कल्याण: शीळ रस्त्यावरील पलावा चौकातील शांती उपवन या अतिधोकादायक इमारतींमधील २५० कुटुंबियांच्या घरातील आवश्यक सामान बाहेर काढण्यास ठाणे आणि कल्याण डोंबिवली पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाना यश आले. कुटुंबियांमधील दोन सदस्य आणि त्यांच्या सोबत आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन विभागाचे जवान पाठवून धोकादायक इमारतींमधील घरातील किमती आणि आवश्यक सामान शनिवार, रविवारी बाहेर काढण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शांती उपवन इमारतीमधील शनिवारी रात्री तडे गेल्यानंतर आणि इमारत खचू लागल्याचे दिसताच या गृहप्रकल्पातील पाच इमारतींमधील २५० कुटु्बियांना रात्रीच घराबाहेर सुखरुप काढण्यात आले होते. या रहिवाशांमधील बहुतांशी कुटुंबियांमधील मुले दहावी, बारावीची परीक्षा देत आहेत. तसेच अनेक घरात ज्येष्ठ नागरिक, वृध्द, लहान बाळे आहेत. त्यांचे या धावपळीत सर्वाधिक हाल झाले. बहुतांशी रहिवाशांनी आपल्या नातेवाईकांकडे आसरा घेतला आहे. काहींनी याच भागात भाड्याने घर घेऊन राहण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा >>> ठाण्यात आरटीईअंतर्गत ऑनलाइन प्रवेशासाठी प्रक्रिया सुरू; २८९२ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया

या इमारतींमधील एफ इमारत पूर्णपणे धोकादायक झाली आहे. या इमारतींमुळे परिसरातील इमारतींना धोका म्हणून ही इमारत अत्याधुनिक यंत्रणेच्या साहाय्याने जमीनदोस्त केली जाणार आहे. घरातून सामान बाहेर काढताना रहिवाशांना गहिवरुन आले होते. घरातील पाळीव श्वान, मांजर यांनाही रहिवाशांनी कुटुंबातील सदस्याप्रमाणे सुखरुप बाहेर काढले. जीविताला कोणताही धोका निर्माण होणार नाही अशा पध्दतीने रहिवासी धोकादायक इमारतीत आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांसोबत जाऊन आवश्यक सामान घरातून बाहेर काढत होते.

कल्याण डोंबिवली पालिकेचे उपायुक्त सुधाकर जगताप, साहाय्यक आयुक्त भारत पवार, अग्निशमन विभाग प्रमुख नामदेव चौधरी, सुरजकुमार यादव, ठाणे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त, अग्निशमन प्रमुख अविनाश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली या भागात कोणताही धोका होणार नाही यादृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली रहिवाशांनी घरातून सामान बाहेर काढले.

हेही वाचा >>> ठाणे: पाणी पुरवठ्याची तक्रार विनाविलंब दूर करण्यासाठी संवेदनशीलता दाखवा

कल्याण लोकसभेचे खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या आदेशावरुन कल्याण डोंबिवली, ठाणे पालिकेच्या आपत्कालीन पथकांनी रहिवाशांचे सामान सुखरुप बाहेर काढण्यात महत्वाची कामगिरी बजावली. घटनास्थळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आ. प्रमोद पाटील यांनी भेटी दिल्या. आम्हाला आमच्या हक्काचे घर द्या, अशी मागणी रहिवाशांनी लावून धरली आहे. शांती उपवन मधील इमारतींची अनेक वर्ष देखभाल दुरुस्ती न केल्याने हा प्रकार घडल्याचे रहिवासी सांगतात.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Success in evacuating building residents of the dangerous shanti upvan ysh