शाळेतील शिस्तीतील वातावरणातून महाविद्यालयात दाखल झाल्यानंतर विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य, मुक्तता यांचा अनुभव येतो. महाविद्यालयीन जीवनातील मोकळे वातावरणच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकास आणि आत्मविश्वासासाठी पोषक असते, मात्र महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीही काही नियम असतातच. ओळखपत्र गळय़ात अडकवून फिरणे, ठरावीक कपडय़ांवर र्निबध, मोबाइल बंदी असे नियम विद्यार्थ्यांना जाचक वाटतात. त्यावर वेळोवेळी टीकाही केली जाते; परंतु महाविद्यालयांत असलेले हे नियम आवश्यक असल्याचे मत ‘कट्टय़ावरची गोलमेज’मध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. महाविद्यालयीन नियमांबाबत विद्यार्थ्यांमध्ये मतभिन्नता असली तरी हे नियम साऱ्यांनाच लागू करावे. याबाबत मात्र त्यांच्यात एकवाक्यता आहे. महाविद्यालयांतील नियमांबाबत विद्यार्थ्यांची भूमिका जाणून घेण्याचा हा प्रयत्न.
महाविद्यालयात पार्किंग व्यवस्था असावी का?
चिन्मयी मेस्त्री
हल्ली बहुतांश विद्यार्थ्यांकडे टू व्हीलर्स असतात; पण महाविद्यालयात पार्किंग व्यवस्था नसल्याने विद्यार्थी आपली वाहने महाविद्यालयात आणत नाहीत. एका अर्थी हे चांगलेच आहे, कारण महाविद्यालयाच्या आवारात विद्यार्थी आपली वाहने घेऊन आले, तर बाइक स्टंट्सचे प्रमाण महाविद्यालयाच्या परिसरात वाढेल आणि ते घातक ठरेल.
शिवरत्न कलगुडे
कॅम्पसमध्ये पार्किंग नसावी, परंतु महाविद्यालयाच्या बाहेरील परिसरात पार्किंग असावी असे मला वाटते. तरुण पिढीला सध्या वाहनांची अधिक आवश्यकता असते. परीक्षेच्या काळात वाहने अत्यावश्यक असतात यासाठी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी पार्किंगची व्यवस्था करावी.
अनुजा साठे
काही विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये येण्यासाठी खूप लांबचा पल्ला गाठावा लागतो. अशा विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाच्या आवारात पार्किंगची व्यवस्था असावी असे मला वाटते.
महाविद्यालयात कडक शिस्त हवी का?
कुशन कोडे
बांदोडकर महाविद्यालयात अकरावी- बारावीच्या विद्यार्थ्यांना गणवेश सक्तीचा आहे. त्यामुळे महाविद्यालयात पोशाखाच्या बाबतीत समस्या उद्भवत नाही. शिवाय पदवीच्या विद्यार्थ्यांना फाऊंडेशन कोर्स हा विषय सक्तीचा असल्याने या अभ्यासक्रमात मूल्यशिक्षणावर भर दिला जातो. व्यक्तिमत्त्व विकास घडून येण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे महाविद्यालयात कसे वावरावे याबाबत विद्यार्थीही जागरूक असतात. या सगळ्या गोष्टींमुळे एक प्रकारची शिस्त महाविद्यालयात राहते. त्यामुळे महाविद्यालयातील शिस्त गरजेची आहे.
दीपिका भोये
सध्याची परिस्थिती पाहता काही प्रमाणात महाविद्यालयातील वातावरण शिस्तीचे हवेच. महाविद्यालयात मुळात आपण शिकण्यासाठी येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनीही या गोष्टीचे भान ठेवून आपले वर्तन ठेवावे. या वातावरणात आल्यावर शिस्त गरजेची आहे हे विद्यार्थ्यांनीही समजायला हवे.
विजय सैनी
महाविद्यालयात कडक शिस्त असणे सर्वार्थाने गरजेचे आहे. महाविद्यालयात वावरत असताना परिधान करावयाचे ओळखपत्र विद्यार्थ्यांबरोबरच प्राध्यापकांनीही परिधान करणे गरजेचे आहे. महाविद्यालय किंवा विद्यापीठ एखादा नियम करत असल्यास, तो सर्वाच्या बाबतीत समान असणे आवश्यक आहे.
