मद्यपान हा ‘सामाजिक शाप’ समजल्या जाणाऱ्या आपल्या देशात मद्याच्या अतिसेवनाचे घातक दुष्परिणाम अनेकदा समोर येतच असतात. पण, मंद प्रकाशात, गझलच्या संथ सुरांवर तरळत रिचवलेला ‘व्हिस्की’चा एखादा पेग चित्तलहरींना ताजातवाना करत असतो. अशा धुंद वातावरणात आपल्याला सोबत देणारा तो ‘प्याला’ काही क्षणापुरता आपला सोबती असतो. पण ठाण्यातील सुबोध हांडा यांनी अशा असंख्य प्याल्यांची सोबत आयुष्यभरासाठी जपली आहे. त्यामुळेच १९४७ सालच्या ‘ग्रॅन्ड वर्ल्ड ट्रॅव्हल कलेक्शन’ व्हिस्कीचा जार असो की, ४०च्या दशकातील व्हिस्कीचे परदेशातील मग्ज, हांडा यांच्या संग्रहात एकाहून एक ‘उंची’ ठेवा पाहायला मिळतो.
ठाण्यातील लोकपूरम येथे राहणाऱ्या सुबोध हांडा यांनी देशभरातून गोळा केलेल्या दुर्मीळ अशा ‘व्हिस्की मग’ना आपल्या दिवाणखान्याचा एक भाग बनवून घेतले आहे. परदेशभ्रमणात मिळालेले निरनिराळे ब्रॅडस्चे मगस् आणि विविध व्हिस्की ब्रॅन्ड्सवर भेट म्हणून मिळालेल्या वस्तू अशा गोष्टींचा अनोखा संग्रह हांडा यांच्याकडे पाहायला मिळतो.
या अनोखा संग्रहाचा छंद हांडा यांना त्यांच्या आजोबांकडून मिळालेला वारसा आहे. त्यांचे आजोबा उद्योगानिमित्त ब्रिटनला गेले असताना १९५२मधील ‘स्कॉटिश ग्रँड व्हिस्की’चे दुर्मीळ असे बॅरल त्यांना मिळाले. मद्याच्या साठवणुकीसाठी पूर्वी या मोठाल्या बरणीचा वापर होत असे. असे बॅरल आता तयार होत नाही. त्यामुळे आजोबांची ती साठवण हांडा यांनीही जपून ठेवली आहे. याशिवाय आपल्या उद्योगाच्या निमित्ताने परदेशात कुठेही जायची संधी मिळाली की, हांडा तेथील नावीन्यपूर्ण, आकर्षक अशा मद्याच्या प्याल्यांचा, मग्जचा संग्रह करतात. त्यांच्या संग्रहात १९४७ सालच्या ‘ग्रॅण्ड वर्ल्ड ट्रॅव्हल कलेक्शन’ या व्हिस्कीचा जार आहे. अमेरिकेतील ‘जॅक डॅनिअल’ या व्हिस्कीची बॉटलही त्यांनी जपून ठेवली आहे. १९६२ सालचा ‘व्हिस्की’ जार, १९५६ साली रेस्टॉरंटस्मध्ये वापरले जाणारे बीयरचे ट्रे, १९४० पासूनचे स्कॉटलन्ड, जर्मनी, अमेरिका आदी देशांमधील प्राचीन असे ३० ते ४० विविध प्रकारच्या आकर्षक व्हिस्की मगचा त्यांनी संग्रह केला आहे. आपला हा संग्रह लोकांना पाहता यावा, यासाठी एफ-१५ निहारीका, लोकपूरम, ठाणे या ठिकाणी त्यांनी आपल्या कार्यालयात छोटेसे संग्रहालयही उभे केले आहे.
जुन्या वस्तूंचाही ठेवा
हांडा यांना केवळ मद्याचे प्याले जमवण्याचा छंद नाही. त्यांच्या संग्रहात १९४२ सालचा वॉल माउंट फोन, १९६८ चा रेडियो, १९५२ सालचा लॅम्प, १९३० सालचा ग्रामोफोन, मोठय़ाने टोला लावणारे १९४३ सालचे घडय़ाळ, तसेच जर्मनीमधील १९५० साली रस्त्यांवर वापरले जाणारे दिवे, रेल्वेमध्ये वापरले जाणारे १९६५चे दिवे, १९५०ची कोळशावर चालणारी पितळेची इस्त्री, जहाजांवर वापरले जाणारे दिवे, विविध औषधांच्या बाटल्या अशा अनेक वस्तू आहेत.
शलाका सरफरे, ठाणे
ठाण्यातील सुबोध हांडा यांना मद्याच्या रिकाम्या बाटल्या, प्याले यांच्या संग्रहाची नशा
मद्यपान हा ‘सामाजिक शाप’ समजल्या जाणाऱ्या आपल्या देशात मद्याच्या अतिसेवनाचे घातक दुष्परिणाम अनेकदा समोर येतच असतात.
आणखी वाचा
First published on: 11-02-2015 at 12:31 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Subodh handa hobby of collection empty bottles and cups