गेल्या काही दिवसांत हॉटेल संस्कृती मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. मात्र मोठे कुटुंब आणि धकाधकीच्या जीवनात नोकरी-व्यवसायावरून घरी परतल्यावर पुन्हा हॉटेलमध्ये खाण्यासाठी बाहेर जाणे जिवावर येते. त्यावर उत्तम उपाय म्हणजे पार्सल मागविणे. त्यातूनच विविध प्रकारची टेक अवे सेंटर्स सुरू झाली आहेत. अंबरनाथमधील कानसई विभागात काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या अशाच एका खाऊसेंटरने अल्पावधीतच खवय्यांची पसंती मिळवली आहे. या सेंटरने नाव मजेदार आहे. ‘सबपार्सल’. त्यातून इथे सर्व प्रकारचे पदार्थ फक्त पार्सल स्वरूपातच मिळतात, हा अर्थ स्पष्टपणे ध्वनित होतो. हॉटेल्समध्ये मिळणाऱ्या अनेक शाकाहारी आणि मांसाहारी डिश येथे पार्सल स्वरूपात मिळतात. शाकाहारी जेवणासोबतच विविध प्रकारच्या बिर्याणी, स्टार्टर्स आणि रविवार विशेष मेन्यूच्या माध्यमातून आपल्या आवडीचे जेवण घरी घेऊन नेण्यासाठी अंबरनाथकरांना एक नवी सुविधा ‘सब पार्सल’च्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. सध्या तरी ‘सब पार्सल’मध्ये ऑर्डर दिल्यावर पदार्थ आणायला प्रत्यक्ष जावे लागते. मात्र लवकरच घरपोच सेवा दिली जाणार आहे.

मांसाहारी पदार्थ आवडीने खाणारे खवय्ये सातत्याने नव्या खास चवीच्या शोधात असतात. ‘सब पार्सल’मध्ये अगदी सुरुवातीपासूनच उत्तम दर्जा आणि चव राखली गेल्याने शहरातील अनेक दर्दी खवय्ये येथे नियमितपणे येऊ लागले आहेत. ‘सब पार्सल’मध्ये विविध प्रकारचे मांसाहारी स्टार्टर्स, त्यात पॉप्स, नगेट्स, हरियाली कबाब, शीग कबाब, कटलेट, लॉलीपॉपचे अनेक प्रकार चाखता येतात. विशिष्ट मसाल्यांतून तयार झालेले चिकन करी, प्रॉन्स करी आणि खिमा इथे मिळतो. मात्र ‘सब पार्सल’ची खास ओळख म्हणजे येथील बिर्याणी. शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारची बिर्याणी येथे मिळते. सकाळच्या वेळी विविध प्रकारचे पराठे, थालीपीठ तसेच व्हेज लॉलीपॉपपासून ते स्प्रिंग रोल आणि मंचुरियनपर्यंत पदार्थ खाण्याची आवड असणाऱ्या सर्वाना इथे काही ना काही मिळतेच. ‘सब पार्सल’मध्ये कोणता पदार्थ कोणत्या वेळी मिळणार, याची आचारसंहिता ठरलेली आहे. म्हणजे सकाळी न्याहारीचे सर्व पदार्थ मग अकरानंतर जेवणाचे तसेच संध्याकाळी व्हेज- नॉनव्हेज अशा दोन्ही प्रकारच्या पदार्थाची मेजवानी इथे असते. अवघ्या २५ रुपयांपासून ते २२० रुपयांपर्यंतचे विविध मेन्यू इथे चाखता येतात.वाचनालय ते झेरॉक्सचे दुकान आणि आता ‘सब पार्सल’ असा या दुकानाचा झालेला प्रवास. महाविद्यालये आणि नाटय़गृहांच्या कॅन्टीन चालविण्याचा अनुभव असलेल्या सलील पटवर्धन यांच्याशी झालेल्या मैत्रीतून नंतर अशा प्रकारचे हॉटेल सुरू करण्याचा विचार सुचल्याचे महेश सुभेदार सांगतात. सध्याच्या आघाडीच्या विनोदी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांच्या संकल्पनेतून प्रत्यक्षात ‘सब पार्सल’ साकार झाले. मे महिन्यात सुरू झालेल्या या ‘सब पार्सल’चे ग्राहक दिवसेंदिवस वाढत असून त्यांच्या ‘पार्सल’ संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.  दोन टप्प्यांत येथील कामकाज चालते. पहिला टप्पा हा हॉटेलबाहेर घरी, तर दुसरा टप्पा हॉटेलमध्ये. पहिल्या टप्प्यात भाजी, चिकन, तांदूळ शिजवणे अशी कामे घरीच पार पाडली जातात. मग त्यानंतरचा दुसरा टप्पा हॉटेलात पार पाडला जातो. मागणीनुसार येथे पदार्थ बनवून दिले जाते. खवय्यांना चविष्ट आणि गरमागरम देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सलील पटवर्धन सांगतात. निरनिराळे पदार्थ बनविण्यासाठी पाच ते सात प्रकारचे तवे आणि भांडी आहेत. त्यामुळे सरमिसळ होत नाही. विशेषत: शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ शिजविताना हा पंक्तिभेद कटाक्षाने पाळला जातो. त्यामुळे खवय्ये निश्िंचत मनाने आमच्याकडचे पदार्थ घेऊन जातात, असेही पटवर्धन सांगतात. कोणत्याही प्रकारचा वास वा दरुगधी येणार नाही, याची आम्ही सतत काळजी घेत असतो, अशी माहिती महेश सुभेदार यांनी दिली. त्यामुळे घरच्या घरी हॉटेलमधील चमचमीत पदार्थ खावेसे वाटले तर ‘सब पार्सल’ हा उत्तम पर्याय आहे.

सब फूड हब

सब पार्सलसोबतच वर्षभरात ज्या वस्तू फक्त काही विशिष्ट काळातच उपलब्ध होत असतात. अशा सर्व गोष्टी, पदार्थ आणि वस्तू एकाच छताखाली देण्याचा प्रयत्न सुभेदार-पटवर्धन दुकलीने ‘सब फूड हब’च्या माध्यमातून केला आहे.

कधी :- दिवस भर, सोमवार बंद

कुठे :- कानसई टपाल कार्यालयाच्या बाजूला, कानसई विभाग, अंबरनाथ पूर्व.

Story img Loader