मुरबाडमधील शेतकऱ्याचा अभिनव प्रयोग; फुलशेतीच्या माध्यमातून भरघोस नफा प्राप्ती
शेतात तयार झालेल्या मालास रास्त भाव मिळत नसल्याने बहुतेकदा शेती व्यवसाय आतबट्टय़ाचा ठरतो. मात्र मुरबाड तालुक्यातील एका शेतकऱ्याने कल्पकता दाखवून शेती व्यवसायातील ‘पिकते तिथे विकत नाही’ हे वास्तव बदलण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. नंदकुमार कुर्ले या शेतकऱ्याने स्वत:च्या जागेत फूलशेती करून त्याआधारे म्हसा येथे फूलविक्रीचे दुकान थाटले आहे. अशा प्रकारे कच्चा माल आणि उत्पादन दोन्हींची सांगड घातल्याने दर महिना काही हजारांचे ठोस उत्पन्न या कुटुंबाला मिळू लागले आहे. गेली पाच वर्षे कुर्ले कुटुंबीय फुलांची लागवड आणि हारविक्रीचा व्यवसाय करीत आहेत.
[jwplayer CdTbNsE8]
मुरबाड तालुक्यातील कान्होळ गावाजवळ नंदकुमार कुर्ले यांची पाच एकर जागा आहे. त्या जागेपैकी एक एकर जागेत त्यांनी झेंडू, लिली, अष्टर आदी फुलझाडे तसेच तुळशीची लागवड केली आहे. त्यांची पत्नी, आई, बहीण त्यांना फुलबागेची निगा राखण्यासाठी मदत करतात. या बागेतील फुले आणि तुळस कुर्ले कुटुंबीय कुठेही बाहेर विकत नाहीत. नंदकुमार कुर्ले यांचे म्हसा गावात ‘श्री समर्थ कृपा फूल भांडार’ हे दुकान आहे. बागेतल्या फुलांचा वापर हार तयार करण्यासाठी केला जातो.
म्हसा गावात म्हसोबाचे मंदिर आहे. तिथे जानेवारी महिन्यात मोठी जत्रा भरते. याशिवाय गणपती, नवरात्र- दसरा, दिवाळी, मार्गशीर्ष महिना, गुढी पाडवा या काळात हारांना विशेष मागणी असते. या सीझननुसार कुर्ले फुलांची लागवड करतात. शेतकऱ्यांनी त्यांच्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्याची विक्री केल्यास त्यांना अधिक उत्पन्न मिळू शकते, हे कुर्ले कुटुंबीयांनी दाखवून दिले.
वर्षभराची बेगमी
साधारण जून महिन्यात नंदकुमार तुळस आणि झेंडूच्या फुलाची लागवड करतात. त्यातून ऑक्टोबर- नोव्हेंबपर्यंत त्यांना उत्पन्न घेता येते. दुसरी लागवड ते जानेवारी महिन्यात करतात. त्यामुळे एप्रिल-मे महिन्यापर्यंत त्यांना बागेतून फुले आणि तुळस मिळते. जून ते डिसेंबर आणि जानेवारी ते जून असे वर्षांतून दोनदा ते पिके घेतात. जून महिन्यात केलेल्या लागवडीतून त्यांना गणपती, नवरात्र आणि दिवाळीपर्यंत तर जानेवारीतील लागवडीतून त्यांना गुढी पाडवा, अक्षय्य तृतीयापर्यंत फुले मिळतात. म्हसा हे जागृत देवस्थान असल्याने तिथे बाराही महिने भाविकांचा राबता असतो. त्यामुळे कुर्ले यांना हारविक्रीतून उत्तम पैसे मिळतात. लागवड आणि देखभालीचा खर्च वजा जाता वर्षभरात ७० ते ८० हजार निव्वळ नफा मिळत असल्याची माहिती कुर्ले यांनी दिली.
[jwplayer 9AX3hgPE]