बदलापूर : मुरबाड तालुक्यात १५ वर्षांत फुटले नव्हते, तेवढे नारळ गेल्या १५ दिवसांत मुरबाडमध्ये फुटले, असा टोला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व महाविकास आघाडीचे मुरबाड मतदारसंघातील नियोजित उमेदवार सुभाष गोटीराम पवार यांनी आमदार किसन कथोरे यांना लगावला. सुभाष पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केल्यानंतर माध्यमांश संवाद साधला. त्यावेळी त्यांनी कथोरे यांच्यावर विविध विषयांवर टीका केली.
राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केल्यानंतर सुभाष पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. विद्यमान आमदार किसन कथोरे यांना भाजपातून उमेदवारी जाहिर झाल्यानंतर सुभाष पवार यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला होता. त्याचवेळी पवार कथोरे यांच्याविरूद्ध मुरबाड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार हे स्पष्ट झाले होते. प्रवेश होताच पवार यांनी कथोरे यांच्यावर विविध विषयांवर टीकास्त्र सोडले. खड्डे संपल्यानंतर मुरबाड मतदारसंघ लागतो, असे म्हणणाऱ्यांच्या कारकिर्दीतच मुरबाड मतदारसंघ खड्ड्यात गेला आहे, अशी टीकाही सुभाष पवार यांनी यावेळी बोलताना केली. मुरबाड विधानसभा मतदारसंघाचा आणि बदलापूर शहराचा विकास याच मुद्द्यावर निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे यावेळी पवार यांनी स्पष्ट केले. गेल्या १५ वर्षांच्या कारकिर्दीत मुरबाड विधानसभा मतदारसंघाचा अपेक्षित विकास झालेला नाही. मुरबाड शहरातील एमआयडीसीतील अनेक उद्योग निघून गेले. त्यामुळे मुरबाडमध्ये तरुणांना रोजगारात वाढ झालेली नाही, ही वस्तूस्थिती आहे, याकडे सुभाष पवार यांनी लक्ष वेधले.
हेही वाचा…ठाणे जिल्ह्यात शिंदे यांच्या शिवसेनेचा उमेदवार ठरेना
एकनाथ शिंदेंबद्दल आदर पण…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आजही आदर आहे. त्यांच्या सहकार्यामुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक कामे पूर्ण करता आली, असे सुभाष पवार यांनी नमूद केले. मात्र यंदाची विधानसभा निवडणूक लढविण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह होता. त्यामुळे मला शिवसेनेबाहेर पडावे लागले, असेही सुभाष पवार म्हणाले. जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे भातपिकासह विविध पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणीही पवार यांनी यावेळी केली.