ठाणे स्टेशनपासून अगदी हाकेच्या अंतरावर, बेडेकर हॉस्पिटलच्या बाजूच्या गल्लीच्या टोकाशी असलेलं; करारी, धारदार व्यक्तिमत्त्वाच्या, केटरिंगच्या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या एका कर्तृत्ववान ‘आजी’च्या प्रयत्नातून साकारलेलं बैठं घर. घराचं वय र्वष ऐंशी. तरीही आपलं अस्तित्व टिकवून ठेवणारं. उंच उंच न होता, व्यवसायाच्या गरजेनुसार आकारमान वाढवत, काळाच्या पाऊलखुणा जपत आडवं पसरलेलं. अंगणभर पसरलेला मांडव, एका बाजूला चार घोडय़ांचा तबेला, मिरवण्याच्या तयारीत असलेली चकचकीत बग्गी, घराला टेकून उभा असलेला उभ्या बांबूंचा घोळका. जिकडे तिकडे खच्चून भरलेली व्यवसायाभिमुख सामग्री. केटर्स, मंडप कॉन्ट्रॅक्टर, अश्वपाल संघटना, आयोजक- अमरनाथ यात्रा, काविळीवर घरगुती उपचार, नृत्यशाळा, भाडय़ाने मिळणारा कपडेपट अशा अनेक व्यवसायांच्या पाटय़ा अलंकारांसारख्या मिरवणारे केतकर बंधूंचे एकत्र कुटुंब. हा सगळा पसारा सांभाळणाऱ्यांपैकी एक, मकरंद मोहन केतकर, दिलेली
वेळ पाळण्याकरिता अगदी ‘घोडय़ावरूनच’ आले.
खरं तर ‘घोडय़ावरून येणं’ हे शब्दश: ही त्यांच्या बाबतीत खरं आहे, कारण त्यांनी चार घोडे पाळलेले आहेत. घोडय़ांवर ते जिवापाड प्रेम करतात. खरं तर प्राण्यांबद्दलची आवड रक्तातच आहे. ते लहान असताना त्यांच्याकडे बैलगाडी होती. आजी बैलगाडीतून भाजी आणायला जात असे. हीच बैलगाडी पाटील कंपनीच्या घोडय़ांसोबत सनईच्या सुरावटीवर शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या नवरात्रातील देवीच्या मिरवणुकीत सहभागी होत असे. मकरंद केतकर यांची मावशी माथेरानला राहायची. तिचा हॉटेल आणि अश्वारोहणाचा व्यवसाय होता. सुटीत तेथे गेल्यानंतर घोडय़ांच्या मागे फिरण्यातच मकरंद यांचा दिवस जायचा. हळूहळू घोडय़ाने त्यांच्या मनात घर करायला सुरुवात केली आणि त्यातूनच केतकरांच्या घरात एक शिंगरू आणण्यात आलं. शिंगरू मोठं होत गेलं, त्यावर टांग मारून बसताना, पिछाडी सांभाळताना धमन्यांतून वाहणारं रक्त सळसळत असे. वीरश्री संचारल्याचा भास होई. शिंगरूपाठोपाठ घोडा आला. घोडय़ावर स्वार होऊन लगाम हातात घेऊन घोडय़ांच्या टापांच्या तालावर रपेट मारताना भूतकाळातील युद्ध, मोहिमा, पराक्रम गाजवणारे, जीवावर उदार होऊन प्राणांची पर्वा न करता लढणारे शूरवीर यांच्या आठवणी मनात गुंजत राहात. नकळत अभिमानाने मान ताठ होत असे. हळूच हातात भालाही आला. मकरंद केतकर स्वत:च स्वत:ला शिकवत गेले, घडवत गेले. आजही जीवलग घोडेस्वार मित्रासोबत अधूनमधून उपवनची रपेट होतेच.
