शाळेच्या आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा (त्यामागील परिश्रमांचा) आढावा शाळेला पालकांना घेता येतो आणि शाळेसाठी ती अत्यंत अभिमानाची बाब असते. त्यामुळे शाळा, विद्यार्थी आणि पालक या प्रदर्शनांची आतुरतेने वाट पाहात असतात.
या वर्षी डॉ. बेडेकर विद्यामंदिर पूर्वप्राथमिक विभागात शैक्षणिक साधनांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. या शाळेमध्ये आंबा, पपई, डाळिंब, अननस, सफरचंद असे पाच गट असून, गटाप्रमाणे विषय देण्यात आले होते. आंबा गट- भाषा, पपई गट- हस्तकला, चित्रकला. डाळींब गट- गणित, अननस गट- जीवन व्यवहार, सफरचंद गट- सामान्यज्ञान असे हे विषय होते. पूर्वप्राथमिक विभागातील पाच दालनांमध्ये शैक्षणिक साधनांचे मांडलेले हे प्रदर्शन पाहण्यासारखे होते.
भाषा- गोष्टी, गाण्यांचे प्रकार, लेखनपूर्व तयारी, मुळाक्षरे, शब्द, वाक्य, काना, कान्याची वाक्ये, शब्द व चित्र जोडय़ा, समानार्थी शब्द, लिंग ओळख, एकवचन, अनेकवचन, नातेसंबंध, चित्रवर्णन.
गणित- अंक ओळख, क्रमवारी, मोजणी, चढता-उतरता क्रम, मधला/ पुढचा/ मागचा अंक लिहिणे, चिन्हांची ओळख, बेरीज, वजाबाकी, वजन, आकारमानातील फरक, अपूर्णाकाची ओळख, शून्याची संकल्पना.
जीवन व्यवहार- चाळणे, पाखडणे, निवडणे, दळणे, चिरणे, वाटणे, कापणे, कुटणे, किसणे, कपडय़ांच्या घडय़ा घालणे, बुटात लेस घालणे, मणी ओवणे, मनोरा रचणे, लाटणे, केर काढणे.
सामान्यज्ञान- जंगली/ पाळीव प्राणी, जलचर/ उपजलचर प्राणी, रंगांचा परिचय, फुले- वासाची/ बिनवासाची, बाळाचे कपडे, प्रथमोपचाराची साधने, चवींचा परिचय, पक्ष्यांचा परिचय, धातूंचा परिचय, प्रकाश देणाऱ्या, उष्णता देणाऱ्या, विजेवर चालणारी साधने, पूजेचे साहित्य, आंघोळीचे साहित्य, दागिन्यांचा परिचय, भाज्या- फळभाज्या- पालेभाज्या- कंदभाज्या, घरांचे प्रकार.
हस्तकला चित्रकला- चित्र काढणे, चिकटकाम, कोलाजकाम, होडी, घर, कपबशी, फ्रेम, छत्री बनवणे, मातीकाम.
दरवर्षी एक विषय निवडून सर्वागाने त्याचा वेध घेत ते प्रदर्शन परिश्रमपूर्वक मांडण्यावर भर देण्याची या विभागाची परंपरा दिसून येते. गेल्या वर्षी समाजाचे सेवक हा प्रकल्पदेखील या स्वरूपाने मांडण्यात आला होता. धोबी, सोनार, कुंभार, माळी, बुरुड काम करणारा, न्हावी, चांभार, वाणी, सोनार, गवंडी, शेतकरी असे तीस सेवकांचा या प्रदर्शनात समावेश होता.
धोबी- कपडे धुण्याचा दगड, साबण, धोपाटणे, ब्रश इ.
सुतार- करवत, रंधा, लाकडे, हातोडी, खिळे इ.
न्हावी- आरसा, कात्री, खुर्ची, फवारा, कंगवा, कापलेले केस.
