डोंबिवली- येथील एमआयडीसीतील लोकमान्य गुरुकुल शाळेतील विद्यार्थ्यांनी मंगळवारी डोंबिवली जवळील दावडी गावातील शेतावर जाऊन भात लागवडीचा अनुभव घेतला. क्षेत्रिय भेटीच्या माध्यमातून शाळेने हा उपक्रम आयोजित केला होता. मुसळधार पाऊस सुरू असताना विद्यार्थी, शिक्षक चिखलणी केलेल्या शेतात भात लावणीचा आनंद घेत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पावसाळ्यात शेतकरी शेतीची कामे करतो म्हणजे नक्की तो काय करतो, हे पुस्तकी ज्ञानापेक्षा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कळावे. शेतकरी घेत असलेल्या कष्टामुळे आपणास धान्य कसे उपलब्ध होते. नांगर म्हणजे काय, त्याचे काम काय. याची सर्वांगिण माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या विचारातून लोकमान्य गुरुकुल शाळेने डोंबिवली जवळील दावडी गावातील एका शेतकऱ्याच्या शेतावर क्षेत्रिय पाहणी कार्यक्रम मंगळवारी आयोजित केला होता.

हेही वाचा >>> कल्याणमधील घोडेखोत आळीतील दक्षिणमुखी मारुती मंदिरात चोरी

लोकमान्य गुरुकुल शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी शिक्षक, विद्यार्थी शालेय वाहनातून दावडी येथील शेतावर पोहचले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी केलेल्या सुचनेप्रमाणे भात रोपाची उखळणी, त्याची लावणी हे प्रकार समजून प्रत्यक्ष कृती शेतात केली. अनेक विद्यार्थ्यांनी बैलजोडीचा नांगर हुसकून शेतात चिखलणी करण्याचे काम केले.

शालेय गणवेशात विद्यार्थी शेतात उतरले होते. शेतामधील चिखल, पाणी आणि कोसळणाऱ्या पाऊसधारांमध्ये न्हाऊन शेतकरी कष्टकरी गीते गात विद्यार्थी भात लावणीचा आनंद घेत होते. शेतकरी दिवसभर आणि बारही महिने शेतात राबत असतो. त्यामुळे आपल्याला अन्नधान्य उपलब्ध होते. या कष्टाची कदर प्रत्येकाने केली पाहिजे. म्हणून भोजनाच्या ताटातील अन्न कधीही खाली सांडून देऊ नका किंवा ताटाच्या अवतीभवती भातशिते सांडू नका, अशी माहिती मुख्याध्यापिका पावडे यांनी विद्यार्थ्यांना दिली.

हेही वाचा >>> डोंबिवलीतील तरुणाची नोकरीच्या आमिषाने फसवणूक

दिवसभर भात रोप उखळणी, लावणी, चिखलणीचा अनुभव घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी बाजुच्या पाण्याच्या डबक्यात भिजण्याचा आनंद लुटला. या उपक्रमात सुलोचना गोरे, मंगेश गायकर, सारिका लोखंडे, लिपिक श्रीकांत श्रीखंडे, उपक्रम प्रमुख व्यंकटेश प्रभुदेसाई सहभागी झाले होते.

“ विद्यार्थ्यांना पाऊस सुरू झाल्यानंतर शेतकरी शेतात काय काम करतो. याची प्रत्यक्ष माहिती व्हावी. शेतकरी किती कष्टाने धान्य पिकवत असतो. या धान्य पिकवण्याची प्रक्रिया विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतात नेऊन कळाव्यात म्हणून हा उपक्रम आयोजित केला होता.”

अर्चना पावडे – मुख्याध्यापक, लोकमान्य गुरुकुल.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Students of lokmanya gurukul school in dombivli became farmers get experience of rice cultivation zws
Show comments