धडकेत ज्येष्ठ नागरिक जखमी; पोलिसांकडून कारवाई नाही
वाऱ्याच्या वेगाने मोटारसायकल चालविणाऱ्या तरुणांमुळे कल्याण-डोंबिवलीकर अक्षरश: हैराण झाले असून डोंबिवली पूर्वेकडील मॉडेल महाविद्यालयाच्या परिसरात अशाच एका मोटारसायकलस्वाराने दिलेल्या धडकेत ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकास दुखापत झाल्याची घटना घडली आहे. डोंबिवलीतील फडके मार्ग परिसरातही गेल्या काही दिवसांपासून अशा स्टंटबाजांनी पादचाऱ्यांना त्रस्त करून सोडले आहे. एका पादचाऱ्यास मोटारसायकलने धडक दिल्याची घटना पंधरवडय़ापूर्वी घडली होती.
वेगाशी स्पर्धा करीत स्टंटबाजी करण्यासाठी डोंबिवलीतील मॉडेल कॉलेज रोड, पी अॅण्ड टी कॉलनी, ठाकुर्ली रेल्वे समांतर रस्ता, पश्चिमेतील गणेशघाट अशी काही निवडक ठिकाणे मोटारसायकलस्वारांची आवडती ठिकाणे आहेत. मार्च महिन्यात पश्चिमेतील गणेशघाट परिसरात मोटारसायकलच्या धडकेत ५२ वर्षीय सुरेश ठाकूर यांच्यासह पाच नागरिक जखमी झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता पूर्वेतील मॉडेल कॉलेज रोडवर मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास साईदीप सोसायटीत राहणारे ६६ वर्षीय सखाराम गायकवाड नांदगावकर हे ज्येष्ठ नागरिक जखमी झाले आहेत. काही निवडक रस्त्यांवर मोटारसायकलस्वार ‘स्टंटबाजी’ करतात याविषयी परिसरातील नागरिकांनी त्या त्या पोलीस स्टेशनला रीतसर तक्रार नोंदवून कळविले असले तरी पोलिसांना अद्यापपर्यंत या प्रकाराला आळा घालता आलेला नाही, हे या घटनेवरून स्पष्ट होते.
सखाराम याविषयी म्हणाले, सकाळी नेहमीप्रमाणे साडेदहाच्या सुमारास मी घराबाहेर शाखेत जाण्यासाठी निघालो. त्याचदरम्यान पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या मोटारसायकलस्वाराचा धक्का मला लागल्याने मी खाली हातावर पडलो. यात माझा हात फॅक्चर झाला आहे. क्षणात हे घडल्याने मला सुरुवातीला काही सुचले नाही. यामुळे त्या गाडीचा नंबरही पाहता आला नाही. मानपाडा पोलिसांना या घटनेची माहिती दिली आहे, परंतु गाडीचा नंबर नसल्याने तेही काही करू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.
जाग कधी येणार?
निवासी विभागातील नागरिक राजू नलावडे म्हणाले, मॉडेल कॉलेजसमोर दिवस-रात्र दुचाकीस्वारांचा उच्छाद असतो. याविषयी पोलिसांना आम्ही वारंवार कळविले आहे, परंतु ते नेहमी बाईकचा नंबर नोंदवून ठेवा, असे सल्ले देतात. त्यांनी या भागातील गस्त वाढवून या मुलांना जरा दम भरला तरी हे प्रमाण कमी होईल. एखाद्याचा जीव गेल्यानंतर पोलिसांना जाग येणार आहे का, असा सवाल त्यांनी केला.