देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन बालदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून कल्याण मधील सम्राट अशोक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सोमवारी शाळेत व्यसन मुक्तीची शपथ घेतली. भविष्यात सिगारेट, गुटखा, मद्य अशा कोणत्याही व्यसनाच्या आहारी जाणार नाही. आणि असे कोणी करत असेल तर त्याला त्यापासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न करीन, अशी शपथ शाळकरी विद्यार्थ्यांनी घेतली.
पंडित नेहरु यांच्या जयंती निमित्त विद्यार्थ्यांना या दिवसाचे औचित्य साधून भाषणे करण्या पेक्षा विद्यार्थ्यांना या दिवसाचे महत्व चिरकाल लक्षात राहिल या उद्देशातून विद्यार्थ्यांना व्यसन मुक्तीचे महत्व पटवून देण्यासाठी हा शपथ देण्याचा उपक्रम राबविण्यात आला, असे शाळेचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
तरुण पिढीमध्ये व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढत आहे. व्यसनाधिनतेचा फटका त्या तरुणाच्या कुटुंबीयांना बसतो. मुलाला व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढणे काही पालकांना अवघड झाले आहे. हा विळखा महाभयावह असल्याने त्याची वेळीच जाणीव विद्यार्थ्यांना असावी. या व्यसनाधिनतेच्या जाळ्यात कधीच कोणी अडकू नये. हा दूरगामी विचार करुन या कार्यक्रमाचे आयोजन केले. शाळेतील सर्व वयोगटातील विद्यार्थी, विद्यार्थिनी या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या, असे प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिक सुजाता नलावडे यांनी सांगितले. ही शपथ विद्यार्थ्यांनी केवळ आपल्या पुरती मर्यादित न ठेवता आपल्या घर परिसरातील तरुण, तरुणींना त्याची माहिती द्यावी, परिसरात जागृती करावी, असेही विद्यार्थ्यांना सांगण्यात आले आहे, असे मुख्याध्यापक पाटील यांनी सांगितले.