येवल्याचा बारमाही घोडेबाजार, आषाढी एकादशीनंतर पंढरपूरचा बाजार, अकलूज, नंदुरबारजवळ सारंगखेडा, शिरपूर ही घोडा खरेदी-विक्रीची ठिकाणं. साहजिकच घोडाप्रेमींची ऊठबस आलीच. आपापसातील संवादातून, निरीक्षणातून घोडय़ाविषयीचे माहितीजाल विस्तारत गेले. ज्याच्या पायगुणाने लक्ष्मी येते, ज्याची खंडोबा, ज्योतिबा, कनिफनाथ यांचे वाहन अशी ओळख आहे, त्या घोडय़ाच्या बहात्तर खोडय़ा आणि त्या ओळखता येणारी मोजकी माणसं केतकरांच्या संपर्कात आली. काठेवाडी, पंजाबी, मारवाडी घोडय़ांची ‘शान’ ओळखता येऊ लागली. त्यांची ‘अश्व’शक्ती ध्यानात आली. घोडय़ांची परीक्षा करता येऊ लागली. घाऱ्या डोळ्यांचा जयमंगल, अश्रू ढाळण्याची परिस्थिती आणणारा अश्रुढाळ, ज्याच्यामुळं संकटं घिरटय़ा घालतात तो बालभोरी, देवमण असे घोडय़ांचे विविध प्रकार कळू लागले.
एकाचे दोन, दोनाचे चार घोडय़ांचे घरात आगमन झाले. हरभरे, बाजरी, तांदूळ, गहू यांचा कोंडा खाऊन घोडय़ांनी बाळसं धरलं. थोडे थोडके नाही तर आठ बच्चे केतकरांच्या तबेल्यात जन्माला आले. त्या वेळी घोडीची सर्व निगराणी अगदी तज्ज्ञ डॉक्टरप्रमाणे स्वत: मकरंद केतकर यांनी आपलेपणाने व कुशलतेने केली. थोडा व्यावसायिक दृष्टिकोन ठेवला. एक टांगा, तीन बग्गींची खरेदी झाली आणि घोडे लग्न, मुंजीच्या वरातीत विस्तारलेल्या ठाणे शहरातील रस्त्यारस्त्यातून मिरवू लागले. रोज संध्याकाळी मुला-बाळांना थोरामोठय़ांच्या बग्गीत बसवून तलावपाळीच्या भोवती फेरी मारत रम्य परिसर दाखवू लागले. छोटय़ा मुलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘रिटर्न गिफ्ट’ म्हणून घोडय़ावरून फेरी मारली तर.. अभिनव कल्पना डोक्यात आली, लगेच कृतीत आणली गेली आणि प्रचंड प्रतिसाद मिळाला. फक्त वाढदिवसाचा दिवसच कशाला, रोज फेरी मारण्याचा मुलांनी हट्ट केला आणि केतकरांच्या घोडय़ाने तो पुरवायला सुरुवात केली. आता सहयोग मंदिराच्या समोरच्या बागेत घसरगुंडी, सी-सॉवर खेळताना मुलांचा एक डोळा ‘घोडय़ाकडे’ असतो. एखाद दिवशी जरी घोडा तिथे गेला नाही तरी मुलांचे फोन येतात.
लाडाकोडात वाढवलेल्या आपल्या घोडय़ांना अमॅच्युर जिमखाना छोटय़ा रेससाठी, जॉकी पास मिळवून महालक्ष्मी रेसकोर्सवर केतकर यांनी सलग तीन वर्षे २००१, २००२, २००३ला पळवले होते. दरवर्षी दहा पास मिळाले की दहा अश्वप्रेमींना घेऊन न चुकता ते तिथे हजेरी लावतात. अश्वप्रेमाचा हा झरा झुळझुळत राहावा हा हेतू. ठाणे पूर्वेला बारा बंगल्यांच्या परिसरातील ऑफिसर्स क्लबजवळील मैदानात कायदेशीर परवानगी घेऊन अश्वारोहणाचे धडे रोज सकाळी आठ-साडेआठ वाजता देणं हे केतकरांचं आवडीचं काम. हा मैदानी खेळ शिकण्यासाठी, सराव करण्यासाठी तरुण मुलं-मुली येतच असतात. ठाण्याच्या या एकमेव रायडिंग स्कूलमधील मुलांना केतकर संधी मिळेल तिथे भाग घेण्यासाठी सतत प्रोत्साहन देत असतात. अर्थात लगाम घालणे, खोगीर घालणे, पिछाडी सांभाळणे यात उत्तम जम बसलेला असेल तरच! नुकत्याच पुण्याला दिग्विजय प्रतिष्ठानतर्फे झालेल्या इक्वेस्टियन स्पोर्टस् राज्यस्तरीय स्पर्धामध्ये त्यांचे सात विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यामधील एकाला घोडय़ावरून दौडत येऊन भाल्याने वस्तू उचलण्यात सुवर्णपदक मिळाले आहे.
