शिवचरित्र, क्रांतिकारकांच्या चरित्राचे धडे; विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर
विद्यार्थ्यांना पाठय़पुस्तकामधील क्रमिक अभ्यासक्रमाबरोबर कृतिशील शिक्षणाचे धडे देण्याचा उपक्रम गेल्या नऊ वर्षांपासून कल्याण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पिसवली शाळेत सुरू आहे. विद्यार्थी हा केवळ अभ्यासातील किडा न होता, विचार करणारा, आपल्यातील कलागुण सिद्ध करणारा निर्माण झाला पाहिजे. या विचारातून पिसवली शाळेत शिवचरित्र, क्रांतिकारकांची माहिती देण्यासाठी पारायणे केली जातात. याशिवाय सण, उत्सवातील बीभत्स रूप टाळून त्यामधील पावित्र्य राखून उत्सव कसे साजरे करायचे, याचे धडे विद्यार्थ्यांना शाळेतून देण्यात येत आहेत.
१९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. या निमित्ताने पिसवली शाळेत गेल्या वीस दिवसांपासून शिवचरित्राचे पारायण सुरूआहे. विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेत अभ्यासाचे धडे शिकवून झाल्यानंतर, परिपाठाच्या वेळेत विद्यार्थ्यांना पटांगणात एकत्र केले जाते. त्यांना कथारूपाने शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित कथा सांगितली जाते. शिवाजी महाराज हे कसे श्रेष्ठ आणि जनतेचा विचार करणारा राजा होते, याची माहिती विद्यार्थ्यांना पारायणातून दिली जाते. गेल्या पंधरा दिवसांत विद्यार्थ्यांना शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र, संतांची कामगिरी, स्वराज्याची शपथ, गड-किल्ले ताब्यात घेण्यासाठी मोहिमा, शहाजी राजांची सुटका, आग्रा येथून सुटका, अफझलखान वध, शायिस्तेखानाची फजिती, बाजीप्रभू देशपांडे यांचा पराक्रम या कथा गोष्टीरूपाने सांगण्यात आल्या आहेत. शालेय जीवनात विद्यार्थ्यांना राजांची महती कळावी, राजांच्या कार्याचा संस्कार विद्यार्थ्यांवर व्हावा, या उद्देशातून दरवर्षी शाळेत शिवचरित्र पारायणे केली जातात, अशी माहिती पिसवली शाळेतील कृतिशील शिक्षक अजय पाटील यांनी दिली.
शिवजयंतीच्या आदल्या दिवशी गेल्या वीस दिवसांत आपण शिवचरित्रातून काय ऐकले, या विषयावर प्रश्नमंजुषा कार्यक्रम घेतला जातो. विद्यार्थी त्यात सहभागी होतात. शिवजयंतीच्या दिवशी जयंती साजरी करून पारायणाची समाप्ती केली जाते, असे पाटील यांनी सांगितले.
वर्षभरातील उपक्रमात क्रांती दिन साजरा केला जातो. क्रांती दिनाच्या दहा दिवस अगोदर देशातील क्रांतिकारकांची माहिती विद्यार्थ्यांना दररोज एक तास दिली जाते. क्रांतिकारकांच्या वेशभूषेत गावात प्रभातफेरी काढली जाते. गटारी अमावास्या म्हणजे मद्यपान आणि मांसाहारी जेवण असा एक भ्रम विद्यार्थ्यांच्या मनात असतो. हा भ्रम दूर करण्यासाठी या दिवशी शाळेत दीपपूजन केले जाते. होळीच्या काळात पर्यावरणस्नेही रंगांचा वापर करून धुळवड खेळली जाते. विद्यार्थी, शिक्षक शाळेच्या आवारात होळी सण साजरा करतात. कुसुमाग्रजांचे समग्र साहित्य, त्यांचा विचार विद्यार्थ्यांना समजण्यासाठी मराठी भाषा दिन शाळेत साजरा होतो.

क्रमिक अभ्यासक्रमाबरोबर कृतिशील शिक्षण ही काळाची गरज आहे. शहरी भागापासून दूर वस्तीत असलेल्या मुलांमध्ये कलागुण असतात. त्यांना ते व्यक्त कसे करावेत ही अडचण असते. हे ओळखून सर्वसामान्य समाजातील विद्यार्थ्यांना कृतिशील शिक्षणात अधिक सहभागी करून घेतले तर ते अधिक व्यक्त होतात हे लक्षात आले. त्यामुळे शाळेत पारायण, सण, उत्सव, पर्यावरण संवर्धनासारखे कार्यक्रम नियमित घेतले जात आहेत. या उपक्रमाची चांगली पावती विद्यार्थ्यांच्या यशातून मिळत आहे.
– अजय पाटील, शिक्षक

पिसवली शाळेचे उपक्रम प्रेरणादायी असतात. विद्यार्थ्यांवर शालेय जीवनात संस्कार घडविण्यासाठी वर्षभर शाळेतील शिक्षक विविध उपक्रम राबवून, विद्यार्थ्यांना क्रमिक अभ्यासक्रमाबरोबर संस्कारित जीवनाचे धडे देत आहेत. राष्ट्रपुरुष, क्रांतिकारकांचे जीवनपट विद्यार्थ्यांसमोर कथारूपाने मांडण्यात येतात. त्यामुळे त्या विचारांची अधिक जवळून ओळख विद्यार्थ्यांना होते. या संस्कारातून आदर्श विद्यार्थी व उद्याचा यशस्वी नागरिक घडत असतात.
– ललिता दहितुले, गटशिक्षणाधिकारी, कल्याण</strong>