चिन्मयी मेस्त्री
शाळेपासून आपण शिस्तीचे पालन केलेले असते. पुन्हा महाविद्यालयात आल्यावर शिस्त असेल तर विद्यार्थ्यांवर बंधने येतील. लेक्चरच्या वेळी चालेल, पण इतर वेळी शिस्त नको. नाही तर महाविद्यालयाच्या वातावरणाची मज्जा विद्यार्थ्यांमध्ये राहणार नाही.
सुदीप पात्रा
महाविद्यालयात कडक शिस्त असणे गरजेचे आहे. मात्र महाविद्यालयात राबविले जाणारे नियम सर्वानी पाळणे गरजेचे आहे. बहुतेक महाविद्यालयांमध्ये मोबाइल वापरावर बंदी असते; परंतु या नियमाची अंमलबजावणी फक्त विद्यार्थ्यांपुरतीच केली जाते. त्यामुळे एकतर्फी नियमाची अंमलबजावणी न करता समानता असणे गरजेचे आहे. आवश्यक आणि वैध कारण असेल तर मोबाइल वापरास सवलत देण्यास काही हरकत नाही. महाविद्यालयामध्ये नक्की नियम कशासाठी बनविण्यात आले आहेत, याचा विचार होणे गरजेचे आहे. तसे झाल्यास सर्वच विद्यार्थी, कर्मचारी, शिक्षक स्वत:हून नियम पाळतील.
शिवरत्न कलगुडे
‘कडक शिस्त’ यावरही मर्यादा असाव्यात, जेणेकरून व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा येता कामा नये; परंतु याबाबतीत ज्ञानसाधना महाविद्यालयामध्ये अचूकरीत्या विद्यार्थी-शिक्षकांकडून नियमांचे पालन केले जाते.
धनश्री सोहनी
महाविद्यालयात कडक शिस्त असलीच पाहिजे. महाविद्यालयीन काळ हा विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचा काळ असतो. अशा वेळी त्यांच्यावर अंकुश ठेवणे गरजेचे आहे.
ज्योती शिंदे
जोशी बेडेकर महाविद्यालयात ओळखपत्र सक्तीचे आहे. शिवाय प्रवेश करताना महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर ओळखपत्र स्वाइप करण्याची पद्धत आहे. त्यामुळे बाहेरचे विद्यार्थी महाविद्यालयात प्रवेश करू शकत नाहीत. त्यासाठी वेगळे प्रवेशद्वार आहे. शिवाय बी.एम.एम, बी.एम.एस.सारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मंगळवार आणि शुक्रवार या दोन दिवसांत गणवेश सक्तीचा आहे. पोशाखाच्या बाबतीत शिस्त राहते. शिवाय महाविद्यालयात येताना मुलींना स्लीवलेस ड्रेस, तर मुलांना थ्रिफोर्थसाठी परवानगी नाही. शिस्तीचे वातावरण राहावे यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या वर्गात किंवा परिसरात फेरी मारत असतात. त्यामुळे शिस्तीचे पालन केले जाते. महाविद्यालयीन वातावरणात अशा प्रकारची शिस्त गरजेची आहे.
महाविद्यालयाच्या आवारात पोलीस चौकी हवी का?
कुशन कोडे
महाविद्यालयाच्या आवारात पोलीस चौकीची आवश्यकता जाणवत नाही. महाविद्यालयाच्या आवारात प्राध्यापक किंवा इतर कर्मचारी यांचे लक्ष असते. त्यामुळे गैरवर्तन होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाते. शिवाय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महाविद्यालयात रॅगिंगविरोधी कक्ष आहे. काही गैरवर्तन झाल्यास विद्यार्थी या ठिकाणी तक्रार नोंदवू शकतात. इतक्या सोयी असताना महाविद्यालयाच्या आवारात पोलीस चौकी नको.
