भगवान मंडलिक, लोकसत्ता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्याण – शाळेतील विद्यार्थी संख्या पुरेशी नाही म्हणून ठाणे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत कल्याण तालुक्यातील मोस, अनखर, वाहोलीपाडा, बेलकरपाडा या गावांमधील जिल्हा परिषदेच्या शाळा प्रशासनाने पाच वर्षापूर्वी बंद केल्या. या शाळांमधील विद्यार्थ्यांची शाळेची पर्यायी व्यवस्था शासनाने न केल्याने आणि कष्टकरी गटातील पालक नियमित एक ते दोन किलोमीटर अंतरावरील शाळेत मुलांना सोडण्यास तयार नसल्याने बंद केलेल्या शाळांमधील अनेक विद्यार्थ्यांनी शाळेकडे पाठ फिरवली आहे.

एकीकडे वंचित, भटकी मुले शोधून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाचे उपक्रम सुरू आहेत. त्याचवेळी शाळेत जाणारी मुले शिक्षणापासून वंचित आहेत. याकडे जिल्हा प्रशासनाचे गेल्या पाच वर्षापासून लक्ष नसल्याचे कल्याण तालुक्यातील शाळा बंद असलेल्या मुलांच्या पालकांनी सांगितले.

हेही वाचा >>> तिहेरी हत्याकांडाने ठाणे हादरले; तरुणाने पत्नीसह केली दोन मुलांची हत्या

शासनाने कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय काही वर्षापूर्वी घेतला. या निर्णयाचा कल्याण तालुक्यातील मोस, वाहोलीपाडा, अनखर, बेलकरपाडा या जिल्हा परिषद शाळांना फटका बसला. या गावांमधील शाळा बंद झाल्यानंतर शिक्षण विभाग अधिकाऱ्यांनी बंद पडलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांची परिसरातील शाळांमध्ये पर्यायी व्यवस्थेसाठी प्रयत्न करणे आवश्यक होते. या बंद केलेल्या शाळांंमध्ये पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग होते.

बंद केलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी गावा जवळील शाळेत जावे, असे शासनाचे निर्देश आहेत. गावांमधील बहुतांशी वर्ग कष्टकरी वर्गातील आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. हा वर्ग आपल्या मुलांना गावा शेजारील शाळेत रिक्षा किंवा अन्य साधानाने सोडू शकत नाही. या गावांच्या हद्दीत एस. टी. बसची सोय नाही. मुलांना दररोज शाळेत अनेक पालकांना शक्य नाही. काही पालकांनी आपल्या मुलांना आपल्या नातेवाईकांकडे शिक्षणासाठी ठेवले आहे. ज्या पालकांची अशाप्रकारची मुलांना अन्यत्र ठेवण्याची सोय नाही त्यांनी मुलांना घरी ठेवणेच पसंत केले आहे. मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जात असल्याने पालक वर्ग चिंताग्रस्त आहे.

हेही वाचा >>> कल्याणमध्ये रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा; रिक्षेत विसरलेले महिला प्रवाशाचे सात तोळे सोने परत

शाळा बंद करण्यापूर्वी जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावात येऊन पालकांना विविध प्रकारची आश्वासने दिली होती. यामधील एकही आश्वासन अधिकाऱ्यांनी पाळले नाही, असे पालकांनी सांगितले. हा परिसर जंगलपट्टीचा आहे. भटकी कुत्री, जंगली प्राण्यांचा या भागात वावर असतो. अशा परिस्थितीत मुलांना एकट्याने दुसऱ्या गावातील शाळेत सोडणे शक्य नाही, असे पालकांनी सांगितले.

कल्याण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या बंद असलेल्या शाळांबाबत माहिती घेऊन वरिष्ठांशी चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल. रुपाली खोमणे – गटशिक्षणाधिकारी, कल्याण.

बेलकरपाडा गावातील शाळा शाळेत १७ विद्यार्थी होते. म्हणून जिल्हा परिषदेने शाळा बंद केली. हे सर्व विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहा बाहेर फेकले आहेत. सुरज ताम्हाणे – ग्रामस्थ, बेलकरपाडा.

शाळा बंद झाल्याने मुले घरीच असतात. दुसऱ्या गावातील शाळेत त्यांना रोज सोडणे, आणणे प्रत्येक पालकाला शक्य नाही. विलास रोहणे- ग्रामस्थ, वाहोली.

मोसची शाळा खासगी शिक्षण संस्थेची पटसंख्या वाढावी म्हणून शासनाने बंद केली आहे. मुलांचे यामध्ये शैक्षणिक नुकसान झाले. दिनेश मांजरे – ग्रामस्थ, मोस.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Students dropping out after thane zilla parishad school close zws