ठाणे : १५ लाखांची रोकड आणि ३०० ग्रॅम अस्सल सोन्याच्या मोबदल्यात ७८० ग्रॅम वजनाचे प्रक्रिया न केलेले सोने देतो असे सांगून एका भामट्याने सराफाची फसवणूक केल्याचा प्रकार भिवंडीतील पारनाका परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
हेही वाचा >>> कल्याण-डोंबिवलीत विद्यार्थ्यांची विनापरवाना खासगी बसमधून वाहतूक
पारनाका येथील प्रभुआळी परिसरात सराफाचे दुकान आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या दुकानात प्रकाश सावंत हा आला होता. त्याने १५ लाख रुपये रोकड आणि ३०० ग्रॅम अस्सल सोने दिल्यास त्या बदल्यात ७८० ग्रॅम प्रक्रिया न केलेले सोने देतो असे त्याने सराफाला सांगितले. त्यानुसार, १९ नोव्हेंबरला सराफाने प्रकाश याला १५ लाख रुपयांची रोकड आणि ३००.४८० ग्रॅम वजनाची १५ लाख रुपये किमतीची सोन्याची बिस्किटे दिली. प्रकाश हा सोन्याची बिस्किटे आणि रोकड घेऊन दुकाना बाहेर पडला. अनेक दिवस उलटूनही प्रकाशने त्यांना कोणतेही सोने आणून दिले नव्हते. सराफाने प्रकाशला वांरवार संपर्क साधला असता, त्याचा मोबाईल फोनही बंद केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सराफाने याप्रकरणी शनिवारी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्याआधारे, फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.