खुल्या मालगाडय़ांमधील कोळसा वाहतुकीमुळे स्थानके काळवंडली; भुकटीच्या माऱ्यामुळे आरोग्याला अपाय
विविध समस्यांनी नेहमीच ग्रासलेल्या उपनगरी रेल्वे प्रवाशांना आता स्थानकांमध्ये प्रदूषणालाही सामोरे जावे लागत आहे. मुंबई, ठाण्यातील उपनगरी मार्गावरून धडधडत जाणाऱ्या कोळशाने भरलेल्या रेल्वे मालगाडय़ांतून फलाटांवरील प्रवाशांवर अक्षरश: काळय़ा रंगाची उधळण होत आहे. कोणत्याही आवरणाशिवाय होत असलेल्या या मालवाहतुकीमुळे फलाटांवर कोळशाच्या भुकटीची फवारणीच होत असल्याचे चित्र असून त्यामुळे प्रवाशांचे कपडे खराब होण्यासोबत ही भुकटी नाकातोंडात जाऊन प्रवाशांच्या आरोग्यालाही अपाय उद्भवू लागला आहे. सध्या अनेक रेल्वे स्थानकांवर फलाटांची उंची वाढवण्याचे काम सुरू असल्याने येथे सिमेंट तसेच मातीची धूळ पसरत असते. त्यातच आता कोळशाच्या भुकटीची भर पडली आहे.
रेल्वे मालवाहतुकीचा सर्वाधिक वापर कोळसा वाहतुकीसाठी होत असून, देशाच्या कानाकोपऱ्यातून ही वाहतुक केली जाते. मुंबई उपनगरीय रेल्वेमार्गावरून मोठय़ा प्रमाणात कोळसा वाहतूक केली जात. खुल्या मालवाहतूक डब्यात काठोकाठ भरलेल्या कोळशाची वाहतूक प्रवाशांसाठी मात्र त्रासदायक ठरत आहे. या मालगाडय़ा वेगाने उपनगरीय रेल्वे स्थानकातून धावतात. त्यातून मोठय़ा प्रमाणात कोळशाची भुकटी स्थानकांच्या फलाटांवर पडते. त्यामुळे फलाटांवर काळ्या धुळीचा थर निर्माण होऊ लागला आहे. कल्याण पलीकडच्या स्थानकांमध्ये मालगाडीचा वेग वाढत असल्याने तेथे पडणाऱ्या भुकटीचे प्रमाण सर्वाधिक आहे. ही भुकटी नाकातोंडात तसेच डोळय़ांत जात असल्याने प्रवाशांना त्रास होऊ लागला आहे. आधीच ठाणे-कल्याण-डोंबिवली स्थानकांमध्ये फलाट उंचीची कामे सुरू असून त्या धुळीचा त्रास प्रवाशांना होत आहे. याशिवाय कोळशांच्या गाडय़ांचा त्रासही दिवसेंदिवस वाढू लागला आहे. याआधी रेल्वेने अशा कोळसा वाहतूक गाडय़ांवर कापड लावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र असे कापड फाटून ओव्हरहेड वायरींना धोका निर्माण होतो. यामुळे यावर सध्या तरी कोणताही उपाय नसल्याचे रेल्वे जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले.

वायुप्रदूषणामध्ये काजळीचा समावेश असून त्यामुळे फुप्फुसांना धोका उद्भवतो. काजळीमुळे सुरुवातीला सर्दी, खोकल्याचा त्रास होतो. कालांतराने त्याचे रूपांतर अस्थमासारख्या विकारामध्ये होते. श्वसनातील काजळीचे प्रमाणे सातत्याने वाढल्यास त्यातील धातूंच्या कणांमुळे फुप्फुसाची कार्यक्षमता कमी होऊन ते निकामे होऊ शकते.
– डॉ. उल्हास कोल्हटकर, पर्यावरणतज्ज्ञ

प्रवाशांना कोळशाच्या धूळफेकीचा त्रास वारंवार सहन करावा लागतो. याप्रकरणी प्रवासी संघटनांनी सातत्याने पाठपुरावा केला . रेल्वे प्रशासनाने प्लास्टिक ताडपत्रीच्या साहाय्याने कोळशाच्या गाडय़ा झाकण्याचे अश्वासन दिले होते. मात्र तरीही गाडय़ांमधून कोळशाची धूळ फलाटांवर पडण्याचे प्रमाण कमी झालेले नाही.
– शैलेश राऊत, कल्याण-कसारा-कर्जत प्रवासी संघटना

 

Story img Loader