ठाणे – पक्षाघात (बेल्स पाल्सी) चा झटका आल्यावर अनेकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होते. परंतू, या आजारावर वेळेवर औषधोपचार आणि फिजिओथेरपी करणे महत्त्वाचे असते. याचे उत्तम उदाहरण ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात दिसून आले आहे. चेहऱ्याचा पक्षघात (बेल्स पाल्सी) ने त्रस्त झालेल्या पाच रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात फिजिओथेरपी आणि चांगले उपचार मिळाल्यामुळे हे रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत.

बेल्स पाल्सी हा चेहऱ्याच्या एका बाजूला होणारा तात्पुरता पक्षाघात आहे. यामध्ये चेहऱ्याच्या स्नायूंवर परिणाम होतो, ज्यामुळे डोळा पूर्णपणे बंद होत नाही, तोंड एका बाजूला झुकते, हसताना अडचण येते आणि चव बदलते. हा आजार मुख्यतः फेशियल नर्व्हमध्ये (चेहऱ्याच्या मज्जातंतू) सूज आल्यामुळे होतो. सध्या चेहऱ्याचा पक्षाघात (बेल्स पाल्सी) झालेले अनेक रुग्ण बघायला मिळतात. पक्षाघात झाल्यावर पुढे आपले कसे होणार ही चिंता रुग्णांमध्ये सतावत असते. परंतू, अशा रुग्णांना योग्य उपचार आणि फिजिओथेरपी देऊन पूर्णपणे बरे करण्याचे काम सिव्हिल रुग्णालय करत आहे. गेल्या दोन महिन्यात चेहऱ्याचा पक्षाघत (बेल्स पाल्सी) झालेल्या पाच रुग्णांवर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धिरज माहंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी उपचार झाले असल्याची माहिती
फिजिओथेरपीस्ट डॉ. ज्ञानेश्वर सलगर यांनी दिली.

बेल्स पाल्सी आजार कसा होतो ?

व्हायरल संसर्ग : हर्पिस, व्हेरिसेला झोस्टर, इन्फ्लुएन्झा
रोगप्रतिकारशक्ती कमी होणे
मधुमेह आणि उच्च रक्तदाब
अचानक तापमान बदल – थंड वाऱ्याचा जास्त संपर्क
अपघात किंवा मानसिक ताणतणाव

लक्षणे काय ?

  • कानाच्या मागे किंवा कानाभोवती वेदना
  • डोळे पूर्णपणे बंद न होणे किंवा सतत कोरडे होणे
  • गाल फुगवताना हवा एका बाजूने निसटणे
  • जेवताना अन्न किंवा पाणी एका बाजूने गळणे
  • तोंड एका बाजूला वाकडे होणे, चेहऱ्याचे हावभाव बदलणे

एखाद्याला चेहऱ्याचा पक्षघात (बेल्स पाल्सी) झाला तरी घाबरून जायचे कारण नाही, वैद्यकीय उपचार आणि फिजिओथेरपीने साधारणपणे एक ते तीन महिन्यात कमी अधिक कालावधीत बरा होतो. रुग्णालयातच इलेक्ट्रीकल स्टिम्युलेशन देवून स्नायूंचे आकुंचन घडवून आणले जाते. कपाळावर आठ्या पाडणे, डोळ्यांची उघड झाप करणे, गालाचा फुगा करणे, मेणबत्ती विझवणे, शिट्टी वाजवणे या उपचारांनी रुग्ण पूर्णपणे बरा होतो. – डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्य चिकित्सक, ठाणे

Story img Loader