या राजयोगी अश्वजमातीची उत्तम काळजी घेतली जावी, त्यांच्या ‘जाती’ नामशेष होऊ नयेत, उलट त्यांच्या संख्येत वाढ व्हावी, या तळमळीनेच मकरंद केतकर यांनी अश्वपाल संघटना व अश्वसंवर्धन संघटना स्थापन केल्या असून ते संस्थेचे अध्यक्ष आहेत. सतत पाच र्वष फेब्रुवारीमध्ये ते अश्वसंमेलन भरवत आहेत. कोल्हापूरहून बाळासाहेब चौगुले, माथेरानहून खलील; पाचपाखाडीच्या कृष्णा स्वीट्सचे मालक असे अनेक अश्वप्रेमी हजेरी लावतात. साठ-सत्तर घोडे येतात. घरातील महिला मंडळ औक्षण करून त्यांचे स्वागत करतात. वैद्यकीय तपासणी केली जाते. परीक्षण केले जाते. मार्गदर्शक सूचना दिल्या जातात. सर्व घोडय़ांना टिटॅनसचे इंजेक्शन दिले जाते. घोडे खेळवले जातात. उत्तम घोडय़ास बक्षीस दिले जाते. त्यानिमित्ताने घोडय़ाच्या मालकांनी घोडय़ांची काळजी घ्यावी, चांगला खुराक, मॉलिश करावे, हा खरा अंतस्थ हेतू. या अश्वसंमेलनाच्या निमित्ताने ‘नालबन’ म्हणजे घोडय़ाच्या पायांना नाल ठोकणाऱ्या टांगेवाल्यांचा सत्कार केला जातो. तलवारीच्या कसरती केल्या जातात. एकूणच कोणत्याही घोडय़ाची सेवा करणे, काळजी घेणे, वैद्यकीय तपासणी, मदत उपलब्ध करून देणे याविषयी केतकर सतर्क असतात. अनुभवाने ते स्वत:ही घोडय़ांवर उपचार करतात. घरातील सगळ्या छोटे कंपनीला घोडय़ावर बसण्याचा शौक आहे. त्यांचा पुतण्या, श्रीनाथ साडेतीन वर्षांचा असताना एकटा गोखले रोडपर्यंत घोडय़ावरून फिरून आला. ‘आम्ही चालवू हा पुढे वारसा’ हे पुढच्या पिढीने कृतीतून दाखवले आहे. ‘‘घोडेस्वारीसाठी मैदाने उपलब्ध करून दिली जात नाहीत व मुलांना घरातून प्रोत्साहन दिले जात नाही. वाढत्या कराच्या बोजामुळे घोडय़ांचे ‘खाणे’ महाग झाले आहे. हिरव्या कुरणांचे प्रमाणही नष्ट झाले आहे. सरकारी पशुवैद्यकीय दवाखाना ही असंख्य प्राणीप्रेमींची गरज आहे,’’ अशी खंत केतकर व्यक्त करतात. मात्र, घोडेस्वारी जिवंत ठेवण्यासाठीच्या प्रयत्नांची घोडदौड सुरू ठेवण्याचा त्यांचा निर्धारही पक्का आहे.
अश्वारोहणाचा वारसा ठाणे तिथे..
ठाणे स्टेशनपासून अगदी हाकेच्या अंतरावर, बेडेकर हॉस्पिटलच्या बाजूच्या गल्लीच्या टोकाशी असलेलं; करारी, धारदार व्यक्तिमत्त्वाच्या, केटरिंगच्या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या एका कर्तृत्ववान ‘आजी’च्या प्रयत्नातून साकारलेलं बैठं घर. घराचं वय र्वष ऐंशी.
आणखी वाचा
First published on: 05-02-2015 at 12:54 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Successor of horse riding