धनश्री सोहनी
केळकर महाविद्यालयाच्या आवारात पोलीस चौकीची तशी फारशी गरज भासत नाही. तरीही विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता येथे दिवसभर पोलीस फेरफटका मारत असतात. जर पोलीस चौकी उभारण्यात आली तर कदाचित विद्यार्थ्यांच्या स्वातंत्र्यावर काही प्रमाणात गदा येण्याची शक्यता असते.
शिवरत्न कलगुडे
विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता महाविद्यालयाच्या आवारात पोलीस चौकी असणे गरजेचे आहे. अनेकदा महाविद्यालयाच्या बाहेर विद्यार्थ्यांची भांडणे किंवा छेडछाड असे प्रकार होत असतात. अशा प्रकारांवर तात्काळ नियंत्रण असावे यासाठी पोलीस चौकीची नितांत आवश्यकता आहे. ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या आवारात नुकतीच अशा पोलीस चौकीची स्थापना करण्यात आली आहे.
महाविद्यालयांच्या परिसरातील पानटपऱ्या किंवा मद्यविक्रीच्या दुकानांबद्दल..
ज्योती शिंदे
अर्थात अशी दुकाने महाविद्यालयाच्या परिसरात नसावीत. तिथे महाविद्यालयीन विद्यार्थीच जास्त प्रमाणात असतात. नको त्या वयात अशा पदार्थाचे सेवन करण्याची सवय महाविद्यालयापासूनच विद्यार्थ्यांना लागण्याची शक्यता त्यामुळे निर्माण होते. हे चुकीचे आहे.
शिवरत्न कलगुडे
अशा दुकानांवर पूर्णपणे बंदी आणणे गरजेचे आहे. तरुण विद्यार्थी वयाच्या एका कोमल वळणावर प्रवास करत असताना अशा गोष्टींच्या आहारी जात असतात. पान मसाल्याबरोबरच अमली पदार्थही मुलांना सहज उपलब्ध झाले तर ते त्यांचे सेवन करणारच. यासाठी महाविद्यालयांनी प्रशासनाच्या मदतीने अशी दुकाने पूर्णपणे बंद करणे गरजेचे आहे.
सुदीप पात्रा
महाविद्यालयाबाहेर दिवसेंदिवस पानमसालासारख्या पदार्थाची विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे; परंतु या दुकानांची वाढती संख्या व या पदार्थाच्या विक्रीस महाविद्यालये जबाबदार नसून प्रशासन जबाबदार आहे. प्रशासनाने या दुकानांवर बडगा उगारल्यास संबंधित प्रश्न सुटण्यास मदत होईल.
अनुजा साठे
चांगले किंवा वाईट हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. महाविद्यालयीन व्यवस्थापन केवळ त्यांच्या आवारात होणाऱ्या गोष्टींवरच र्निबध घालू शकतात. बाहेरील गैरप्रकारांची जबाबदारी ही संबंधित प्रशासनाची असली पाहिजे. कायद्यानुसार महाविद्यालयाच्या शंभर फुटांच्या आवारात पानमसाला विक्रीवर बंदी आहे, त्यावर लक्ष ठेवणे हे प्रशासनाचे काम आहे.
कुशन कोडे
महाविद्यालयाच्या शंभर मीटर परिसरात पान मसालासारख्या पदार्थाची विक्री करू नये असा फलक लावलेला असतानाही महाविद्यालयाबाहेर अशी काही दुकाने आहेत. यात महाविद्यालय काही करू शकत नाही, तर स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यायला हवे.
वाय-फाय सेवा उपलब्ध करून द्यावी का?
मोहित शर्मा
महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी वाय-फाय इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही; परंतु महाविद्यालयात स्वतंत्र संगणक कक्षाची व्यवस्था असून विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार त्यांना संगणक उपलब्ध करून दिले जातात. या संगणकांच्या साहाय्याने विद्यार्थी त्यांचा अभ्यास करत असतात.
सीसीटीव्ही यंत्रणा असणे गरजेचे वाटते का?
