ठाणे : तंबाखूच्या सेवनामुळे मौखिक कर्करोगाचा धोका असतो. कर्करोग झाल्यानंतर त्यावर उपचार करण्यासाठी सर्वाधिक खर्च होत असतो. हा खर्च सर्वसामान्य नागरिकांना परवडणारा नसतो. त्यासाठी त्यांना मुंबईतील टाटा रुग्णालयात जावे लागते. परंतू, ठाणे जिल्ह्यातील रुग्णांना आता, टाटा रुग्णालयात जाण्याची अवश्यकता लागणार नसल्याचे चिन्हे आहेत. ठाणे जिल्हा रुग्णालयात प्रथमच मौखिक कर्करोगावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयामुळे ठाणे जिल्ह्यातील रुग्णाना आता, काहीसा दिलासा मिळू लागला आहे.

ठाण्यात रहाणारे रामनाथ जाधव (७०) (नाव बदलेले) यांना गेल्या अनेक वर्षांपासून तंबाखू खाण्याची सवय होती. मात्र या तंबाखूने आपल्याला मौखिक कर्करोगाला सामोरे जावे लागेल याची जाणीव त्यांना नव्हती. अचानक तोंडातली जीभ जाड झाल्याने बोलताना जेवताना त्रास जाणवू लागला. या त्रासामुळे रामनाथ हे उपचारा निमित्त ठाणे जिल्हा रुग्णालयात आले होते. यावेळी त्यांच्या जिभेची बायप्सी करण्यात आली. त्यावेळी त्यांना जीभेचा कर्करोग असल्याचे समजले. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना जिभेची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला.

शस्त्रक्रिया करण्यापूर्वी रामनाथ याची सर्व रक्त चाचणी करण्यासह तज्ज्ञ डॉक्टरांकडून शारीरिक स्वास्थ्याची तपासणी करण्यात आली. यावेळी रामनाथ यांचा कर्करोग जिभेपासून मानेपर्यंत पसरला होता. त्यामुळे ही जोखमीची शस्त्रक्रिया ऑनको सर्जन डॉ. हितेश सिंगवी यांच्या मदतीने पार पाडण्यात आली. ही शस्त्रक्रिया जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली दंत शल्य चिकित्सक डॉ. अर्चना पवार, भूलतज्ज्ञ डॉ. प्रियांका महांगडे, डॉ. सुजाता पाडेकर यशस्वी केली.

गेल्या वर्षभरात ठाणे जिल्हा रुग्णालयात पाचवी यशस्वी कमांडो शस्त्रक्रिया पार पडली आहे. कमांडो शस्त्रक्रिया म्हणजेच ज्यामध्ये मुखाचा संसर्गित भाग आणि मानेतील गाठ शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकली जाते.- डॉ. अर्चना पवार, जिल्हा दंतशल्य चिकित्सक, ठाणे.

ठाणे जिल्हा रुग्णालयात रुग्णांना दर्जेदार उपचार उपलब्ध करून देणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. खासगी रुग्णालयांमध्ये कर्करोग उपचारांचे मोठे आर्थिक ओझे सर्वसामान्यांना परवडत नाही. त्यामुळे अनेक रुग्णांना मुंबईतील टाटा रुग्णालयात धाव घ्यावी लागते. मात्र, ठाणे जिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मौखिक कर्करोगाच्या शस्त्रक्रिया केल्या जात असून रुग्णांना दिलासा मिळत आहे.- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे.