डोंबिवली पश्चिमेतील सुभाष रस्त्यावरील एक अतिधोकादायक इमारत पालिकेतर्फे बुधवार, गुरुवार (३०,३१ मार्च) या दोन दिवसात पालिकेतर्फे पाडण्यात येणार आहे. या वर्दळीच्या रस्त्यावरील वाहतूक अन्य रस्ते मार्गाने वळविण्यात आली आहे, अशी माहिती डोंबिवली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी दिली.
बुधवारी सकाळी १० ते गुरुवारी रात्री १२ वाजेपर्यंत सुभाष रस्त्यावरील दत्तू जोशी इमारत पाडण्यात येणार आहे. सुरक्षितेचा उपाय म्हणून हा रस्ता बंद केला जात आहे. कुंभारखाण पाडा येथून डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकाकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक नवापाडा चौक, बालीविष्णुप्रसाद सोसायटी येथे बंद केली जाणार आहे. नवापाडा चौकातून वाहन चालकांनी डावीकडे वळण घेऊन गणेशनगर येथून बावन चाळ मार्गे इच्छित स्थळी जावे.
हेही वाचा : कल्याण डोंबिवलीकरांनो सावधान; उद्यापासून सिग्नल मोडला, तर भरावा लागेल दंड
डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकाकडून सुभाष रस्त्याने नवापाडा, कुंभारखाणपाडा येथे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक सुभाष रस्त्यावरील नाना शंकर शेठ चौक मारूती मंदिर येथे बंद केली जाणार आहे. मारूती मंदिराजवळून वाहन चालकांनी डावे वळण घेऊन कोल्हापुरे चौकातून महात्मा फुले रस्त्याने इच्छित स्थळी जावे, असे आवाहन वाहतूक विभागातर्फे करण्यात आले आहे.