सुदीप पात्रा
नक्कीच. महाविद्यालयात सुरक्षिततेच्या दृष्टीने सी.सी.टी.व्ही. यंत्रणा बसविणे गरजेचे असते. गेल्या वर्षीच महाविद्यालयात ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. अशा आधुनिक यंत्रणांचा उपयोग करून घेत असताना महाविद्यालयातील जुन्या आणि पारंपरिक नियमावलीला बगल देण्याची सध्या गरज निर्माण झाली आहे.
महाविद्यालयातील ‘ड्रेस कोड’बद्दल काय मत आहे?
अनुजा साठे
महाविद्यालयाने नियमांची आखणी ही विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन केलेली असते. त्यामुळे ड्रेस कोड असणे गरजेचे आहे. आपण काय परिधान करतो यावर आपल्या परिस्थितीचा किंवा स्वभावाचा अंदाज येत असतो; परंतु असे नियम हे वर्षभर पाळले जावेत, त्यांना काही दिवस अपवाद असता कामा नये, असे माझे स्पष्ट मत आहे.
शिवरत्न कलगुडे
अशा प्रकारचे नियम असणे अत्यावश्यक आहे, जेणेकरून मुलींची छेडछाड किंवा टिंगल करणे याला आळा बसू शकतो. महाविद्यालयामध्ये कपडय़ांवर बंधन असणे हे काही प्रमाणात आवश्यक आहे. अशा नियमांचे पालन करणे किंवा नाही करणे ही सर्वस्वी विद्यार्थ्यांची जबाबदारी असते.
कुशन कोडे
महाविद्यालयात ‘ड्रेस कोड’ असल्याने सभ्यता आणि सुसंस्कृतपणा कायम राहतो. त्यामुळे ‘ड्रेस कोड’ असणे आवश्यकच आहे.
कॉलेजच्या उपाहारगृहाबद्दल काय मत आहे?
कुशन कोडे
महाविद्यालयाच्या उपाहारगृहात वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ मिळत नाहीत, ते बाहेर उपलब्ध होतात. त्यामुळे बाहेरील खाण्याची दुकाने असावीतच. प्रत्येक महाविद्यालयाच्या बाहेरील खाण्याच्या स्टॉलवरील एखादा पदार्थ लोकप्रिय असतोच. त्यामुळे मित्रमैत्रिणींसोबत खाण्याची मज्जा वेगळीच असते. कॉलेज कँटीनबद्दल बोलायचे झाले तर तेही उत्तमच आहे. स्वच्छता पाळली जाते.
अनिरुद्ध चाटला
महाविद्यालयातील कॅन्टीनमध्ये विद्यार्थी बसले असताना त्यांना काही नियमांची सूट देणे गरजेचे आहे. जसे की, बऱ्याच महाविद्यालयांमध्ये कॅन्टीनमध्ये बसले असतानाही महाविद्यालयाचे ओळखपत्र परिधान करणे बंधनकारक असते. अशा नियमांपासून विद्यार्थ्यांना मोकळीक देणे गरजेचे आहे. काही महाविद्यालयांत सुरक्षारक्षक कॅन्टीनमध्ये येऊन विद्यार्थ्यांना हटकत असतात. त्यामुळे अशा गोष्टींना महाविद्यालयाने आळा घालणे गरजेचे आहे.
मोहित शर्मा
महाविद्यालयातील कॅन्टीनच्या स्वच्छतेकडे महाविद्यालयाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. महाविद्यालयातील कॅन्टीनमध्ये बनविल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थाची गुणवत्ता जर खालावली, तर सबंध महाविद्यालयासाठी गंभीर आरोग्यविषयक प्रश्न निर्माण होतील. महाविद्यालयातील कॅन्टीनमध्ये सर्वच खाद्यपदार्थ उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे वेगवेगळ्या खाद्यपदार्थाचा आस्वाद घेता यावा, या उद्देशाने महाविद्यालयीन तरुण-तरुणी महाविद्यालयाबाहेरच्या खाऊगल्ल्यांकडे वळतात. त्यामुळेच महाविद्यालयाच्या बाहेर फूड कॉर्नर असणे गरजेचे आहे.