लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : भिवंडी शहरासाठी तयार करण्यात आलेल्या शंभर दिवसांच्या कृती आराखडा अंतर्गत प्रभागनिहाय दैनदिन विशेष स्वच्छता मोहिम राबविण्याबरोबरच छोट्या गटारांच्या दैनदिन सफाईसाठी मोहिम राबवून त्या कामाचे जिओ टॅग छायाचित्रे आणि अहवाल सादर करण्याचे निर्देश पालिका आयुक्त अनमोल सागर यांनी आरोग्य व स्वच्छता विभागाच्या आढावा बैठकीत दिले. सार्वजनिक शौचालयांच्या सफाईबरोबरच बाजारपेठ परिसर तसेच जास्त कचरा जमा होणाऱ्या ठिकाणी रात्रीच्या वेळेतही साफ सफाई सुरू ठेवण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

भिवंडी महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त तथा प्रशासक अनमोल सागर यांनी पालिकेचा कारभार हाती घेतल्यानंतर विविध विभागांची बैठक घेण्यास सुरूवात केली असून यामध्ये संबंधित विभागाच्या कामांचा आढावा घेण्याबरोबरच त्यात सुधारणा करण्यासाठी आयुक्त सागर हे महत्वाच्या सुचना करीत आहेत. अशाचप्रकारे त्यांनी आरोग्य व स्वच्छता विभागाची नुकतीच बैठक घेतली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त देविदास पवार, उप-आयुक्त (आरोग्य) शैलेश दोंदे, सहा-आयुक्त (आरोग्य) नितिन पाटील, आरोग्य अधिकारी हरीष भंडारी, कार्यलयीन अधिक्षक जे.एम. सोनवणे तसेच सर्व प्रभाग आरोग्य निरीक्षक उपस्थित होते. या बैठकीत त्यांनी शहरातील सार्वजनिक स्वच्छता, दैनदिन गटार सफाई, जास्त वर्दळीच्या ठिकाणी दिवसातून दोन वेळा स्वच्छता करणे, सामुदायिक आणि सार्वजनिक शौचालयांची विशेष स्वच्छता करणे, या कामांना प्रथम प्राधान्य देऊन नागरीकांच्या तक्रारी तातडीने निवारण करण्याचे सक्त निर्देश आरोग्य व स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. बाजारपेठ परिसर तसेच जास्त कचरा जमा होणाऱ्या ठिकाणी रात्रीच्या वेळेतही साफ सफाई सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सुरक्षा साधन सामुग्रीसह गणवेशात सर्व सफाई कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

शहरातील जास्तीत जास्त नागरीकांना वैयक्तिक शौचालय योजनेचा लाभ मिळण्यासाठी प्रभाग निहाय घरांचे सर्वेक्षण करुन वैयक्तिक शौचालय योजनेची जनजागृती करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. शहरातील झोपडपट्टी क्षेत्रात कचरा संकलनासाठी मोठे कचरा डबे ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. भिवंडी शहरासाठी १०० दिवसांचा कृती आराखडा तयार करण्यात आला असून त्या अंतर्गत प्रभागनिहाय दैनदिन विशेष स्वच्छता मोहिम, छोट्या गटारांच्या दैनदिन सफाईकरीता धडक मोहिम राबवून त्याचे जिओ टॅग छायाचित्र आणि अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. तसेच दर आठवड्यात कामाचा आढावा सादर करणे बंधनकारक केले आहे, अशी माहिती पालिकेचे माहिती व जनसंपर्क अधिकारी श्रीकांत परदेशी यांनी दिली.