सोनार- छोटा तराजू, निखारे भरलेली बादली, फुंकणी, दागिने.
कळव्यामधील ज्ञानप्रसारणी शाळेतील पूर्वप्राथमिक विभागातदेखील दरवर्षी एक विषय घेऊन सर्वागाने वेध घेत अभ्यासपूर्णरीतीने प्रदर्शनाची मांडणी केली जाते. कळवा, विटावा, ठाकूरवाडी येथील शाळांचे पूर्वप्राथमिक विभागांचे हे संयुक्त प्रदर्शन असते.
यावर्षी टाकाऊतून टिकाऊ विषयांतर्गत कागद, पुठ्ठा, पेन्सिलची साले, चॉकलेटचे कागद, काडेपेटीच्या काडय़ा, आईस्क्रीमचे चमचे, खोके इ.पासून अतिशय सुंदर आणि कलात्मक वस्तू कल्पकतेने तयार करण्यात आल्या होत्या. करवंटीपासून तबला, डग्गा, बाहुली, कासव तयार करण्यात आले होते. पेन्सिलच्या सालांपासून फुले, घरांचे आकार तर चॉकलेटच्या कागदापासून फटाके, फुले, फुलपाखरे खूप सुंदर केली होती. डाळींपासून फळाफुलांचे आकार तयार करण्यात आले होते. पुठ्ठा/ आईस्क्रीमचे चमचेपासून अतिशय वैविध्यपूर्ण अशा घरांसोबतच टी.व्ही., रेडिओ, गॅसची शेगडी, उशी/गादीसहित पलंग, घडय़ाळ इ. अनेकविध गोष्टी प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या.
गेल्या वर्षी ‘शहराकडून जंगलाकडे’ असा विषय होता आणि त्यामध्ये जंगलातले विविध प्राणी, पशू, पक्षी, झाडे-झुडपे, वृक्ष, औषधी वनस्पती इ. गोष्टी मांडण्यात आल्या होत्या. टाकाऊतून टिकाऊच्या माध्यमातून पशू/पक्ष्यांची घरे, झाडे आकर्षकरीत्या तयार करण्यात आली होती. शक्य होती ती झाडे आणि औषधी वनस्पतींचे काही नमुने विद्यार्थ्यांना/ पालकांना प्रत्यक्ष पाहता आले. त्याच्या आधीच्या वर्षी समाजातील सेवक प्रदर्शनांतर्गत सेवकांची चित्रे व त्यांचे सर्व साहित्य अभ्यासपूर्वक मांडण्यात आले होते. विशेष म्हणजे या शाळांचे विद्यार्थी तेथे स्वत: बसलेले असतात आणि ज्या गोष्टी मांडलेल्या असतात त्याची ते आत्मविश्वासपूर्वक माहिती देतात, त्यांचा उपयोग सांगतात, त्याचे महत्त्व सांगतात. हे विशेष!
– हेमा आघारकर

Due to assembly elections instructions have issued regarding school continuity on November 18 19
शाळा सुरू ठेवण्याबाबत शिक्षण आयुक्तांच्या सुधारित सूचना… होणार काय?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Govt Issues New Rules To Stop Misleading Ads By Coaching classes
विश्लेषण : शिकवणी वर्गांच्या जाहिरातींना चाप?
grse recruitment 2024 opportunities in indian education sector
शिक्षणची संधी : ‘जीआरएसई’ मध्ये संधी
PM Vidyalakshmi Scheme
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज; काय आहे ‘पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना’?
Thane district, 578 children came under education stream, Survey of out of school children
ठाणे जिल्ह्यातील ५७८ मुले आली शिक्षणाच्या प्रवाहात
national green tribunal loksatta
हरित लवादामुळे राज्यातील गृहप्रकल्प पुन्हा रखडणार!
savitribai phule pune university diamond jubilee celebration
शहरबात : विद्यापीठ प्राधान्यक्रम कधी ठरवणार?