ठाणे : येथील नौपाडा परिसरात असणाऱ्या सरस्वती सेकंडरी शाळेमध्ये शाळेच्या विकासाच्या दृष्टीकोनातून यंदाच्या शैक्षणिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक प्रयोग शाळा, मानसिक आरोग्य, आरोग्यदायी स्वच्छता गृह, क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्ये म्हणजे विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्षाचे आर्थिक नियोजन तयार केले आहे. एकूण नऊ कोटी ८९ लाख रूपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे.
सरस्वती सेकंडरी शाळेची मुख्य संस्था असणाऱ्या सरस्वती मंदिर ट्रस्ट या संस्थेचा अमृत महोत्सव २०२७ मध्ये साजरा केला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर पुढील दोन वर्षे अमृतवर्षे म्हणून साजरे केली जाणार आहेत. याच अंतर्गत शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी भांडवली आणि महसुली खर्चाचे आर्थिक नियोजन विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आले आहे. यामध्ये शाळेच्या आर्थिक स्थितीचा अभ्यास करून अंदाजपत्र तयार करण्यात आले आहे. सर्वोत्तमाचा ध्यास हे या संस्थेचे ब्रीद वाक्य आहे. शाळेची शैक्षणिक गुणवत्ता अधिक वाढावी आणि सर्व विद्यार्थी अधिक सक्षम व्हावेत, या उद्देशाने हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे.
यामध्ये शासनाकडून मिळणारे वेतन अनुदान हे शिक्षकांच्या वेतनापुरते मर्यादित आहे. मात्र, वेतनेतर अनुदान विद्यार्थ्यांसाठी अपुरे आहे. २०२४-२०२५ या वर्षात शासनाकडून शाळेला २ लाख १२ हजार रुपये वेतनेतर अनुदान मिळाले होते. तर, संस्थेने १५ लाखाहून अधिक रक्कम शासनाला कररूपाने जमा केलेली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार शिक्षणपद्धतीत होत असलेल्या बदलांनुसार अर्थसंकल्पात तंत्रज्ञान आणि कौशल्य विकासावर भर देण्यात आला आहे. तसेच, क्रीडांगणाच्या आधुनिकीकरणासाठी विशेष तरतूद देखील केली आहे.
त्याचप्रमाणे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे. यासोबतच विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याला चालना देण्यासाठी ठाण्यातील प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी आणि आय पी एच संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष उपक्रमाचा उल्लेख देखील अंदाजपत्रकात करण्यात आला आहे. सरस्वती सेकंडरी शाळेत विद्यार्थ्यांनी आखलेले हे अंदाजपत्रक शाळेच्या शैक्षणिक आणि भौतिक विकासाला चालना देणारे असणार आहे.
महसुली खर्चात अतिरिक्त शिक्षकांचे वेतन, शिक्षक आणि विद्यार्थी मार्गदर्शन वर्ग, तज्ज्ञांचे मानधन यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच विद्यार्थी सक्षम योजना अंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. यासाठी एकूण ६० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
नवीन उपक्रमांचा समावेश
पर्यावरण संवर्धन, शेती शिक्षण आणि परिसर विकास, दुर्बल घटक, ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम तसेच ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष योजना समावेश करण्यात आला आहे.
शाळेच्या उत्पन्नासाठी खालील स्रोतांवर भर दिला जाणार आहे. यामध्ये शासनाकडून मिळणारे शिक्षकांचे वेतन आणि वेतनेतर अनुदान, केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना, खासदार, आमदार, नगरसेवक निधी, सामाजिक संस्था, सांस्कृतिक संस्था आणि व्यक्तींचे आर्थिक योगदान, शिक्षणाशी संबंधित विविध उपक्रमांतून निर्माण होणारे उत्पन्न, पितृसंस्थेकडून मिळणारे आर्थिक सहाय्य या स्तोत्रांचा समावेश आहे.